scorecardresearch

Premium

महागाई नियंत्रणाचे लक्ष्य हुकण्याची कबुली; सरकारला द्यावयाचे खुलाशाचे पत्र मात्र गुलदस्त्यातच राहणार – गव्हर्नर दास

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची सप्टेंबर महिन्याचआकडेवारी येत्या १२ ऑक्टोबरला जाहीर होणे अपेक्षित आहे आणि हा दरही ६ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचीच शक्यता आहे.

as shaktikant das
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर दास

मुंबई : महागाई दर हा ४ टक्क्यांच्या मर्यादेत राखण्याचे लक्ष्य सलग तिसऱ्या तिमाहीत हुकल्याबद्दल मध्यवर्ती बँकेकडून सरकारला दिलेले जाणारे खुलासेवजा पत्र हे उभयतांमधील विशेषाधिकारात झालेले आदानप्रदान असून, ते सार्वजनिक केले जाणार नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर दास यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यातून त्यांनी येत्या महिन्यांत हे उद्दिष्ट पाळता येणार नाही याची आगाऊ कबुलीच देऊन टाकली. 

मध्यवर्ती बँक आणि सरकार यांच्यातील करारानंतर अस्तित्वात आलेल्या मध्यम-मुदतीच्या ‘महागाई-लक्ष्यी रचने’नुसार, रिझव्‍‌र्ह बँकेला तिच्या दायित्वाचे पालन का करता आले नाही याचा पत्राद्वारे खुलासा करावा लागतो. या पत्रामध्ये महागाई दरासंबंधी ठरलेले लक्ष्य हुकण्याची कारणे स्पष्ट केली जातात आणि ते केव्हा साध्य होण्याची शक्यता आहे याचा तपशील देणेही बंधनकारक असते. ऑगस्ट २०१६ पासून अंमलबजावणी सुरू झालेल्या या महागाई-लक्ष्यी रचनेनंतर, पहिल्यांदाच असा खुलासा करावा लागण्याची रिझव्‍‌र्ह बँकेवर पाळी येणे जवळपास अटळ मानले जात आहे.

मागील सलग आठ महिने महागाई दराने ६ टक्के- म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेने लक्ष्य केलेल्या दराच्या वरच्या पातळीचा भंग केला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची सप्टेंबर महिन्याचआकडेवारी येत्या १२ ऑक्टोबरला जाहीर होणे अपेक्षित आहे आणि हा दरही ६ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या तिमाहीत रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाई दरासंबंधीचे लक्ष्य वारंवार चुकल्याबद्दल तिला सरकारला स्पष्टीकरण देणे भाग पडेल.

विकासदरात कपात

रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेली आव्हानात्मक भू-राजकीय परिस्थिती आणि महागाईवर नियंत्रणाच्या उपायांमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या परिस्थितीमुळे मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी विकासदराचा अंदाज घटवला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी विकासदराचा अंदाज एप्रिलमध्ये ७.८ टक्क्यांवरून कमी करत तो ७.२ टक्क्यांवर आणला होता. आता हा अंदाज आणखी कमी करत ७ टक्क्यांपर्यंत घटविला गेला आहे. मात्र या दरम्यान महागाई दराबाबत अनुमान तिने कायम ठेवले आहे. जागतिक चलनवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ६.७ टक्के महागाईचा अंदाज तिने कायम ठेवला आहे. डिसेंबर २०२२ अखेपर्यंत महागाई दर ६ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. तेलाच्या किमतीत आलेली सध्याची नरमाई कायम राहिल्यास महागाईपासून दिलासा मिळेल, असे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले.

अन्नधान्याच्या किंमतवाढीची जोखीम

यंदा खरिपात कडधान्यांची पेरणी कमी झाली आहे. उशिरापर्यंत सुरू राहिलेला मान्सून आणि अनेक ठिकाणी तो जोरदार बरसल्याने भाजीपाला, विशेषत: टोमॅटोच्या किमतींवर आधीच परिणाम होऊ लागला आहे. अन्नधान्य महागाईच्या या जोखमींचा महागाईसंबंधी आखलेले आडाखे आणि अनुमानांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Target inflation control letter disclosure government das ysh

First published on: 01-10-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×