अजय वाळिंबे

दिवंगत शंतनुराव किर्लोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली १९५८ मध्ये स्थापन झालेली किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी ही किर्लोस्कर समूहातील एक महत्त्वाची इंजिनीयरिंग कंपनी आहे. गेल्या ६० वर्षांत कंपनीने जागतिक दर्जाच्या विदेशी कंपन्यांच्या साहाय्याने विविध उत्पादनांत पदार्पण करून मोठा पल्ला गाठला आहे. किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी प्रामुख्याने तेल व वायू, अभियांत्रिकी, स्टील, सीमेंट, खाद्य व पेय क्षेत्रातील इंजिनीयरिंग उत्पादने आणि कॉम्प्रेशन व ट्रान्समिशन व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचा कॉम्प्रेशन विभाग वायू, रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर, पॅकेजेस आणि सिस्टमच्या विस्तृत श्रेणीचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा आणि उभारणी इ. कार्यान्वित करण्यात गुंतलेला आहे. तर ट्रान्समिशन विभाग पवनचक्की, औद्योगिक आणि मरिन अ‍ॅप्लिकेशन्ससाठी डिझाइन, उत्पादन आणि रेल्वे कर्षण गिअर्स तसेच सानुकूलित गिअरबॉक्स उत्पादनात आहे.

पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीचे महाराष्ट्रात पुणे आणि सासवड येथे तीन उत्पादन प्रकल्प असून देशभरात सात शाखा आहेत. २००२ मध्ये कंपनीने के. जी. खोसला कॉम्प्रेसर्स या कंपनीचे बहुतांशी भांडवल खरेदी करून ती कंपनी विलीन करून घेतली. औद्योगिक क्षेत्रावर मंदीची छाया असल्याने कंपनीने गेल्यावर्षी सुमार कामगिरी केली होती आणि त्याचा परिणाम शेअरच्या बाजारभावावर देखील झाला. मात्र यंदाच्या वर्षांत कंपनीच्या कामकाजात सुधारणा दिसत असून त्याचे प्रतिबिंब आर्थिक निष्कर्षांवर देखील दिसत आहे. डिसेंबर २०१९च्या संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २२१.२६ कोटी (गेल्या वर्षी १३३.८३ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर १८.१७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो तब्बल ५४९ टक्क्य़ांनी अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत तसेच आगामी आर्थिक वर्षांत कंपनीच्या कामगिरीत भरीव सुधारणा अपेक्षित आहे. नगण्य कर्जभार असलेली किर्लोस्कर समूहाची ही कंपनी एक आकर्षक खरेदी ठरू शकेल.

टप्प्याटप्प्यानेच खरेदी..

गेला आठवडाभर शेअर बाजारात मंदी आहे. देशांतर्गत आर्थिक स्थिती नाजूक असतानाच करोना विषाणूची बाधा शेअर बाजारालाही झाल्याने गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा आकर्षक भावात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या संधीचा फायदा घेता येईल. मात्र नवीन खरेदी अथवा विक्रीही टप्प्याटप्प्याने केली जावी.

किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड

(बीएसई कोड – ५०५२८३)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १३८/-

मायक्रो कॅप

व्यवसाय : कॉम्प्रेसर्स

बाजार भांडवल : रु. ९४६ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  २१० / ११५

भागभांडवल : रु. १२.८४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ५३.८७

परदेशी गुंतवणूकदार  १.६०

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २३.९०

इतर/ जनता    २०.६३

पुस्तकी मूल्य : रु. ७६.९

दर्शनी मूल्य :   रु. २/-

लाभांश :  १२५%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ९.६३

पी/ई गुणोत्तर : १५.३

समग्र पी/ई गुणोत्तर :    २३.८

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १३३

रिटर्न ऑन कॅपिटल : १७.०९

बीटा :    ०.७