भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची निराशाजनक कामगिरी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली आहे. किरकोळ निर्देशांक घसरणीने प्रमुख भांडवली बाजार गेल्या पंधरवडय़ाच्या नव्या तळात विसावले आहेत.
३२.१४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,८५०.९७ पर्यंत आला. तर १२ अंश नुकसानासह निफ्टी ८,७११.७० वर स्थिरावला. बाजारांची ही २० जानेवारीनंतरची किमान पातळी आहे.
गेल्या पाचही सत्रात प्रमुख निर्देशांकांची नकारात्मक कामगिरी राहिली आहे. या कालावधीतील सेन्सेक्सची घसरण तर ८३०.८० अंशांची राहिली आहे. सेन्सेक्सचा यापूर्वीचा किमान स्तर २८,७८४.६७ अंश होता.
गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात सेन्सेक्सने तेजीसह केली. जवळपास ४०० अंश वाढीने मुंबई निर्देशांक सत्रात २९ हजाराच्या वर गेला होता. मात्र हा क्रम त्याला सत्रअखेर कायम राखता आला नाही.
मुंबई शेअर बाजारात ऊर्जा, स्थावर मालमत्ता, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तर माहिती तंत्रज्ञानासारख्या डॉलरच्या भक्कमतेवर निर्भर असलेल्या निर्देशांक तसेच कंपन्यांमध्ये तेजी अनुभवली गेली.
सेन्सेक्समध्ये टाटा पॉवर, सेसा स्टरलाईट, भेल, ओएनजीसी, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, सिप्ला, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, गेल, हिंदाल्को यांचे समभाग मूल्य रोडावले.
सेन्सेक्समधील घसरणीमध्ये २० समभागांचा समावेश राहिला. तर वधारणाऱ्या १० समभागांमध्ये बाजारातून भांडवल उभारणी करणाऱ्या एचडीएफसी समूहातील एचडीएफसी लिमिटेड होता. त्याच्याबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस, टीसीएसही ३ टक्क्य़ांपर्यंत चमकले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा निर्देशांकाने २.८ टक्क्य़ांची आपटी अनुभवली. तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांक २ टक्क्य़ांनी वधारला. स्मॉल व मिड कॅप मात्र सव्वा टक्क्य़ापेक्षा अधिक फरकाने घसरले.
आशियाई बाजारात घसरणीचेच चित्र अधिक होते. केवळ हँग सँग वगळता इतर प्रमुख निर्देशांक एक टक्क्य़ावरील घसरण नोंदवित होते. तर युरोपीय बाजारात संमिश्र वातावरण होते.

घसरता रुपया चिंताजनक : सिन्हा
नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत परकी चलन व्यासपीठावर सुरू असलेल्या रुपयाच्या ६२ पर्यंतच्या घसरणीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉलरपुढे रुपया घसरत असला तरी अन्य चलनाच्या तुलनेत तो भक्कम आहे, असे ते म्हणाले. मात्र चलनाच्या घसरत्या प्रवासावर रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष असून जागतिक स्पर्धेत रुपया स्पर्धात्मक राहण्याच्या दृष्टिने मध्यवर्ती बँक दक्षता घेत आहे, असेही ते म्हणाले. रुपयातील घसरण ही निर्मिती क्षेत्रासाठीही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. घसरता रुपया वाढत्या महागाईलाही निमंत्रण देतो, असेही ते म्हणाले. स्थानिक चलनाने गुरुवारच्या सत्रात डॉलरविरुद्ध ६१.९१ असा ६२ नजीकच्या तळातील प्रवास नोंदविला होता. अमेरिकी चलनासमोर रुपया २०१४ मध्ये २ टक्क्य़ांनी घसरला आहे. या वर्षांत रुपया ६७ पर्यंत घसरला होता. सलग चौथ्या वर्षांत भारतीय चलन कमकुवत झाले.