जागतिक वाहन विक्रीत जपानच्या टोयोटाला मागे सारून अव्वल स्थान पादाक्रांत करणाऱ्या जर्मनीच्या फोक्सवॅगनने तिच्या वाहनांमध्ये प्रदूषण उत्सर्जन मापणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत लबाडी केल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. पर्यावरणविषयक नियमनापासून बचावाच्या या चलाखीने ग्रस्त अमेरिकेत विक्री झालेली डिझेलवर धावणाऱ्या १.१ कोटी वाहने आहेत, अशी कंपनीनेच कबुली दिली आहे.
कंपनीवर ओढवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी फोक्सवॅगनने ७.२ अब्ज डॉलरची (६.५ अब्ज युरो) आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. तर या साऱ्याचा परिपाक म्हणून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन विंटरकोर्न यांना हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सदोष सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल कंपनीने यापूर्वीच कबुली दिली आहे.
टाइप ईए १८९ इंजिन असलेल्या कंपनीच्या विविध वाहनांमधील सदोष सॉफ्टवेअर वापराचा ठपका अमेरिकेच्या दर्जाविषयक नियामकाने ठेवला आहे. १९३० मध्ये स्थापित या कंपनीच्या ऑडी, स्कोडा अशा प्रसिद्ध नाममुद्रा बाजारात आहेत.
युरोपातील प्रमुख भांडवली बाजारांमध्ये फोक्सव्ॉगनचे समभाग मूल्यही गेल्या दोन दिवसांत २० टक्क्यांपर्यंत आपटले आहेत. कंपनीच्या समभागाने यातून गेल्या चार वर्षांतील तळ दाखवीला, तर जगभरच्या बाजारात याचे नकारात्मक पडसाद उमटले.