23 February 2020

News Flash

कुटुंबाचा अर्थसंकल्प

देशाच्या संकल्पाप्रमाणे आपण कुटुंबाच्या अर्थसंकल्पाबाबत तेवढेच सतर्क असायला हवे.

(संग्रहित छायाचित्र)

देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल आपण खूप काही ऐकतो व बोलतोही. अर्थमंत्र्यांकडून आपण खूप अपेक्षाही ठेवतो. अर्थसंकल्पाला असलेल्या नाना पैलू-कंगोऱ्यातून कुणाची अपेक्षापूर्ती तर कुणाचा अपेक्षाभंग होणे स्वाभाविकच! मात्र देशाच्या संकल्पाप्रमाणे आपण कुटुंबाच्या अर्थसंकल्पाबाबत तेवढेच सतर्क असायला हवे. कसे, तर चर्चा करूया.

कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?

कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्त्वाचे असते.

कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागू शकतो – १) दैनंदिन गरजांसाठीचा खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठीचा खर्च ३) दैनंदिन खर्चासाठी बचत ४) दीर्घकालीन योजनांसाठी गुंतवणूक.

या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे म्हणता येईल.

आपले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन ध्येय असे असावे की ते आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्याचा आपल्या नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तिनियोजन वगैरे आदी झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.) स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण भविष्यात होणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे. उदाहरणार्थ – आपल्याला येत्या चार वर्षांत नवीन वाहन घ्यायचे झाल्यास केवळ वाहनाचे ‘एक्स-फॅक्टरी’ किमतीसाठी नियोजन करून चालणार नाही. आपल्याला वाहनाचे ‘डाऊन पेमेंट’, मासिक हप्ता, नोंदणी, वाहनाचा विमा, पेट्रोल वा डिझेल, वाहनचालक ठेवायचा असल्यास त्याचा खर्च आणि नियमित वाहनाचे देखभाल आदी सर्व खर्चाचा आपल्या आर्थिक नियोजनात अंतर्भाव करावा लागेल. अशा पद्धतीने योग्य व सविस्तर नियोजन केल्यास आपल्यावर घरी पांढरा हत्ती पाळण्याची वेळ येण्याची भीती राहात नाही. महागाईमुळे होणारी खर्चातील संभाव्य वाढ लक्षात घेतली नाही तर कुटुंबाचा अर्थसंकल्प कोलमडू शकतो. अशा प्रकारे योग्य नियोजन केल्यास कोणताही ताण न घेता आपण ठरवलेले ध्येय विहित कालावधीत पूर्ण करू शकतो.

दैनंदिन खर्चाचे प्रभावी नियोजन कसे करावे?

महिन्यातील खर्चाची यादी बनवावी. त्यात नियमित खर्च (जसे विजेचे/दूरध्वनी-भ्रमणध्वनी/स्वयंपाकाचा गॅस आदींचे देयक वगैरे) तसेच अनियमित खर्च (जसे खरेदी, खानपान, पर्यटन वगैरे) भागवण्याकरिता बचतीची आवश्यकता असते. त्यासाठी आपण बँकेचे बचत खाते, आवर्ती जमा खाते (आरडी) किंवा म्युच्युअल फंडाचे लिक्वि ड फंड आदींमध्ये बचत करू शकतो. तसेच खरेदीला जाताना आपली खरेदीची यादी जवळ बाळगावी. आजच्या ‘मॉल’ संस्कृतीमध्ये बऱ्याच वेळेला आपण अनावश्यक गोष्टी अधिक प्रमाणात खरेदी करत असतो. आपल्या दैनंदिन खर्चाचा आढावा दर तीन-चार महिन्यांनी घ्यावा. यामुळे आपल्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपल्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करण्याकरिता ठरावीक रक्कम बाजूला काढणे व उरलेल्या रकमेत आपले दैनंदिन खर्च भागविले पाहिजेत.

जीवन विमा व आरोग्य विमा

याची तरतूद किती महत्त्वाची?

कुटुंब प्रमुखाचा मोठय़ा रकमेचा मुदतीचा विमा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुदतीच्या विम्यात कमी हप्त्यात अधिक विमा कवच मिळते. त्यामुळे विमा हप्त्याची तरतूद अत्यावश्यक आहे. तसेच घरात कधी काही मोठे आजारपण आले तर आपल्या नियोजनावर त्याचा भार पडतो व आपले अर्थसंकल्प कोलमडू शकते. पूर्ण कुटुंबाच्या आरोग्य विम्याची तरतूद केल्याने असे खर्च विमा कंपनी उचलते. परिणामी आपल्या आर्थिक नियोजनाला कोणताही धक्का लागत नाही.

कौटुंबिक अर्थसंकल्प योग्य

गुंतवणुकीसाठी  मदतकारक कसे?

जेव्हा आपण अल्पकालीन तसेच दीर्घकालीन ध्येय किंवा ठराविक उद्दिष्टे ठरवितो तेव्हा त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक योग्य ठरेल ते आपण आपल्या नियोजनातून ठरवू शकतो. आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आपण बँकेच्या बचत खात्याचा उपयोग करू शकतो. आपल्या वेगवेगळ्या कालावधीच्या उद्दिष्टांसाठी आपण म्युच्युअल फंडच्या भिन्न योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ – १) एक वर्षांनंतर नवीन दूरचित्रवाणी संच घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंड च्या ‘अल्ट्रा शॉर्ट टर्म’ गटवारीतील फंडांमध्ये गुंतवणूक करावी. २) ३ ते ४ वर्षांनंतर नवीन वाहन घ्यायचे असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या ‘हायब्रीड’ श्रेणीतील फंडांमध्ये गुंतवणूक करावी. ३) मुलांचे उच्च शिक्षण/निवृत्तिजीवन या सारख्या १५ ते २० वर्षांनंतरच्या स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंडच्या ‘इक्विटी’ गटवारीत गुंतवणूक करावी. योग्य योजनांचे संयोजन करण्यासाठी आपले आर्थिक सल्लागार आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. म्युच्युअल फंडाची एसआयपी आपल्याला कुटुंबाच्या अर्थसंकल्पात मदत करतात. दरमहा आपण आपल्या एसआयपीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढली की उरलेल्या रकमेत आपल्याला दैनंदिन खर्च भागवायचे असतात. त्यामुळे आपोआप आपण शिस्तबद्ध होतो व आपल्या अनावश्यक खर्चाला आळा बसतो.

वेगवेगळ्या वयोगटासाठी अर्थसंकल्प  निराळा असतो का?

निश्चितच. आपण तरुण असताना आपले ध्येय वेगळे असतात. तसेच जोखीम घेण्याची क्षमताही अधिक असते. या वयात चैनी वस्तूवर खर्च करण्यावर अधिक कल असतो. तरुण असताना आपल्या गुंतवणुकीत ‘इक्विटी’ श्रेणीचा अधिक प्रमाणात समावेश करू शकतो. वाढत्या वयात कौटुंबिक जबाबदारी वाढली की जोखीम घेण्याची क्षमता कमी होते तसेच या वयात सांसारिक खर्च जास्त असतात. आपण ‘हायब्रीड’ गटात गुंतवणूक करावी. निवृत्तीपश्चात आपण सर्वस्वी आपल्या गुंतवणुकीतील उत्पन्नावर अवलंबून असतो. निवृत्ती जीवनातील आपले खर्च हे पूर्णपणे वेगळे असतात. अशावेळी किरकोळ गुंतवणूक ‘इक्विटी’ श्रेणीत व अधिक गुंतवणूक स्थिर अशा ‘डेट’ गटवारीत करावी. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कौटुंबिक अर्थ संकल्प बदलत जातो.

कौटुंबिक अर्थसंकल्पात आपत्कालीन संकट किंवा खर्चाची तरतूद कशी करावी?

आपत्कालीन खर्च कधीही उद्भवू शकतात व आपले आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडू शकते. त्यासाठी आपण आपत्कालिन निधीची तरतूद करावी. साधारणत: सहा महिन्यांचे उत्पन्न आपत्कालिन निधी म्हणून बाजूला काढून ठेवावी. यासाठी आपण म्युच्युअल फंडाच्या ‘लिक्विड फंड’ या श्रेणीची निवड करू शकतो.

आपला कौटुंबिक अर्थसंकल्प मांडताना सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेऊ न योग्य नियोजन करावे. त्याचे नियमित पुनरावलोकनही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या अनावश्यक खर्चाला आळा बसेल व आखलेली उद्दिष्टे ठरवलेल्या कालावधीत आणि तीदेखील कोणताही ताण न घेता पूर्ण करू शकू.

– नीलेश तावडे

* लेखक वित्तीय नियोजनकार

First Published on February 3, 2020 4:04 am

Web Title: article on family budget abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : बाजाराचा अपेक्षाभंग आता पुढे काय?
2 अर्थ वल्लभ : काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास!
3 थेंबे थेंबे तळे साचे : बेनामी मालमत्ता दुसऱ्याच्या नावाने गुंतवणूक करताना..
Just Now!
X