पावसाच्या पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि काही लक्षात येण्याआधीच सावित्री नदीवरील पुलाला वाहून घेऊन गेला. मुंबई-गोवा महामार्गावरील हा ब्रिटिशकालीन पूल होत्याचा नव्हता झाला. ४० लोकांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेला एक सोनेरी किनारही आहे. देशभरातील जुन्या पुलांच्या आरोग्याच्या तपासणीचे काम त्यानंतर युद्धपातळीवर हाती घेतले गेले. तर सावित्री नदीवर नवीन पूल अवघ्या १६५ दिवसांत उभारला जाऊन वाहतुकीसाठी खुलाही झाला. या दोन्ही सकारात्मक घटनांशी निगडित एक सामायिक नाव आहे. ते म्हणजे ध्रुव कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेडचे आणि या कंपनीचे संस्थापक पांडुरंग दंडवते यांचे.

कोणत्याही बांधकाम प्रकल्पाच्या जीवनचक्राचे चार ते पाच महत्त्वाचे टप्पे असतात. सुरुवात, आखणी-नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, समापन आणि देखभाल असे ढोबळमानाने पाच-सहा टप्पे मानता येतील. प्रत्येक टप्प्याचे कार्य, भूमिका आणि स्वत:चा एक अजेंडा असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एखादा रस्ता बांधायचा झाल्यास अथवा पूल उभारायचा झाल्यास या सहाही क्षेत्रांत प्रवीण असलेली डोकी एकत्र येऊन काम करणे आवश्यक ठरते. यापैकी किमान तीन कामांमध्ये दंडवते यांच्या ध्रुव कन्सल्टन्सीचे प्रावीण्य सिद्ध झाले असून, त्यांनी त्यात बऱ्यापैकी नावलौकिक कमावलेला आहे. सावित्री पुलाचे कामही विहित मुदतीच्या आधीच पूर्ण होण्यात विविध टप्प्यांच्या काटेकोर केल्या गेलेल्या आखणीने मोठी भूमिका बजावली असून, त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेही गेले आहे.

‘‘ग्राहकाच्या अपेक्षेपेक्षा एक पाऊल कायम पुढे ठेवून, सरस कामगिरी करून दाखविणे, हेच ब्रीद राखून काम करीत आलो. एकच्या ऐवजी दीड गोष्ट करून दाखविण्याच्या कर्तबगारीचे चीजही झाले,’’ असे दंडवते त्यांच्या आजवरच्या व्यावसायिक प्रवासाचे वर्णन करतात. पायाभूत सोयीसुविधासारख्या अर्थव्यवस्थेला विकासाची चाके बहाल करणाऱ्या क्षेत्रात आपल्या सेवा गुणवत्तेने अढळपद मिळविण्याचा ध्रुव कन्सल्टन्सीचा मानस असल्याचे ते सांगतात. बहुतांश अभियंतेच असलेल्या ४०० निष्णात कर्मचाऱ्यांची फौज त्यासाठी तैनात असून, येत्या काळात हा फौजफाटा वाढवत नेण्याचा त्यांचा इरादा आहे.

पंढरपूरमध्ये जन्म, प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्ये. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे पांडुरंग दंडवते यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यासरशी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागणे हे ओघाने क्रमप्राप्तच. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यशही मिळविले. सार्वजनिक बांधकाम विभागात डेप्युटी इंजिनीअर म्हणून औरंगाबाद येथे त्यांची सेवा कारकीर्द सुरू झाली. १९९८ मध्ये पदोन्नतीसह त्यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये बदली झाली. राज्यात त्या वेळी युतीचे सरकार होते. रस्ते महामंडळाने त्या वेळी हाती घेतलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये मुंबईतील ५२ उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे प्रतिष्ठेचे प्रकल्प होते. दंडवते यांचा त्या वेळी ५२ पैकी १६ उड्डाणपुलांच्या घडणीत प्रत्यक्ष सहभाग होता. त्यातही सर्वाधिक लांबीच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या जेजे उड्डाणपुलाचे काम त्यांच्या देखरेखीत पूर्ण झाले.

राज्यात सर्वत्र वेगाने नागरीकरण आणि केंद्र व राज्यातील सरकारांचा पायाभूत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी कामांचा सपाटा तेव्हापासूनच सुरू झाला होता. दंडवते सांगतात, ‘‘निर्णय घ्यायची हीच ती घडी होती आणि संधीही होती. नोकरी की स्व-व्यवसाय या मनात सुरू राहिलेल्या द्वंद्वातून अखेर एका पर्यायाची निवड केली. दोन्ही ठिकाणी सारख्या गोष्टी कामी येतात. कौशल्य, अनुभव आणि समर्पणवृत्ती दोन्हींत गरजेची. या गोष्टी कामगिरीतून सिद्ध करून दाखविणारा आत्मविश्वास एक तपाच्या सरकारी नोकरीने निश्चितच दिला होता. २००२ साली सेवानिवृत्ती घेऊन अखेर स्वत:ची सल्लागार सेवा देणारी कंपनी सुरू केली.’’

ध्रुव कन्सल्टन्सीची सुरुवात २०० चौरस फुटाच्या भाडय़ाच्या जागेत, स्वत:सह पाच कर्मचाऱ्यांनिशी झाली. सरकारी महामंडळे आणि प्राधिकरणाची कामे खूप सारी असली तरी कंपनीच्या नावे पूर्वानुभव नसल्याने त्यासाठी पात्रता ठरत नव्हती. त्यामुळे काही खासगी कामे, संयुक्त भागीदारीची कामे करीतच मार्गक्रमणा करीत राहण्याशिवाय पर्याय नव्हता.

‘‘उणी-पुरी १० वर्षे अशाच कामात गेली. काम कितीही हाय क्लास आणि हॅण्डसम झाले तरी खासगी क्षेत्रातून योग्य तो आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेत मेहनताना मिळविणे खूपच जिकिरीचे ठरत होते,’’ दंडवते यांनी सांगितले. तथापि दहा वर्षांनंतर आधुनिक राष्ट्राची जीवनवाहिनी ठरणाऱ्या महामार्ग, रस्ते, पूल, बोगदे या सरकारने हाती घेतलेल्या कामात सहभागाची ध्रुवला संधी मिळत गेली.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग २००२ मध्ये बांधला गेला आणि त्याने महाराष्ट्राला वेगवान युगाचा प्रत्यय दिला. योगायोगाने ध्रुवचे स्थापना वर्षही तेच आहे. आज इतकी वर्षे सरल्यानंतर, द्रुतगती म्हणवल्या गेलेला मुंबई-पुणे महामार्गदेखील वाहनांच्या वाढलेल्या प्रचंड वर्दळीमुळे प्रसंगी मोठय़ा वाहतूककोंडीचा मार्ग बनला आहे. आसपास बहरलेला निसर्ग असतानाही, वाहनांचा अविरत प्रवाह व कोंडीमुळे सर्वाधिक प्रदूषित आणि अपघातग्रस्त म्हणूनही त्याची ओळख बनत चालली आहे. या समस्येवर शाश्वत तोडगा तोही तातडीने काढला जाणे आवश्यक होते आणि ध्रुवने त्याचे उत्तर दिले. या महामार्गाच्या क्षमता वाढीस हातभार लावणाऱ्या खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्थेपर्यंतच्या गहाळ दुव्याच्या बांधकामाचा तोडगा पुढे आला आणि त्याचे आरेखन ध्रुवकडून केले गेले. ‘मिसिंग लिंक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पावर काम सुरूही झाले आहे.

सरकारसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सावित्री नदीवरील पुलाचे काम वेळेआधी पूर्णत्वाला नेणे. बरोबरीने मोबाइल पूल तपासणी युनिटच्या (एमबीआययू) मदतीने नदी-नाल्यांवरील पूल आणि छोटय़ा कमानी पुलांचे मान्सूनपूर्व काळात आणि मान्सूननंतर अशी वर्षांतून दोनदा तपासणी करून तीन वर्षांसाठी डेटा गोळा करण्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मिळाले. महाराष्ट्र आणि गुजरातमधील ६० मीटरपेक्षा मोठय़ा लांबीचे हजारांहून अधिक पूल तर त्या व्यतिरिक्त अन्य लहान-सहान साडेसहा हजार पुलांच्या तपासणीचे काम सध्या सुरू आहे. अर्थात अनेक ठिकाणी दुरुस्ती, मूल्यवर्धनाच्या कामांची संधीही कंपनीला खुणावत आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई बाजारमंचावर मार्च २०१८ मधील सूचिबद्धता हे ध्रुवच्या प्रवासातील महत्त्वाचे वळण होते. एक कोटींचे भागभांडवल उभे करण्यात लोकांचा हातभार लागावा अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात अडीचपट अधिक प्रतिसाद या भागविक्रीला (आयपीओ) मिळाला. तेथे तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर येत्या मार्चमध्ये कंपनीचे समभाग मुख्य भांडवली बाजारात सूचिबद्ध होतील. एकूण ३२३ कोटींच्या कंत्राटांवर कामे सुरू आहेत आणि आणखी हजार कोटींच्या कामासाठी निविदांवर निकाल अपेक्षित आहे. कोविडग्रस्त टाळेबंदीने बराच मोठा कालावधी फस्त करूनही यंदा वार्षिक उलाढाल ५० कोटींपल्याड जाणे अपेक्षित आहे. मुलगी तन्वीसारख्या तरुण खांद्यांची साथ मिळाली इतकेच नाही, तर आज व्यवस्थापकीय संचालक म्हणून कंपनीची मुख्य जबाबदारी वाहण्याचे भानही तिने कमावले, ही खूपच समाधानाची बाब असल्याचे दंडवते सांगतात.

मिळेल त्या कामावर रात्रं-दिवस कष्ट घेऊन हळूहळू विश्वासार्हता निर्माण करीत ख्यातिमूल्य अर्थात गुडविल वाढवीत नेले पाहिजे. सेवा व्यवसाय मग तो कोणताही का असेना गुणवत्तेबरोबरीने या गोष्टींनाही अतीव महत्त्व आहे, असा दंडवते यांचा नवव्यावसायिकांना सल्ला आहे. त्यांच्या मते, समोरच्याची अपेक्षा एकाची असताना, दीड कामगिरी करून दाखवण्याची धमक ज्याकडे असते त्यांना यशाच्या शिडय़ा सदैव खुल्या असतात.

पांडुरंग दंडवते संस्थापक, ध्रुव कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस लि.

* व्यवसाय  :  अभियांत्रिकी सल्लागार सेवा

* कार्यान्वयन  :  २००२  साली

* प्राथमिक गुंतवणूक : १  लाख रुपये

* सध्याची उलाढाल : वार्षिक ५० कोटी रुपये

* कर्मचारी संख्या  :  सुमारे ४०० नियमित

* संकेतस्थळ : : https://dhruvconsultancy.in/

– सचिन रोहेकर

* लेखक ‘लोकसत्ता’चे मुंबईस्थित प्रतिनिधी

sachin.rohekar@expressindia.com