मुंबई : करोना संकटामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी अद्याप रुळावर आलेली नसल्याने वाहन खरेदीदार आणि इच्छुकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सेमीकंडक्टर चिपच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे देशातील प्रवासी वाहनांची प्रतीक्षा यादी सात लाख ५० हजारांवर पोहचली आहे. ही संख्या आजवरच्या इतिहासात सर्वोच्च असल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे.

प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेवर वरचष्मा असणाऱ्या मारुती सुझुकीकडील प्रतीक्षा यादीने तीन लाख २५ हजारांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या आजवरच्या ४० वर्षांच्या इतिहासात आजपर्यंतची ही सर्वात मोठी प्रतीक्षा यादी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सर्व इंधन प्रकारात सीएनजी-चालित वाहने, विशेषत: एर्टिगाचा प्रतीक्षा कालावधी सहा महिन्यांपेक्षा अधिक आहे.

प्रवासी वाहनांची दुसऱ्या क्रमांकाची निर्माता असलेल्या ह्युंडाई, तसेच टाटा मोटर्स, मिहद्र यांच्या एकत्रित प्रतीक्षा यादीने तीन लाख पन्नास हजारांचा टप्पा गाठला आहे. ह्युंडाई क्रेटा, टाटा नेक्सॉन आणि पंच, मिहद्र एक्सयूव्ही ७०० आणि थार ही वाहने अग्रस्थानी आहेत. भारताच्या प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेवर या चार प्रमुख वाहन उत्पादकांचा वरचष्मा आहे. किआ आणि स्कोडा यांच्या नवेदित क्रेन्स आणि स्लाव्हिया यांचा प्रतीक्षा कालावधी चार ते सहा महिन्यांचा आहे. फॉक्सवॅगनची आगामी सेडान व्हर्टस, ज्यासाठी काही आठवडय़ांपूर्वीच बुकिंग सुरू झाले, त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असला तरी वाहनाचा ताबा केव्हा मिळेल, याबद्दल अनिश्चितता आहे. पुरेशा वाहनांचा पुरवठा करण्यात वाहन निर्मात्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे.