कौस्तुभ जोशी

एखाद्या वेळी अचानकपणे अपेक्षा नसताना किंवा भाकीत वर्तवले नसताना कंपनीला, एखाद्या शेअर बाजारातल्या ट्रेडरला, गुंतवणूकदाराला, तुम्हा-आम्हाला कोणालाही अकस्मात घसघशीत लाभ होतो यालाच ‘विंडफॉल गेन’ म्हणजेच अकल्पित लाभ असे म्हणतात.

आपल्याला अपेक्षा नसताना लाभ झाल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाटते! पण ही सारखी सारखी घडून येणारी घटना नाही. एखाद्या व्यक्तीला वारसाहक्काने लाखो रुपयांची संपत्ती मिळणे यामध्ये, वारस असणे याव्यतिरिक्त त्या व्यक्तीचे स्वकर्तृत्व कमीच भरते.

संपत्ती कधी मिळेल? याविषयी कोणतीही शाश्वती नसताना अचानक झालेला लाभ हा विंडफॉल समजला जातो. अगदी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्याला अचानक झालेला धनलाभ हासुद्धा विंडफॉल समजला जातो.

काही कारणास्तव एखाद्या शहरांमध्ये किंवा भौगोलिक क्षेत्रांमध्ये रियल इस्टेटचे दर लक्षणीयरीत्या वाढतात आणि त्यामुळे त्या क्षेत्रात जर एखाद्याची जमीन किंवा घर असेल तर ते विकून मिळालेला नफा विंडफॉल सदरामध्ये मोडतो. इथे एक मुद्दा समजून घ्यायला हवा, स्थावर मालमत्तेचे दर हे नेहमीच काही वर्षांनंतर वाढताना दिसतात. त्यामुळे नियमित झालेल्या दरातील वाढ येथे अपेक्षित नाही. आकस्मिकरीत्या दर वाढले आणि त्याचा लाभ विक्रेत्यांना झाला तर त्याला विंडफॉल म्हटले जाते.

समजा क्रूड ऑइलचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव अचानकपणे कोसळले तर क्रूड ऑइल तुलनात्मकदृष्टय़ा स्वस्तात उपलब्ध होते व याचा विंडफॉल पद्धतीने लाभ सरकार घेऊ शकते आणि सध्या आपले सरकार घेतही आहे.

म्हणजे कसे? तर क्रूड ऑइलची किंमत पडल्यानंतर समजा ते पाच रुपयाने स्वस्त होणे अपेक्षित असेल तर सरकार भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत पाच रुपयांनी कमी करत नाही तर तेवढय़ा रुपयाचे अप्रत्यक्ष कर वाढवते म्हणजेच जो विंडफॉल लाभ ग्राहकांना मिळायला हवा तोच सरकार स्वत:च्या पदरात पाडून घेते. मागच्या दहा वर्षांमध्ये जेव्हा क्रूड ऑइलचे आंतरराष्ट्रीय दर कोसळले. त्यावेळेला सरकारने अशा पद्धतीने अप्रत्यक्ष कराची योजना वापरून स्वत:चा लाभ करून घेतलेला आहे. याचे राजकीय पडसाद कसेही उमटत असले तरीही हे अजिबात अशास्त्रीय नाही.

विंडफॉल कर

जेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये आकस्मिक लाभ होत असतो तेव्हा विंडफॉल फायदा तयार होतो आणि त्याचा काही हिस्सा म्हणून सरकार त्यावर कर आकारते. यालाच विंडफॉल कर असे म्हणतात. आकस्मिकरीत्या झालेले लाभ करपात्र ठरवून सरकारने त्यावर कर आकारावा आणि त्या कराचा वापर लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजनांसाठी करावा अशी अपेक्षा असते

याची दुसरी बाजू अशी की विंडफॉल लाभ झाल्यामुळे होणारे फायदे फक्त काही व्यक्ती व संस्थांपुरते मर्यादित न राहता सरकारच्या माध्यमातून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा.

* लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com