मुंबई : भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली नफावसुली आणि विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतल्याने सलग चौथ्या दिवशी बाजारातील घसरण वाढली. परिणामी सेन्सेक्स सप्ताहअखेर ६१, ००० अंशांखाली गडगडला.

शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स १०१.२८ अंशांच्या घसरणीसह ६०,८२१.६२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  ६३.२० अंश घसरणीसह  १८,११४.९० वर स्थिरावला. गेल्या चार दिवसात सेन्सेक्सने ९४४ अंश गमावले आहेत. तर निफ्टीमध्ये २४० अंशांची घसरण झाली आहे.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सरलेल्या तिमाहीची कामगिरी बाजार व्यवहार आटोपल्यानंतर सायंकाळी जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी बाजारात सावध पवित्रा घेतला. सेन्सेक्समध्ये आयटीसीच्या समभाग सर्वाधिक ३.३९ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ मारुती, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक, टाटा स्टील आणि महिंद्र अँड महिंद्र घसरणीसह बंद झाले. तर, एचडीएफसी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक हे समभाग वधारले.