करोनाच्या कहराविरोधात भारतातील संकटस्थिती आणि रुग्णशय्या, प्राणवायू व औषधांच्या तुटवड्यासह आरोग्य यंत्रणेवर पडत असलेला प्रचंड ताण पाहता, गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन जागतिक बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय मूळ असलेल्या प्रमुखांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन करोनाबाधित रुग्णसंख्येत ३,५२,९९१ हा विक्रमी उच्चांक भारताने सोमवारी नोंदविला, तर दर दिवशी सुमारे २,८०० मृत्यूंसह एकूण करोना बळींची संख्या दोन लाखांच्या वेशीवर जाऊन पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी दर्शविते.

भारतातील करोनाचे बिघडत चाललेले संकट हे भयकारक असल्याचे नमूद करीत, गूगलकडून ‘गिव्ह इंडिया’, युनिसेफ यांच्या माध्यमातून वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी, उच्च जोखीमग्रस्त समुदायांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून १३५ कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याचे गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही ट्वीटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, ‘भारतातील सद्य:स्थिती हृदयद्रावक असून मी मनापासून दु:खी आहे. अमेरिकेचे सरकारही मदत गोळा करण्यासाठी प्रयत्नरत आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा स्थितीत मोलाचे ठरतील असे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांच्या खरेदीसाठी मायक्रोसॉफ्टकडूनही संसाधने व तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी भारतीय जनतेला तातडीने आवश्यक वैद्यकीय जीवरक्षक सामग्री व उपकरणांचा तात्काळ पुरवठा करण्यासह, करोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली आहे. न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरून ३१८ फिलिप्स ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांसह नवी दिल्लीकडे विमानाने उड्डाणही घेतले असल्याचे सांगण्यात आले.

तर रविवारी झालेल्या द्विपक्षीय वाटाघाटीत, अमेरिकेने भारतातील कोव्हिशिल्ड लस तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल तसेच जलद निदान चाचणी संच, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे यांचा पुरवठा सुरळित करण्याची ग्वाहीही अमेरिकेने दिली आहे.

Web Title: Situation in india is dire heartbreaking announcement of help from the head of google microsoft abn
First published on: 27-04-2021 at 00:32 IST