पीटीआय, नवी दिल्ली : वाढत्या महागाईचा अर्थविकासावर प्रतिकूल परिणाम झाला असून सरलेल्या जून महिन्यात निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला असल्याची आकडेवारी शुक्रवारी समोर आली. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास हा मागील नऊ महिन्यांच्या तळात रुतला असल्याचे जूनमध्ये ५३.९ गुणांवर विसावलेल्या ‘पीएमआय’ निर्देशांकाने दाखवून दिले आहे. आधीच्या, मे महिन्यात हा निर्देशांक ५४.६ गुणांवर नोंदविण्यात आला होता. वाढत्या महागाईच्या ओझ्यामुळे गेल्या महिन्यात कंपन्यांच्या वस्तू मागणीमध्ये घट नोंदविली असल्याचे निरीक्षण यानिमित्ताने ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय’ सर्वेक्षणात नमूद केले आहे.

किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ७.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो एप्रिल महिन्यात ७.७९ टक्क्यांसह आठ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र महागाईतील ही घसरण फारशी समाधानकारक नाही. अजूनही महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या वर कायम असल्याने मध्यवर्ती बँकेकडून आगामी काळात मोठी व्याज दरवाढ अपेक्षित आहे. डॉलरच्या तुलनेतील रुपयाची घसरणदेखील येथील कंपन्यांना त्यांच्या निर्यातीबाबत धास्ती निर्माण करणारी ठरल्याचे निरीक्षण सर्वेक्षणाने नोंदविले आहे.