सुहास सरदेशमुख

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

Permits ethanol production from residual seed heavy plants Kolhapur
शिल्लक बी हेवी मळी पासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; साखर उद्योगाला मोठा दिलासा
Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!

* नंदूरबारहून ते आले तेव्हा काय करायचे हे माहीत नव्हते. तेव्हा ‘एसटीडी-पीसीओ’चे  योगेश घोडके यांनी काम केले. मग वीज यंत्र दुरुस्तीच्या दुकानात काम केले. भाऊ औरंगाबादला होते म्हणून औरंगाबाद गाठलेले.पण काय करायचे ठरलेले नव्हते. शिक्षणही नव्हते. त्यामुळे जमेल ते काम करुन शहरात थांबायचे, असे ठरविलेले. औद्योगिक वसाहतींमध्ये यंत्राशी खेळत राहिले. चिकाटीने काम हा स्वभाव. मशीन बनवता येईल,असे कौशल्य आल्याचेही कळत होते. पण पैसा गाठीशी नव्हता. हातातोंडाशी कशीबशी गाठ पडायची. आता योगेश घोडके औरंगाबादमधील सर्व कंपन्यांमध्ये झाळण्याच्या (वेल्डिंग) कामात वापरल्या जाणाऱ्या ‘रोबो’चे सुटे भाग बनवून देतात. झाळण्यासाठी लागणारे चिमटे, पक्कड यासह विविध अशा साऱ्या वस्तू ते तयार करतात. त्यांची वर्षांची उलाढाल आता दोन कोटी रुपयांपर्यंत आहे.

* * *

*  रोहिदास भारसावणे यांच्याकडे कपडे शिवण्याचे एक यंत्र होते. ‘टेलर’ होणे हे त्यांचे स्वप्नच. एका अभियांत्रिकी कंपनीमध्ये त्यांनी काही दिवस नोकरी करुन पाहिली. घरी आल्यावर एका कपडे शिवण्याच्या दुकानात काम करायचे. जेवढे शक्य होईल तेवढे काम करण्याची सवय जडलेली. घरातील शिलाई मशीनवरही शर्ट शिवत राहायचे. कोणाकडून काम आणायचे आणि ते पूर्ण करायचे. असे  खूप दिवस केले. हातातील कला पाहून एका मित्राच्या साहाय्याने हेच काम वाढवायचे ठरले आणि आता रोहिदास भारसावणे यांची वार्षिक उलाढाल ३५ लाख रुपयांची आहे. शाळेचे तसेच रुग्णालयातील व्यक्तींचे गणवेश शिवून देण्याचे ते काम करतात. आता रोहिदास भारसावणे करोना काळात ‘ पीपीई’ (पसर्नल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) करू लागले आहेत. व्यवसाय वाढतो आहे.

***

यशाच्या अशा अनेक कहाण्या गावोगावी असतात. मग यशाचे इंजिन कोणते असते? कोण मदत करतो,की सारे आपोआप परिस्थिती घडवते? ‘उद्योगी व्यक्ती’चे निकष तसे पदव्यांच्या ढिगांमध्येही बऱ्याचदा सापडत नाहीत. तसेच ‘धडपडून’ शिकणारेही अनेक जण असतात. पण त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे उद्योगाला चालना मिळायला हवी आणि उद्योजक घडायला हवेत यासाठीही अनेक जण काम करत असतात, ना नफा ना तोटा या तत्त्वावर. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ही उद्यजकतेला वाव देणारी संघटना आहे. रोहित भारसावणे आणि योगेश घोडके हे दोन्ही उद्योजक या  विश्वस्त संस्थेच्या मदतीने उभे ठाकले.  वेळेवर भांडवल मिळणे, हाच त्यांच्या यशाचा मार्ग असू शकतो की आणखीही गुण लागतात उद्योजकतेसाठी? भांडवल मिळणे ही गरज असतेच.  आपल्याकडे बॅकिंग क्षेत्रात एक तर विनातारण कर्ज मिळत नाही. ज्यांना ‘मुद्रा’सारख्या योजनेतून कर्ज मिळते त्यांची काय वाताहात होते, याची नव्याने उजळणी करण्याची गरज नाही. उद्योजकांना मोठी कर्ज मिळतात किंवा एकदम छोटय़ा स्वरुपात कर्ज मिळते. लघू उद्योगांना कर्ज घेताना होणारे त्रास निराळे आहेत. ही गरज ओळखून १८-३५ वयोगटातील व्यक्तींना उद्योगात मदत करण्यासाठी भारतीय युवा शक्ती ट्रस्टने सहा बॅंकांबरोबर करार केले. एक लाख ते ५० लाख रुपयांच्या कर्ज योजना मंजूर करण्यासाठी बॅंकांना मदत करणे आणि मिळालेल्या कर्जाच्या आधारे उद्योगांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे असे काम केले जाते. ‘मुद्रा’योजना कार्यान्वित होण्यापूर्वीपासून असे काम सुरू आहे.  तसेच उद्योग वाढविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी  एक तज्ज्ञांचा गट नेमून काम करणारी संस्था म्हणून भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे काम सुरू आहे. या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष नौशाद फोब्र्ज आहेत. दिवंगत जेआरडी टाटा आणि माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या कन्या लक्ष्मी व्यंकटेशन यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमुळे अनेकांना मदत मिळते आहे. सीआयआय संघटनेचे औरंगाबादचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी सांगत होते- ऑटो क्षेत्रातील नामांकित बजाज कंपनीने भारतीय युवा ट्रस्टच्या मदतीने शहरातील ११००जणांना अर्थसाहाय्य मिळवून देण्यापासून ते तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यापर्यंत मदत केली आहे. आतापर्यत ५६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळवून देण्यापर्यंतचा प्रवास उद्योजकता वाढीला प्रोत्साहन देणारा आहे.

रोहिदास भारसावणेच्या अंगात कपडे शिकवण्याची कला होती. पण व्यवसाय कसा विस्तारायचा हे माहीत नव्हते. आजही रोहिदास भारसावणे यांना इंग्रजी बोलता किंवा लिहिता येत नाही. तसे बोलण्याचीही त्यांना सवय नव्हती. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून काम मिळवायचे कसे, हे त्यांना माहीत नव्हते. मात्र, उद्योजकता वाढीसाठी बजाज कंपनीच्या सामाजिकदायीत्व निधीतून मिळालेल्या निधीतून कार्यशाळा घेतल्या जातात. राज्यभरातील ६५० हून अधिक तज्ज्ञ उद्योजक मार्गदर्शक म्हणून काम करतात. औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यात अशा प्रकारचे काम केले जाते. अशाच कार्यशाळांमधून रोहिदास भारसावणे घडले. एका मित्राने त्यांना सांगितले होते,की  असे कर्ज मिळू शकते.तेव्हाअगदी चालू खाते कसे वापरावे हेही माहीत नव्हते.पण प्रत्येक उद्योगासाठी एक गुरू अशी रचना असल्याने अनेक उद्योजक घडविले जात आहेत. आता त्यांच्या ‘ तेज गारमेंटस्’ मध्ये २०हून अधिक जण काम करत आहेत.

केवळ कर्ज मिळाल्याने उद्योग उभे राहतात,असे घडत नाही. योगेश घोडके यांचे उदाहरण महत्त्वपूर्ण आहे. अगदी दहावीपर्यंतही शिक्षण नसताना चिकाटीने यंत्राबरोबर केलेल्या मैत्रीला व्यावसायिकतेची जोड त्यांनी दिली. ‘आदिनाथ इंडस्ट्रीज’ उभी करताना भावाच्या वेल्डींगच्या व्यवसायाला नवी जोड देण्यात घोडके यांना यश आले. औरंगाबाद शहरातील ऑटो क्षेत्रात आजघडीला ५०० हून अधिक रोबो काम करतात. ऑटो रिक्षांच्या चॅसी तसेच दुचाकीच्या चॅसी व इतर वस्तू बनविताना झाळणे ही प्रक्रिया करावी लागते. पण हे सारे काम आता रोबो करतात. लोखंड झाळताना पूर्वी कामगारांना धोका असे. हे रोबो विदेशातून आणले जातात. पण त्यातील वेल्डींग मधील सुटे भाग बनविणारे फार कमी उद्योजक होते. जेव्हा या क्षेत्रात योगेश घोडके छोटी कामे घेत तेव्हा त्यांना वेल्डींग मशीन बनविणारा माणूस हुशार असे. त्यामुळे वेल्डींग मशीन बनविण्याची जिद्द मनात धरली आणि यंत्र बनवायचे ठरविले. पुढे रोबोच्या साहाय्याने वेल्डींगसाठी लागणारे सुटे भाग योगेश घोडके यांनी विकसित केले.

कोणताही उद्योग उभा करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी आणि योग्य दिशा लागते. ती मिळावी यासाठी औद्योगिक संघटनांनी वातावरण निर्माण करावे लागते. त्यासाठी उद्योजकता विकासासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा घ्याव्या लागतात. औरंगाबाद, वर्धा या जिल्ह्यामध्ये काम करताना या संघटनेकडून अंगी उद्योजकता असणे हा निकष महत्त्वाचा मानला जातो.  उद्योजकता आणि हेतू तपासण्यासाठी विविध पातळयावर तपासण्याही केल्या जातात. नाही तर सरकारी सवलती मिळविण्यासाठीही काही जण येतात. त्यामुळे उद्योग करायचा आहे का याची तपासणी करावी लागते. अशी तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांसमोर उद्योग सुरू करणाऱ्या इच्छुकांना कौशल्ये, कमतरता, तांत्रिकता यावर बोलावे लागते. निवडलेल्या प्रत्येक उद्योजकास मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ज्ञ अशी रचना करण्यात आली. योगेश घोडके, रोहिदास भारसावणे यांच्यासारख्या उद्योजकांना आता दिशा सापडली आहे. संकटकाळी सुद्धा व्यवसाय कसा वाढवायचा याचे कौशल्यही ते शिकले आहेत. गणवेश शिवणाऱ्या भारसावणे यांना करोना काळात पीपीपी कीट तयार करता येऊ शकतील, हे आलेले शहाणपण नवी आव्हाने पेलण्यास पुरेसे ठरू शकेल. अशी अनेक माणसे घडविणे हे करोनानंतरच्या काळातील मोठे आव्हान आणि संधी असणार आहे. सध्या ११०० हून अधिक उद्योजकांचे पालकत्व बजाज आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्टने घेतले आहे. नव्या पॅकेजमधून कर्ज घेण्यास इच्छूक अनेक जण आहेत. नवी संधी कोठे असेल याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. या काळात खरा उद्योजक शोधणे आणि त्याच्या उद्योजकतेला चालना देणे अधिक गरजेचे असणार आहे.

लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबादचे प्रतिनिधी

suhas.sardeshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.