इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ
किरकोळ विक्री क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीच्या वॉल-मार्टने भारतातील व्यवसाय वृद्धींगत करताना भारतीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी छोटी-मोठी लाच दिल्याचे येथील वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. अमेरिकी तपास यंत्रणेच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. लाचेपैकी बव्हंशी रक्कम २०० अमेरिकन डॉलरपेक्षा (सध्याच्या विनिमय दरानुसार १३ हजार रुपये) कमी होती आणि काही प्रकरणात तर पाच डॉलर (३३० रुपये) इतक्या कमी रकमेची लाच देण्यात आली, मात्र एकूण रक्कम लाखो डॉलरची होती.
वॉल-मार्ट ही अमेरिकी किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपनी गेल्या काही महिन्यांपासून भारतात व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील आहे. विशेषत: भारतात किरकोळ विक्री क्षेत्राला थेट विदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात खुली झाल्यानंतर कंपनीने भारतात अधिक रस दाखविला आहे.
असे असताना अमेरिकेतील इंग्रजी दैनिकाने वॉल-मार्टकडून भारतात लाच दिली गेल्याचे जाहीर होताच वित्तीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कंपनीबाबत अमेरिकी तपास यंत्रणांनी गेल्या तीन वर्षांत चौकशी केल्याचे नमूद करत या दैनिकाने संबंधित कंपनीने भारतातील सीमाशुल्क तसेच स्थावर मालमत्तेबाबतचे व्यवहार विनासाय होण्यासाठी लाच दिल्याचे म्हटले आहे.
लाचेची रक्कम ही ५ ते २०० डॉलपर्यंतची (म्हणजेच भारतीय विद्यमान चलनानुसार ३३० रुपयांपासून ते १३,००० रुपयेपर्यंत) असल्याचे नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या तीन वर्षांतील चौकशीअंती कंपनीने भारतातील अगदी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे नियतकालिकाने म्हटले आहे. कंपनीकरिता स्थावर मालमत्तेशी संबंधित तसेच वस्तूंच्या हाताळणीमार्फत सीमाशुल्क विभागातील कर्मचाऱ्यांना ही लाच दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनीने या व्यवहारात दिलेल्या एकूण रकमेचा आकडा मात्र स्पष्ट करण्यात आलेला नाही. अशाच प्रकारचे व्यवहार मेक्सिकोतही आढळल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून कंपनीला भविष्यात मोठय़ा दंडाला अथवा कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वाल-मार्टने भारती एन्टरप्राईजेसच्या माध्यमातून २००७ मध्येच भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रात शिरकाव केला. मात्र २०१३ मध्ये ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर वॉल-मार्टने घाऊक विक्री क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. कंपनीने भारतातील अल्प कालावधीतील व्यवसायामार्फत मोठे नुकसान सोसले आहे.२०१४ मध्ये कंपनीला २३२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर ३२ टक्क्य़ांनी घसरून महसूूल २,९९२.७० कोटी रुपयांवर आला होता. गैर व्यवहार प्रकरणात कंपनीला नोव्हेंबर २०१४ मध्ये एक व्यवस्थापक तसेच मुख्य वित्त अधिकाऱ्यालाही काढून टाकावे लागले होते.इंग्रजी दैनिकात आलेल्या कंपनीच्या वृत्ताबाबत वॉल-मार्टच्या भारतातील व्यवसायाचे उपाध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, याबाबत आम्ही तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत असून संपूर्ण कार्यवाहीनंतरच बोलणे योग्य ठरेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walmart paid massive bribes in india
First published on: 20-10-2015 at 04:53 IST