नवी दिल्ली : तोटय़ात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाची बोली सर्वश्रेष्ठ ठरली असून, समाजमाध्यमांवर शुक्रवारी चर्चेत राहिलेल्या या निर्णयाला सरकारने अधिकृतपणे दुजोरा मात्र दिलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला अद्याप मंजुरी दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर आहे. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली आहे.  

निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावण्यात आलेल्या बोलीचे मू्ल्यमापन करण्यात आले असून, सर्वाधिक बोली ‘टाटा सन्स’कडून आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण झाली आहे. त्यांनी आपली शिफारस अंतिम निर्णयासाठी ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणासाठी स्थापण्यात आलेल्या शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिगटाकडे सादर केल्याचे सांगण्यात येते. 

तथापि, एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली स्वीकारली गेल्याचे वृत्त चुकीचे असून केंद्र सरकारने कोणत्याही कंपनीच्या बोलीला अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग अर्थात ‘दिपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले. जेव्हा निर्णय घेतला जाईल, तेव्हा कळवण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि खुद्द टाटा सन्सनेही याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२०पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

लवकरच मंजुरी अपेक्षित

कर्जाचा बोजा किती?  एअर इंडियावरील एकूण थकीत कर्ज ३१ मार्च २०१९ अखेर ६०,०७४ कोटी रुपये आहे. खरेदीदाराकडून यापैकी २३,२८६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा भार उचलला जाणार आहे.  २००७ पासून ही कंपनी तोटय़ात आहे.

पुन्हा मालकी?

‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा’कडे गेल्यास, त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.