स्वयंचलित यंत्रं, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव या गोष्टी संशोधन-निबंधांपुरत्या मर्यादित न राहता उद्योग-व्यवसायांमध्ये अवतरल्या आहेत. या झपाटय़ात  बरेच रोजगार लुप्त होतील, अशी भीती विकसित देशांमध्ये बळावते आहे. आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांना मात्र हे वादळ तितकंसं नवीन भासत नाहीये!

मायक्रोसॉफ्टचे जन्मदाते बिल गेट्स हे एका प्रकारे जनसामान्यांपर्यंत संगणकाची जादू पोचवणाऱ्या क्रांतीचे अग्रदूत. या वर्षांच्या सुरुवातीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अशी भीती व्यक्त केली की, यंत्रांच्या स्वयंचलनीकरणाची (ऑटोमेशनची) प्रक्रिया आपल्याला सामाजिक अरिष्टाकडे नेतेय आणि ती थोपवण्यासाठी सरकारने यंत्रमानवांवर कर लादण्याचा विचार करायला हवा! (यंत्रमानव हा शब्द या लेखात वापरला असला तरी खरं तर ही संगणकीय आज्ञावलीनुसार आणि कुठल्याही चालकाविना निरनिराळी कामं करणारी यंत्रं आहेत. ती नेहमीच मानवसदृश असतात, असं नाही.)

स्वयंचलित यंत्रं, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव या गोष्टी विज्ञानकथांपुरत्या आणि संशोधन-निबंधांपुरत्या मर्यादित न राहता उद्योग-व्यवसायांमध्ये अवतरून आता काही काळ लोटला आहे. स्वयंचलित वाहनांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही बँकांनी खातेदारांना सेवा पुरवणारे यंत्रमानव शाखेत बसवले आहेत. ग्राहकांशी मानवी संवाद साधू शकणारी यंत्रणा काही कंपन्यांनी वापरायला सुरुवात केली आहे. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स अशा क्षेत्रांमध्ये यंत्रमानवांचा वापर फोफावतो आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या आकडेवारीनुसार आशियामध्ये सुमारे ८.८७ लाख यंत्रमानव वापरात आहेत. चीनमध्ये औद्योगिक यंत्रमानवांना सर्वाधिक मागणी आहे (चीनची स्पर्धात्मकता स्वस्तातल्या कामगारांच्या उपलब्धतेचा टप्पा मागे सोडून पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे, याचाही हा एक पुरावा म्हणायला हवा). आशियातली नव्वद टक्के मागणी चीन, कोरिया आणि जपान या तीन देशांमधून आहे. भारतात हे प्रमाण अजूनपर्यंत बरंच कमी आहे. २०१५ मध्ये आशियात विकल्या गेलेल्या १.६ लाखांपैकी साधारण दोनेक हजार यंत्रमानव भारतात विकले गेले.

स्वयंचलित यंत्रांच्या झपाटय़ापुढे सध्याच्या बऱ्याच नोकऱ्यांचा निभाव लागणार नाही, अशी भीती विकसित देशांमध्ये बळावते आहे. २०१३ साली ऑक्सफर्डच्या दोन अभ्यासकांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. वेगवेगळ्या सातशे व्यवसायांचा अभ्यास करून त्यांनी त्यातले कुठले व्यवसाय पुढल्या दोन दशकांमध्ये यंत्रं ताब्यात घेऊ  शकतील, याचा अदमास घेतला. अमेरिकेतल्या सध्याच्या ४७ टक्के नोकऱ्यांवर संक्रांत येऊ  शकेल, असा त्यांचा धक्कादायक निष्कर्ष होता! नंतरच्या काही इतर अहवालांप्रमाणे ब्रिटनमध्ये हे प्रमाण ३५ टक्के, तर ओईसीडी देशांमध्ये ५७ टक्के असेल, असा अंदाज मांडण्यात आला. भारताच्या संदर्भात याबद्दलचे अंदाज उपलब्ध नाहीत. भारतात यांत्रिक स्वयंचलनीकरणाचा प्रसार थोडा उशिराने होईल. पण भारतात याचे पडसाद वेगळ्या प्रकारे पडू शकतील. आजपर्यंत विकसित देशांमधल्या अधिक श्रममोबदल्यामुळे जी कामं भारतासारख्या विकसनशील देशांकडे वळत होती, त्यांचा प्रवाह रोडावू शकतो. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार विकसित देशांमधल्या स्वयंचलनीकरणामुळे भारताच्या आयटी-आधारित उद्योगातल्या साधारण साडेसहा लाख नोकऱ्यांवर येत्या पाच वर्षांमध्ये गंडांतर येऊ  शकेल. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे धास्तावलेल्या आयटी-आधारित उद्योगासाठी हे आणखी एक आव्हान आहे.

विकसित देशांमध्ये कुठल्या प्रकारच्या व्यवसायांचं भवितव्य धोक्यात येणार आहे, याचेही काही संकेत पाहण्यांमध्ये दिसत आहेत. वाहनचालक, वस्तू पोहोचवणारे कामगार, कारखान्यातले कामगार यांच्यासारख्या श्रमिकांबरोबरच कॅशियर, लेखापाल, स्वागतिका, रटाळ कामं करणारे कारकून, टेलिफोनद्वारे विक्री करणारे कर्मचारी आदी कार्यालयीन कामं करणाऱ्यांच्या नोकऱ्याही त्या यादीत आहेत. कायदा-क्षेत्रामध्ये जुन्या खटल्यांचे संदर्भ शोधण्यासाठी आणि वैद्यक-क्षेत्रामध्ये चाचणी अहवाल तपासून रोगनिदान करण्यासाठी माणसांपेक्षा जास्त वेगवान आणि अचूक काम करणारी यंत्रं तयार झाली आहेत. म्हणजे, इथे श्रमिक कामगार की कार्यालयीन कर्मचारी असा भेदभाव नाही. त्याहून महत्त्वाची गोष्ट ही आहे की, तुमच्या कामात तोचतोचपणा आणि चाकोरीबद्धता किती आहे? जे काम करण्याची आज्ञावली तार्किक पातळीवर तयार केली जाऊ  शकते, त्या प्रत्येक कामासाठी यंत्रमानव हा पर्याय बनू शकतो. अर्थात, एखादी गोष्ट तांत्रिकदृष्टय़ा शक्य होणं आणि ती व्यावहारिक पातळीवर अमलात येणं, यात अंतर असतं. तांत्रिक पर्याय सुरुवातीला खर्चीक असतात. मानवी कर्मचारी हटवून ते पर्याय अमलात आणण्याचं अर्थकारण कंपन्यांसाठी व्यवहार्य बनण्यासाठी वेळ लागतो. पण विकसित देशांमधल्या जवळपास अध्र्या नोकऱ्यांसाठी ही प्रक्रिया येत्या दोन दशकांमध्ये पूर्ण होईल, असा या अभ्यासकांचा कयास आहे.

ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी अलीकडच्या एका लेखात म्हटलं होतं की, कारखान्यांमधल्या स्वयंचलनीकरणामुळे परंपरागत उत्पादन क्षेत्रातल्या रोजगारावर गदा आणली आहेच. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीमुळे ते लोण मध्यमवर्गापर्यंत पोहोचणार आहे. फक्त ज्या व्यवसायांमध्ये मानवी करुणाभाव (शुश्रूषा, प्रशिक्षण वगैरे), मानवी मनाची नवनिर्मितीची प्रेरणा (कलाकार, संशोधक, वगैरे) आणि व्यवस्थापन क्षमता (व्यवस्थापक) यांची गरज भासेल, तेच व्यवसाय या वादळापासून दूर राहतील. कारण या क्षमतांचे पर्याय संगणकीय आज्ञावली बनवून तयार होणार नाहीत.

एवढय़ा प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या आणि पोटापाण्याचे व्यवसाय यंत्रांनी हिरावून घेतले, तर सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचं काय होईल, हा प्रश्न काहींना भेडसावतो आहे. यंत्रमानवांवर कर बसवून ही प्रक्रिया मंदावण्याची बिल गेट्स यांची मागणी त्याच प्रश्नातून पुढे आलेली आहे. आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांना मात्र हे वादळ तितकंसं नवीन भासत नाहीये! ‘थ्री इडियट्स’ या सिनेमात आमिर खानने केलेली यंत्राची व्याख्या आठवतेय? मानवाचे श्रम कमी करणारं ते यंत्र. यंत्रं जशी उपभोक्त्यांचं आयुष्य सुखकर करतात, तशी श्रमिक रोजगारांची गरजही कमी करतात. यंत्रांनी मानवी कर्मचाऱ्यांची जागा घेणं ही गोष्ट इतिहासात नवीन नाही. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात लाकूड कापणाऱ्या यंत्रांवर आक्षेप घेतले गेले की पूर्वी तीस कामगारांकडून होणारं काम आता दोन कामगारच करताहेत. विसाव्या शतकात केन्स या प्रख्यात अर्थतज्ज्ञाने ‘यांत्रिक बेरोजगारी’वर भाष्य केलं होतं. आपल्याकडेही १९८०च्या आसपास ‘संगणक – शाप की वरदान’ या विषयावरनं घमासान चर्चा व्हायच्या. यांत्रिक प्रगतीच्या या प्रत्येक टप्प्यावर काही जुने रोजगार कालबाह्य ठरले. पण नवीन रोजगारही तयार झाले. त्या त्या टप्प्यावर असताना भविष्यात कुठले नवीन रोजगार निर्माण होणार आहेत, याचं भाकीत करता येत नाही. पण यंत्रांनी रोजगार हिरावून घेऊन समाजाचा आर्थिक पाया उद्ध्वस्त केलाय, असं या टप्प्यांच्या शेवटी दिसलेलं नाही. यंत्रमानव किंवा स्वयंचलित यंत्रं ही अर्थकारणाच्या प्रतवारीत याआधीच्या यंत्रांपेक्षा निराळी नाहीत. तेव्हा त्यांच्यामुळे अरिष्ट कोसळेल या भीतीत आणि त्यांच्यावर वेगळा कर आकारण्याच्या प्रस्तावात दम नाही, असा एकंदर आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांचा कौल आहे.

थोडं ढोबळमानाने सांगायचं तर जे घडतं ते साधारण असं – यंत्रं काही मानवी कामांची गरज हटवतात. उत्पादकता वाढते. उत्पन्न वाढतं. एकंदर अर्थव्यवस्थेतली क्रयशक्ती वाढते. मग खालच्या पातळीवरच्या गरजा तुलनेने सहजासहजी भागल्या की, क्रयशक्ती असणारा ग्राहकवर्ग पूर्वी ज्या गरजा बाजारपेठेच्या खिसगणतीत नव्हत्या त्यांना आर्थिक मागणीच्या पातळीवर आणतो. त्यासाठी बाजारपेठ तयार होते आणि त्यातून नवे रोजगार निर्माण होतात. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर जुन्या रोजगारांची जागा नवे रोजगार घेतात. एकूण अर्थव्यवस्था प्रगतीच्या नव्या पातळीवर पोहोचते. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर असे अनेक रोजगार दिसतील, की जे काही दशकांपूर्वीच काय, पण काही वर्षांपूर्वीपण अस्तित्वात नव्हते. मॉलमध्ये स्केच काढून देणारे असोत किंवा मॉर्निग वॉकवाल्यांना आरोग्यपूर्ण पेयं पाजणारे असोत किंवा आज स्मार्ट फोन आणि फोर-जीच्या आसपास फोफावलेले व्यवसाय असोत, समाजाच्या या गरजा बाजारपेठेच्या परिघात येतील, याची कल्पना काही वर्षांपूर्वी करणं फार कठीण होतं. न जाणो, स्वयंचलित यंत्रांच्या जमान्यात माणसांच्या पारंपरिक भौतिक गरजा वाढीव उत्पादकतेमुळे सहजपणे भागू लागल्याहेत असं दिसलं, तर माणसांचं मनोरंजन करणं, त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य गोंजारणं, हे जास्त मोठे आणि चलतीचे उद्योग बनतील!

अर्थात, ही ‘ऑल इज वेल’ची धारणा आणि जुनं जळून नवं उगवण्याची प्रक्रिया एकूण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर कितीही आश्वासक वाटली, तरी विशिष्ट कप्प्यांमध्ये ती प्रक्रिया खूप यातनामय असू शकते. यांत्रिक प्रगतीमुळे ज्यांचे रोजगार बुडत असतील, त्यांना पुढे कुठे तरी दुसऱ्या क्षेत्रात (किंवा दुसऱ्या भूभागातही) नवीन रोजगार निर्माण होणार आहेत, हे आश्वासन लंगडं वाटणं स्वाभाविक आहे. सध्याचा स्वयंचलनीकरणाचा आवेग हा आधीच्या यांत्रिक प्रगतीच्या टप्प्यांच्या तुलनेत जास्त प्रखर आणि अधिक व्यापक परिणाम करणारा असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच जे व्यवसाय आणि रोजगार या वादळामध्ये सापडण्याची शक्यता आहे, त्यांना मोठी तयारी करावी लागेल. त्या व्यवसायांमधल्या मंडळींना नवी कौशल्यं आत्मसात करावी लागतील. जे रोजगार नव्याने निर्माण होताना दिसतील, त्यांच्यामध्ये सामावून जाण्यासाठी लवचीक राहून प्रयत्न करावे लागतील. सरकारला आणि उद्योगांना एकत्र येऊन अभ्यासक्रमांमध्ये बदल करावे लागतील. आज तरी हे वादळ प्रामुख्याने विकसित देशांच्या उंबरठय़ावर आहे. पण भारतातही जे आज विशीत किंवा तिशीत आहेत, त्यांना या वादळाची हवा त्यांच्या व्यावसायिक जीवनात कुठे तरी जाणवण्याची शक्यता निश्चितच आहे. तेव्हा, तरुण तुर्कानो, तयार राहा. भविष्यातली स्पर्धा कदाचित यंत्रमानवाशी असेल!

 

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com

लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून काम करतात.