आपल्यावर दोन हजार कोटींहून अधिक रकमेचे कर्ज असल्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासंबंधी स्पाइस जेट या विमान कंपनीने सरकारला साकडे घातले आहे. मात्र, सरकारकडून यासंदर्भात कंपनीला कोणताही निर्वाळा मिळाला नाही.
स्पाइस जेटचे मुख्याधिकारी संजीव कपूर यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी हवाई मंत्री महेश शर्मा यांची सोमवारी भेट घेऊन तातडीने अर्थसहाय्य देण्यासंबंधी विनंती केली. त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही परंतु अशा प्रकारचा निर्णय सरकारमध्ये उच्च पातळीवर घेतला जाऊ शकतो, असे शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. स्पाइस जेट ही कंपनी कलानिधी मारन यांच्या मालकीची असून अर्थसहाय्यासंबंधी त्यांनी मांडलेला प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थ आणि पेट्रोलियम मंत्र्यांसमोर ठेवला जाईल, असे शर्मा पुढे म्हणाले.
दरम्यान, कपूर व अन्य अधिकाऱ्यांनी मात्र शर्मा यांच्या भेटीनंतर पत्रकारांना काहीही सांगण्यास नकार दिला.स्पाइस जेट कंपनीवर सध्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.