सलग दुसऱ्या सत्रातील वाढीच्या जोरावर भांडवली बाजाराने चालू सप्ताहाची अखेर सकारात्मकतेत नोंदविली. २७८.५४ अंश वाढीसह सेन्सेक्स शुक्रवारी २४,६१६.९७ वर तर ८५.१० अंश वाढीने निफ्टी ७,४८९.१० पर्यंत पोहोचला. साप्ताहिक तुलनेत मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरते राहिले आहेत.
गुरुवारच्या शतकी वाढीनंतर, बाजारात शुक्रवारच्या व्यवहाराची सुरुवात २४,३६०.३६ या वरच्या टप्प्यावर झाली. यानंतर सत्रात सेन्सेक्स थेट २४,६७२.९० या २४,५०० च्या पुढील टप्प्यापर्यंत झेपावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सप्ताहअखेरीस ७,५०० हा उल्लेखनीय टप्पा गाठला. शुक्रवारच्या व्यवहारात निर्देशांक ७,५०३.१५ पर्यंत गेला.
मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढले. त्यातही पोलाद, आरोग्यनिगा, बँक, वाहन क्षेत्राची आगेकूच राहिली. ३.३७ टक्के वाढीसह पोलाद निर्देशांक सर्वात पुढे राहिला. तर सेन्सेक्समध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील ल्युपिन मूल्यवाढीत सर्वात आघाडीवर राहिला. अन्य समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, सिप्ला, टाटा मोटर्स, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज, स्टेट बँक, सन फार्मा यांचा समावेश राहिला. बिर्ला समूहाला सिमेंट व्यवसाय विकणाऱ्या अनिल धीरूभाई अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागालाही शुक्रवारी वाढता भाव मिळाला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य उंचावले.