औषधी क्षेत्रातील दोन स्पर्धक कंपन्यांनी अनोखे सामंजस्य दाखविताना, अहमदाबादस्थित टोरेन्ट फार्मास्युटिकल्स लि.ने मुंबईत मुख्यालय असलेल्या एल्डर फार्मास्युटिकल्सचा भारत व नेपाळमधील औषधी निर्माण व्यवसाय २,००४ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु ही बाब मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध या दोन्ही कंपन्यांच्या भागधारकांच्या पचनी मात्र पडू शकली नाही. ताब्याबाबत अधिकृतपणे शेअर बाजाराला कळविण्यात आल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या समभागांचे भाव शुक्रवारी जबर गडगडले. एल्डर फार्माच्या स्त्री-आरोग्यनिगा, वेदनाशमन, जखमांची निगा आणि पौष्टिक आहार या वर्गवारीत ३० बाजारांत सध्या बडय़ा नाममुद्रा हा ताबा व्यवहार पूर्णत्वास गेल्यास टोरेन्टकडे हस्तांतरित होतील. हा ताबा व्यवहार टोरेन्टकडून अंतर्गत स्रोतातून व आंशिकरीत्या बँकांकडून कर्ज घेऊन जुलै २०१४ पर्यंत पूर्ण केला जाणे अपेक्षित आहे. उभय कंपन्यांच्या संचालक मंडळांनी या ताबा व्यवहाराला स्वतंत्रपणे बैठका घेऊन संमती दर्शविली असल्याचेही शेअर बाजाराला सूचित करण्यात आले.शेअर बाजारात हे वृत्त पसरताच एल्डर फार्माच्या समभागाने ११.४ टक्क्यांनी आपटी खाल्ली. विशेषत: वृद्धिप्रवण आणि कंपनीच्या महसुलात सर्वाधिक योगदान देणारी महत्त्वाची उत्पादने ही टोरेन्टला हस्तांतरित होणार असल्याने, एल्डर फार्माकडे अत्यंत थोडका व्यवसाय शिल्लक राहील. कंपनीचा युरोपातील व्यवसाय विस्तार लक्षणीय नसल्याची चिंता भागधारकांच्या विक्रीतून पुढे येते, असा विश्लेषकांनी कयास व्यक्त केला. त्या उलट टोरेन्ट फार्माच्या समभागातही प्रत्येकी ५१२ रुपयांच्या स्तरावरून तब्बल १२ टक्क्यांची घसरण शुक्रवारी दिसून आली. एल्डरच्या ब्रॅण्ड्सवर मालकी देशांतर्गत बाजारपेठेतील स्थान भक्कम करण्याच्या दृष्टीने टोरेन्टसाठी स्वागतार्ह असली तरी त्यासाठी कंपनीकडील सर्व राखीव गंगाजळी खर्ची घालणे भागधारकांच्या पचनी पडलेले नाही. नव्या ब्रॅण्ड्सशी जुळवून घेऊन प्रत्यक्ष पदरी परतावा पडण्याला दोन वर्षांचा कालावधी द्यावा लागेल, असा या उद्योगक्षेत्रातील जाणकारांचा कयास आहे. दिवसअखेर दोन्ही समभाग घसरणीतून काहीसे सावरले तरी टोरेन्टच्या भावाने उत्तरार्धात लक्षणीय सुधार दाखविला.