मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील नकारात्मक प्रवाह आणि विक्रीचा मारा सुरू असल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे एक टक्क्यापर्यंत घसरण झाली. गृहनिर्माण, धातू आणि वाहननिर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये मंगळवारच्या सत्रात विक्रीचा मारा झाल्याने बाजार घसरणीसह बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ५५४.०५ अंशांच्या घसरणीसह ६०,७५४.८६ पातळीवर बंद झाला. तर  निफ्टीमध्ये १९५.०५ अंशांची घसरण झाली. तो १८,११३.०५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या समभाग विक्रीची परिणती म्हणून देशांतर्गत बाजारातील अस्थिरता वाढली. अबू धाबी येथील ड्रोन हल्ल्यामुळे खनिज तेलाचा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरवाढीच्या मिळत असलेल्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये मारुतीच्या समभागाने ४ टक्के घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि लार्सन अँड टर्बोच्या समभागात घसरण झाली.