• प्रश्न : मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो. माझी पत्नी नोकरी करत नाही, ती गृहिणी आहे. मी तिच्या नावाने शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या शेअर्सवर झालेला नफा किंवा तोटा मला माझ्या विवरणपत्रात दाखवावा लागेल का की माझ्या पत्नीच्या?   – अशोक बने, तळेगाव

उत्तर : पत्नीच्या नावाने पतीने गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न पतीला करपात्र आहे. मोबदल्याविना पैसे किंवा संपत्ती पती/पत्नी, अजाण मुलगा/मुलगी (१८ वर्षांखालील) किंवा सून यांना हस्तांतरित केली तर हस्तांतरित केलेली रक्कम करपात्र नाही, कारण ठरावीक नातेवाईकांना दिलेल्या भेटी किंवा मोबदल्याविना हस्तांतरित केलेली रक्कम किंवा संपत्ती, भेट मिळालेल्या नातेवाईकाला करपात्र नाही. परंतु या पैशातून किंवा संपत्तीतून त्यांनी मिळविलेले उत्पन्न मात्र पैसे किंवा संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याला करपात्र असते. त्यामुळे आपल्या पत्नीला शेअर्सवर झालेला नफा आपल्या विवरणपत्रात दाखवून त्यावर तुम्हाला करसुद्धा भरावा लागेल. आपल्या पत्नीला मिळालेला लाभांश (१० लाख रुपयांपेक्षा कमी) आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा, ज्यावर (रोखे उलाढाल कर) एसटीटी भरला आहे, असा करमुक्त आहे, त्यावर मात्र आपल्याला कर भरावा लागणार नाही.

  • प्रश्न : मी एक शेतकरी आहे. माझा शेतीव्यतिरिक्त विटा बनविण्याचा धंदा आहे. हा धंदा करपात्र आहे का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की, विमा कंपनीकडून शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली तर ती करपात्र आहे का?   – अमोल कासार, नाशिक

उत्तर : शेतीपासून झालेले उत्पन्न करमुक्त आहे. अशा करमुक्त उत्पन्नामध्ये विटा बनविण्याच्या उत्पन्नाचा समावेश होत नाही. विटा बनविण्याचे उत्पन्न करपात्र आहे. शेतमालाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई विमा कंपनीकडून मिळाल्यास ती करपात्र नाही.

  • प्रश्न : माझा २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी निवासी दर्जा ‘अनिवासी भारतीय’ असा आहे. माझे भारतातील उत्पन्न शून्य आहे. मी जुलै २०१८ मध्ये भारतात परत येत आहे. मी विवरणपत्र जुलै २०१८ मध्ये भरले तर मला दंड भरावा लागेल का?   – विजय चव्हाण, मुंबई

उत्तर : आपले भारतात करपात्र उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही. आर्थिक वर्ष २०१६-१७ (करनिर्धारण वर्ष २०१७-१८) वर्षांचे विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै २०१७ असली तरी दंड न भरता ३१ मार्च २०१८ पूर्वी विवरणपत्र भरता येते. १ एप्रिल २०१८ नंतर आर्थिक वर्ष २०१६-१७ सालचे विवरणपत्र दाखल करता येणार नाही.

  • प्रश्न : मी एक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये माझे एकूण उत्पन्न ६,३४,६८०/- इतके असेल. (यामध्ये बचत खात्यावरील व्याज १२,००० रुपयांचा समावेश आहे.) मी या वर्षी ३०,००० रुपयांची रक्कम ‘कलम ८० सी’अंतर्गत मुदत ठेवीत गुंतविली आहे. मला कर किती आणि कधी भरावा लागेल?    – एल. एम. करंजकर, मुंबई

उत्तर : आपल्या उत्पन्नावर खालीलप्रमाणे कर भरावा लागेल.

(कोष्टक पाहावे)

आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे हा कर आपल्याला ३१ जुलै २०१८ पूर्वी विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी भरावा लागेल. आपल्या उत्पन्नात जर धंदा-व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल तर आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात आणि त्यानुसार आपल्याला मार्च २०१८ पूर्वी १००% कर भरावा लागेल.

  • प्रश्न : माझी मुंबईत एक सदनिका खरेदी करण्याबाबत बोलणी सुरू आहेत. किंमत साधारण २ कोटी रुपयांपर्यत आहे. मी ज्या व्यक्तीकडून सदनिका खरेदी करणार आहे ते अनिवासी भारतीय आहेत आणि विक्रीतून मिळालेले पैसे दुसऱ्या सदनिकेमध्ये गुंतविणार आहेत, त्यामुळे त्यांचे या व्यवहारात करदायित्व नाही. मला या विक्रीवर उद्गम कर (टीडीएस) न कापण्याची विनंती ते करीत आहेत. मी त्यांची विनंती मान्य करू शकतो का? – कुणाल जोशी, मुंबई

उत्तर : ‘कलम १९४ आयए’प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना खरेदीदाराने किमतीच्या १% इतका उद्गम कर (टीडीएस) कापणे आणि सरकारकडे जमा करणे बंधनकारक आहे. स्थावर मालमत्तेची किंमत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ही तरतूद आणि स्थावर मालमत्ता विक्री करणारा निवासी भारतीय असेल तरच लागू आहे. विक्री करणारा अनिवासी भारतीय असेल तर त्याला कलम १९५ प्रमाणे उद्गम कर कापावा लागतो. आपल्याबाबतीत सदनिका विक्री करणारा आपल्याला उद्गम कर न कापण्याची विनंती करीत असेल तर त्याला त्याच्या प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून ‘कलम १९७’नुसार उद्गम कर न कापण्याचे किंवा कमी दराने कापण्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे प्रमाणपत्र आपल्याला सादर केले तरच त्या प्रमाणपत्रानुसार उद्गम कर न कापता किंवा कमी दराने कापून त्याला विक्री किंमत देता येईल.

  • प्रश्न : मी २० डिसेंबर २०१७ रोजी महिंद्र आणि महिंद्र कंपनीचे ५ शेअर्स ७,७७५ रुपयांना खरेदी केले. या शेअर्सवर मला २६ डिसेंबर, २०१७ रोजी ५ शेअर्स बोनस मिळाले. असे एकूण माझ्याकडे १० शेअर्स झाले. यातील ५ शेअर्सची मी आता विक्री करत आहे आणि एकूण विक्री किंमत ३,८३० इतकी असेल. या विक्रीनंतर मला ३,९४५ रुपये इतका तोटा होईल. हा तोटा मला इतर नफ्यातून वजा करता येईल का? बोनस शेअर्सची विक्री केल्यानंतर त्यावर किती कर भरावा लागेल? – राजेंद्र मंदावकर , पुणे</strong>

उत्तर : आपण कंपनीच्या शेअर्सची खरेदी केल्याच्या तारखेपासून एक वर्षांच्या आत शेअर्सची विक्री केल्यामुळे आपणाला होणारा तोटा हा अल्प मुदतीचा भांडवली तोटा असेल. अल्प मुदतीचा भांडवली तोटा लघु मुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो. साधारणत: बोनस जाहीर झाल्यानंतर शेअरच्या किमती वाढतात आणि बोनस शेअर्सचे वितरण झाल्यानंतर शेअर्सच्या किमती कमी होतात. याला ‘बोनस स्ट्रीपिंग’ असे म्हणतात. प्राप्तिकर कायदा कलम ९४ (८) नुसार म्युच्युअल फंडातील युनिट्सची बोनस जाहीर केल्यानंतर चढय़ा भावाने खरेदी आणि बोनस वितरित झाल्यानंतर मूळ युनिट्सची कमी भावाने केलेल्या विक्रीवर होणारा तोटा हा भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. असे व्यवहार करणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कर चुकविण्याच्या उद्देशाने केलेले ‘बोनस स्ट्रीपिंग’चे व्यवहार प्राप्तिकर खात्यातर्फे तपासले जाऊ शकतात. या कलमाच्या तरतुदी फक्त म्युच्युअल फंडातील युनिट्सच्या व्यवहारासाठी लागू आहेत, शेअर्ससाठी नाहीत. यामुळे आपणास मूळ शेअर्सच्या विक्रीवर झालेला तोटा इतर भांडवली नफ्यातून वजा करता येईल. हा भांडवली तोटा उत्पन्नातून वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो.

जेव्हा बोनस मिळालेल्या शेअर्सची विक्री केली जाते तेव्हा मात्र त्याच्या धारणकाळाप्रमाणे त्याची करपात्रता ठरते. शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी ज्या दिवशी बोनस जाहीर झाला त्या दिवसापासून एका वर्षांच्या आत या बोनस शेअर्सची विक्री केल्यास त्यावर १५ टक्के इतका कर भरावा लागेल आणि बोनस जाहीर केलेल्या दिवसापासून एक वर्षांनंतर शेअर्स विकले तर कलम १०(३८) नुसार दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असेल. बोनस शेअर्सचा भांडवली नफा गणताना खरेदी मूल्य ‘शून्य’ असे गृहीत धरावे.

प्रवीण देशपांडे

pravin3966@rediffmail.com

(वाचकांच्या मनात प्राप्तिकर कायद्याविषयीचे प्रश्न खाली दिलेल्या ई-मेलवर पाठवावेत. प्रश्न विचारताना आपले नाव, गाव किंवा शहराचे नाव याचा उल्लेख असावा. शक्यतो मराठी (युनिकोडमध्ये) टाइप केलेला प्रश्न हा नेमका असावा आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून शंकेचे निरसन करता येईल.)