‘एक राज्य एक ग्रामीण बँक’च्या दिशेने पडणारे पाऊल म्हणून महाराष्ट्रात दुसरी मोठी ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. अकोला येथे मुख्यालय असलेल्या विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक व सोलापूर येथे मुख्यालय असलेल्या वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण करण्यात आले असून नवी विदर्भ कोकण ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे.
नव्या बँकेचे मुख्यालय नागपूर येथे राहणार असून राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडिया ही या बँकेची पुरस्कृत बँक असेल. बँकेंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १७ जिल्ह्यांचा अंतर्भाव असेल.
यामुळे नव्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या एकूण शाखांची संख्या २९४ व क्षेत्रीय कार्यालायांची संख्या ६ झाली आहे. एकत्रित बँकेच्या एकूण ठेवी २,६३१ कोटी रुपये व १,८८३ कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. पूर्वाश्रमीच्या नफ्यातील दोन्ही विभागीय ग्रामीण बँकांचे एकत्रिकरण झाल्यानंतर एकूण मिश्र व्यवसाय ४,५१४ कोटी रुपयांचा झाला आहे. तर बँकेच्या ग्राहकांची संख्या १८ लाखाच्या पुढे गेली आहे.
बँकेमार्फत विमा, माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावरील उत्पादन सेवा, निधी हस्तांतरण, स्मार्ट कार्ड आदी सुविधा पुरविल्या जात असून संपूर्ण २९४ शाखा संगणकीय प्रणालीद्वारे जोडले गेले असल्याची माहिती नव्याने अस्तित्वात आलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष कुमार तांबे यांनी दिली.
देशभरातील सध्या अस्तित्वात असेल्या ८२ ग्रामीण बँकेची संख्या टप्प्या-टप्प्याने ४६ वर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर ग्रामीण बँक पुरस्कृत बँकांचीही संख्या २६ वरून २० वर आणण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्रासह राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथील अनेक ग्रामीण बँकांचेही फेब्रुवारीमध्ये एकत्रीकरण झाले असल्याची माहिती ‘ऑल इंडिया रिजनल रुरल बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे सरचिटणीस दिलीप कुमार मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाबाबत अनेक राज्य शासनांचा असलेला विरोध लक्षात घेता येत्या दोन वर्षांत ग्रामीण बँकांची संख्या ५५ पर्यंत राहिल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ठाणे व मराठवाडा या ग्रामीण बँकांचे यापूर्वीच (जुलै २००९) एकत्रिकरण झाले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला (मुख्यालय : नांदेड) राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महारष्ट्रने पुरस्कृत केले असून तिच्या ३२९ हून अधिक शाखा राज्यात आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अस्तित्वात आल्यामुळे राज्यात आता दोन ग्रामीण बँका झाल्या आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही महाराष्ट्रातील दुसरी मोठी ग्रामीण बँक ठरली आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण बँका
                        विदर्भ कोकण ग्रामीण बँक      महाराष्ट्र ग्रामीण बँक
                          (२८ फेब्रुवारी २०१३ अखेर)       (मार्च २०११ अखेर)
जिल्हा कार्यक्षेत्र        १७                                       १६
शाखा                     २९४                                    ३२९
मुख्यालय            नागपूर                                 नांदेड
पुरस्कृत बँक       बँक ऑफ इंडिया             बँक ऑफ महाराष्ट्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two gramin banks merged to form vidarbha konkan gramin bank
First published on: 06-03-2013 at 12:27 IST