‘सेन्सेक्स’ची ९५८ अंशांनी उसळी; ‘साठी’च्या दिशेने अग्रेसर

मुंबई: अमेरिकी फेडरल रिझव्र्हने व्याजदर ‘जैसे थे’ राखण्याच्या निर्णयाचे जागतिक भांडवली बाजारांनी स्वागत केले. परिणामी स्थानिक भांडवली बाजारात उत्साहाच्या उधाणाने ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी ९५८ अंशांची मुसंडी घेतली आणि ऐतिहासिक ६० हजारांचे शिखरही आता फार दूर नसल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी एकाच व्यवहारात वेगवान ९५८ अंशांच्या आगेकुचीने ‘सेन्सेक्स’ने ५९,८८५.३६ हा नवीन सार्वकालिक उच्चांकी बंद स्तर नोंदविला. दिवसभराच्या व्यवहारात त्याने ५९,९५७.२५ अंशांच्या नव्या उच्चांकालाही गवसणी घातली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २७६.३० अंशांच्या तेजीसह १७,८२२.९५ या ऐतिहासिक पातळीवर स्थिरावला. दिवसभरात या निर्देशांकाने १७,८४३.९० अंशांची आतापर्यंतच्या अत्युच्च पातळीला स्पर्श केला. 

 तेजीचे उधाण इतके जबरदस्त होते की सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ पाच कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. डॉ रेड्डीज, आयटीसी, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि भारती एअरटेलचे समभाग प्रत्येकी १.०७ टक्क्यांपर्यंत घसरले. बजाज फिनसव्र्हचा समभाग ५.१५ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँकेच्या समभागांची कामगिरी उत्तम राहिली. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स आणि  एचडीएफसीच्या समभागांमध्ये आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स नवीन उच्चांकी पातळी गाठू शकला.

उधाण कशामुळे?  ‘फेड’च्या बैठकीचे सूचित 

फेडरल रिझव्र्हने बुधवारी सूचित केले की, महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला आधार देणारे आर्थिक प्रोत्साहन तूर्त कायम ठेवले जाईल. तसेच सध्या व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. व्याजदर वाढीबाबत २०२२ नंतरच निर्णय घेतला जाईल. अमेरिकेच्या रोजगाराच्या आकडेवारीतही सकारात्मक वाढ कायम आहे.

  ‘एव्हरग्रांड’ संबंधी सुचिन्ह

चीनमधील सर्वात मोठा गृहनिर्माण समूह – एव्हरग्रांडने देखील लहान गुंतवणूकदारांना बाहेर पडण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे. यामुळे चीनसह जगाला हादरवणारे हे आर्थिक संकट निवळत असल्याचे चिन्ह दिसत आहे.

  जागतिक बाजारांत हर्ष

अमेरिकी अर्थव्यवस्थेत अपेक्षित सुधारणेमुळे, सुरू असलेल्या असामान्य प्रोत्साहनपर उपाययोजना मागे घेण्याबाबत ‘फेड’च्या संकेताने जगभरातील भांडवली बाजारांनी हर्षोल्हासासह उसळी घेतली. पॅरिस, लंडन, हाँगकाँग, शांघाय आणि इतर बाजारात निर्देशांक वाढले. अमेरिकेत वायदे व्यवहारही तेजीत होते. टोकियोचा बाजार सार्वजनिक सुट्टीमुळे बंद होता.

गुंतवणूकदार अजूनही चिनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत स्पष्टतेच्या प्रतीक्षेत आहेत. इकडे देशांतर्गत बाजारात गृहनिर्माण क्षेत्रात मागणी पुनरुज्जीवित झाल्यामुळे गृहनिर्माण कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली.

’  विनोद नायर, जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेस

करोना रुग्णसंख्येतील घट, लसीकरणाला आलेला वेग आणि सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली आहे. बहुतांश कंपन्यांचे उत्पादन हे करोनापूर्व पातळीवर आले असून, आगामी काळ मिळकत वाढीचा असेल.

’  देवांग मेहता, सेंट्रम ब्रोकिंग