|| आशीष ठाकूर

भारतीय वायुदलाने अचूक लक्ष्यवेध करत, अतिरेक्यांचा बीमोड केल्याच्या आनंदात आता तरी निफ्टी निर्देशांक १०,९०० चा स्तर वायुवेगाने पार करेल अशी अशा होती. नव्हे तसा प्रयत्नदेखील झालेला. पण हवेतल्या हवेत तेजीचे इंधन न भरले गेल्याने तेजीची विमाने पुन्हा १०,७०० ते १०,९०० च्या धावपट्टीवर विसावली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  •  सेन्सेक्स : ३६,०६३.८१
  •  निफ्टी : १०,८६३.५०

निफ्टीवर सध्या चालू आहे त्याप्रमाणे २०० अंशांच्या पट्टय़ात बाजार वर-खाली करत आहे. ज्याचा सर्वानाच आता कंटाळा आला आहे. ना धड वर ना खाली! अशा या बाजाराच्या कंटाळवाण्या चालीची उकल तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत करू या.

हा चढ-उतार (करेक्शन) दोन प्रकारात मोडतो. पहिला कालानुरूप (टाईमवाईज) व दुसरी किमतींमध्ये (प्राईसवाईज)!

आताच्या घडीला निफ्टीची चाल २०० अंशांमध्ये स्थिर ठेवून- यात मग युद्धजन्य परिस्थितीच्या घबराटीमुळे भावांची घसरण असो, अथवा सुखद बातम्यांमुळे मिळणारी वरची चाल असो-  गोळाबेरीज करता निफ्टी निर्देशांकांवर फक्त २०० अंशाचा चढ-उतारच दर्शविते. या स्तरावर, सेन्सेक्सवर ३५,००० व निफ्टीवर १०,५०० या पातळ्यांवर पायाभरणी होऊन वातावरण शांत झाल्यावर सेन्सेक्सवर ३७,१७० आणि निफ्टीवर ११,१००चा स्तर दृष्टिक्षेपात येईल.

या दशकाच्या उत्तरार्धात भारताच्या अखंडत्वाला चहूबाजूंनी जे आव्हान मिळत होते त्याचे उत्तर हे भारतीय जनतेने मतपेटीतून दिले. कॉंग्रेसला ‘न भुतो न भविष्यती’ अशा ४०० च्या वर लोकसभेच्या जागा मिळाल्या आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. या बहुमताच्या आधारे पंजाबमधील फुटीरतावादी खलिस्तानची समस्या हरचरणसिंग लोंगोवालबरोबर चर्चा करून ‘राजीव-लोंगोवाल’ करार केला गेला. त्यानंतर आसाम विद्यार्थी परिषदेशी, लालडेंगाशी व श्रीलंकेतील समस्या चर्चेतून सोडवून शांतता प्रस्थापित केली गेली. त्यानंतर राजीव गांधी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला.

ज्यात पगारदारवर्गाला भरीव करसवलती आणि पहिल्यांदाच पेट्रोलियमजन्य उत्पादनावर सरकारी अनुदाने कमी केली. या अर्थसंकल्पावर भाष्य करताना विधिज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी ‘स्वतंत्र भारतातील पहिला अत्युत्कृष्ट अर्थसंकल्प’ म्हणून त्याचा गौरव केला होता.

आता ज्यांनी १९८५ सालच्या लोकसभेच्या निवडणुकाअगोदर गुंतवणूक केली, त्यांचा नफा जाणून घेऊ. जानेवारी १९८५ मध्ये टाटा स्टील अवघा ४०० रुपयांवर होता. तो जुलै १९८५ मध्ये १,००० रुपये झाला. टाटा मोटर्स ४०० रुपयांवरून ९००, आयटीसी ३० वरून ६० रुपये, कॅस्ट्रॉल १०० वरून २१५ रुपये, महिंद्र अँड महिंद्र ५० वरून १०० रुपये. या गुंतवणूकदारांकडून अवघ्या सात महिन्यात किमान १०० टक्के परतावा मिळविला गेला. मुंबई शेअर बाजार निर्देशांक २८० वरून ५०० झाला.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.