18 July 2019

News Flash

उष:काल होता होता भाग – २

बाजाराचा तंत्र कल

(संग्रहित छायाचित्र)

|| आशीष ठाकूर

गेल्या महिनाभराच्या, निफ्टीच्या कंटाळवाण्या, रटाळ चालीचा सर्वानाच कंटाळा आलेला, अशा वेळेला गुंतवणूकदार ‘नको देवराया अंत आता पाहू’ हे भक्तिगीत आळवायच्या तयारीत असतानाच, निफ्टीने अशी मोहक गिरकी घेतली की, भक्तिगीताचं रूपांतर भावगीतात झालं.. चाल तुरुतुरू उडती केस भुरूभुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली! या तुरुतुरू चालीत निफ्टीने एकदाचा १०,९००चा अडथळा सहजी पार केलाही!

या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स : ३६,६७१.४३

निफ्टी : ११,०३५.४०

नुकतीच निर्देशांकाला वरची चाल मिळाल्याने प्रलंबित असलेले सेन्सेक्सवरील ३७,१७० व निफ्टीवरील ११,१०० चे वरचे लक्ष्य साध्य झाले. या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण अपेक्षित असून तिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,९०० व निफ्टीवर १०,८०० असे असेल. या स्तरावर पायाभरणी (बेस फॉर्मेशन) होऊन, नंतरच वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,५०० व निफ्टीवर ११,३०० चे असे असेल.

मागील लेखाचे सूत्र पकडून आपण आता १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धाकडे वळू या. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे शांतता प्रयत्न अल्पावधीचे ठरून फार मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आणि ते आजतागायत चालू आहे ते म्हणजे बोफोर्स. या आरोप, प्रत्यारोपात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले. विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाले. या सरकारला भाजप आणि कम्युनिस्ट पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला.

आता ज्यांनी १९८९ सालच्या लोकसभेच्या निवडणुका अगोदर गुंतवणूक केली, त्यांचा नफा जाणून घेऊ. टाटा स्टील अवघा १९० रुपयांवर होता तो ऑक्टोबर १९९० मध्ये २७५ रुपये झाला. टाटा मोटर्स ११० वरून २७०, आयटीसी ६० वरून १८० आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७०० वरून १६०० झाला.

हे सुखाचे क्षण अल्पायुषी ठरले. आंतरराष्ट्रीय पटलावर इराकने कुवेतवर कब्जा करून तेलाचा व्यापार आपल्या नियंत्रणाखाली आणण्यास सुरुवात केल्याने अशांततेला सुरुवात झाली. तर भारतात केंद्र सरकारने मंडल आयोग स्वीकारल्याने दिल्लीत विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडू लागले. त्यात भर म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्येची रथयात्रा. ती अडवल्याने भाजपने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. आधीच्या दहा वर्षांचे आर्थिक बेशिस्तीचे संचित कर्म उभे ठाकले व सरकारचे आर्थिक उत्तरदायीत्व पूर्ण करण्यास सरकारकडे पैसाच उपलब्ध नव्हता. अवघ्या दीड महिन्याच्या आयातीला पुरेल एवढेच परकीय चलन, त्यात भर म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा कर्जावरील व्याजाचा हप्ता न भरल्यास भारताला दिवाळखोर जाहीर करण्याची नामुष्कीचे आव्हान समोर होते. या परिस्थितीत चंद्रशेखर यांचे धीरोदात्त उद्गार ‘किसी भी हालात में भारत के गरिमा को चोट नहीं पहुचाएंगे’ व त्या नंतरची कृती म्हणजे भारताने आपल्या सोन्याचा साठा बँक ऑफ लंडनमध्ये तारण ठेवला. तेथून पैशाची उचल घेऊन आपले उत्तरदायित्व पूर्ण केले.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on March 11, 2019 12:01 am

Web Title: bse nse nifty sensex 99