भारतीय रस्त्यांवर धावत असलेली वाहन जागतिक तुलनेत केवळ एक टक्का असला तरी, जगभरात रस्ते अपघातात होत असलेल्या मृत्यूंमध्ये भारताचे प्रमाण ७ ते ८ टक्के आहे. रस्ते अपघातामुळे दरवर्षी अंदाजे १,३५,००० मृत्यू होतात (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो, २०१०). मोठय़ा प्रमाणात रस्ते अपघात होत असलेल्या क्षेत्रात ‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या वर्षी, २०११ मध्ये सर्वसाधारण विमा क्षेत्रात  ‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’अंतर्गत पूर्ण केलेले दावे ३८ टक्के, म्हणजे २,११७ कोटी रुपयांवरून २,९१५ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत.
‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ दाव्यां च्या बाबतीत रक्कम व अन्य बाबी ठरवण्यासाठी ‘वाहन अपघात दावा प्राधिकरणा’ची (एमएसीटी) स्थापना करण्यात आली आहे.  ‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ दाव्यांसंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार या प्राधिकरणाला आहे.
‘थर्ड पार्टी’ दाव्यांची नोंदणी
वाहन विम्याच्या बाबतीत  ‘थर्ड पार्टी’ दावे हा सर्रास आढळणारा प्रकार आहे. ‘थर्ड पार्टी’ दावे पूर्ण करण्यासाठी ‘एमएसीटी’सोबत काही कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागत असल्याने सर्वप्रथम पोलिसांना कळवणे आणि प्राथमिक तक्रार दाखल करणे गरजेचे असते. त्याच वेळी, या नुकसानाविषयी विमा कंपनीलाही कळवल्याची खात्री करावी.
दाव्यांची प्रक्रिया जलद होण्यासाठी उपाययोजना :
– गाडी अपघाताच्या ठिकाणाहून हलवण्यापूर्वी आणि प्रामुख्याने आणखी वाहन वा मालमत्ता यामध्ये सहभागी असताना अपघात वा नुकसानाचे तातडीने छायाचित्र घ्यावे. प्रसंगाचे वर्णन अचूक करावे आणि विम्याच्या दाव्यामध्ये शक्य तितका तपशील नमूद करावा.
– अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेल्याची खात्री करून घ्यावी. त्यांच्या वतीने पसे भरायचे असतील तर त्याविषयी विमा कंपनीला कळवावे.
दावे नोंदविण्यासाठी कालावधी
दावा पूर्ण करणे शक्य होत असल्याने व या दाव्यांच्या स्वरूपामुळे असे दावे पूर्ण व्हायला वेळही अधिक लागत असतो. तेव्हा ‘थर्ड पार्टी’ दावा शक्य तितक्या लवकर दाखल होणे गरजेचे असते. यासाठी काही लेखी नियम नसले तरी अपघात झाल्यापासून २४ ते ४८ तासांमध्ये विमा कंपनीला कळविणे सोयीचे ठरते.
या गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
‘थर्ड पार्टी’ दावे झपाटय़ाने पूर्ण होण्यामध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे माहितीचा अभाव. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाला पुढील काही बाबी माहीत असाव्यात – ज्यामुळे दाव्यांची प्रक्रिया विनासायास करण्यासाठी मदत करतील.
’ दाव्यांसाठी योग्य वेळी योग्य व्यक्तीला भेटणे अतिशय गरजेचे आहे. कागदपत्रे योग्य असतील तर थेट विमा कंपनीकडे जाता येते. असे केल्याने कोणताही हस्तक्षेप न होता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा वेळ वाचतो. तसेच आपल्या संपर्काचा संपूर्ण व अचूक तपशील भरावा.
’ योग्य कागदपत्रांबरोबरच मध्यस्थांनी केलेल्या अवास्तव आणि चुकीच्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकू नये. अनेकदा मध्यस्थ भरपाईची आकर्षक रक्कम सांगतात. त्यावर अंधपणे विश्वास ठेवू नये. त्याऐवजी या संदर्भात विमा कंपनीसोबत सर्व खातरजमा करून घ्यावी.
’ अपघातासंबंधीचा खटला न्यायालयात प्रलंबित असला तरी पुढाकार घेऊन विमा कंपनीशी संपर्कात रहावे. सातत्याने पाठपुरावा केल्याने दाव्याच्या स्थितीविषयी सतत माहिती मिळत राहिल. न्यायालयाकडून माहिती मिळण्यापूर्वी ही माहिती मिळू शकेल. अनेकदा पुरेसे वैयत्तिक लक्ष न घातले गेल्याने न्यायालयाकडून दाव्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया उशिरा होऊ शकते. न्यायालयाकडून योग्य वेळी पसे घेतल्याची खात्री करून घ्यावी.    
लेखक ‘बजाज अलायन्झ   जनरल इन्श्युरन्स’च्या वाहन विमा विभागाचे प्रमुख आहेत.
‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ म्हणजे काय?
‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ हा विम्याचाच एक प्रकार असून, साधारणत: रस्ते अपघातांच्या प्रसंगात तो उपकारक ठरतो. साधारण वाहन विम्यापेक्षा तो वेगळा आहे. कारण वाहनाच्या मालकाऐवजी अपघात वा अन्य कारणाने त्रयस्थाला होणाऱ्या नुकसानाची भरपाई तो करतो. कार इन्श्युरन्सप्रमाणेच वाहनमालक असलेल्या प्रत्येकाने मोटर वाहन कायद्यानुसार हा विमा घेणे बंधनकारक आहे. रस्त्यावर चुकून एखादा अपघात झाला तर त्यासाठी पडणारा आíथक भरुदड कमी होण्याच्या दृष्टीने ‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’ अतिशय फायदेशीर आहे.
‘थर्ड पार्टी’ दाव्यांबाबत आवश्यक कागदपत्रे
* विमाधारकाची योग्य सही असलेला दाव्याचा अर्ज
* वाहन परवान्याची प्रत
* पोलीसांकडे दाखल प्राथमिक तक्रारीची (एफआयआर) प्रत
* वाहनाच्या ‘आरसी’ची प्रत
* कंपनी नोंदणीकृत वाहन असेल तर त्याच्या मूळ कागदपत्रांच्या बाबतीत मुद्रांक आवश्यक
* व्यावसायिक वाहनाच्या बाबतीत गरज असेल तिथे परवाना आणि पात्रता आवश्यक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should do third party claim every one know
First published on: 26-12-2012 at 03:51 IST