05 August 2020

News Flash

अर्थ वल्लभ : ‘हीच ती वेळ’

कामगिरी लक्षवेधक आहे पण गुंतवणूकदार ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत, तर सुमार परतावा असलेल्यांकडे मोठी मालमत्ता आहे.

आलोक अग्रवाल, निधी व्यवस्थापक, पीजीआयएम इंडिया लार्ज-कॅप फंड

वसंत कुलकर्णी

कामगिरी लक्षवेधक आहे पण गुंतवणूकदार ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत, तर सुमार परतावा असलेल्यांकडे मोठी मालमत्ता आहे. म्हणून ‘हीच ती वेळ’ योग्य ते निवडण्याची..

वर्ष २०१९ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगात अनेक बदल घडून आले. या वर्षीच्या अनेक बदलांपैकी एक बदल म्हणजे डीएचएफएल प्रामेरिका या म्युच्युअल फंडाच्या दोन प्रवर्तकांपैकी एक प्रवर्तक प्रुडेन्शियल ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (पीजीआयएम) यांनी डीएचएफएल या दुसऱ्या प्रवर्तकांचा मालमत्ता व्यवस्थापन कंपनीतील हिस्सा संपादन केला. पीजीआयएम ही अमेरिकेतील एक आघाडीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी असून त्यांचे निधी व्यवस्थापन कौशल्य काळाच्या ओघात सिद्ध झाले असले, तरी भारतीय गुंतवणूकदारांना त्याची ओळख होणे गरजेचे आहे. पीजीआयएम ही जगातील दहाव्या क्रमांकाची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असून भारतातील उपकंपनीच्या मालमत्तेचा आवाका मर्यादित असला तरी, सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन पाहणारी पीजीआयएम जगातील एक प्रमुख कंपनी आहे. डीएचएफएल प्रामेरिका ते पीजीआयएम, हा प्रवास नक्कीच खडतर असला तरी एका कारणाने तो या कंपनीसाठी फायद्याचा ठरला आहे. भारतात ४३ फंड घराणी असून यापैकी केवळ सात फंड घराणी (फ्रँकलिन टेम्पल्टन, एचएसबीसी, मिरॅ, प्रिन्सिपल वैगैरे) ‘बहुराष्ट्रीय’ या प्रकारात मोडणारी आहेत. त्यापैकी केवळ पीजीआयएम हे फंड घराणे ‘ट्रिलियन डॉलर’ मालमत्तेचे व्यवस्थापन करणारे फंड घराणे आहे. पीजीआयएमच्या प्रवर्तकांना १४० वर्षांचा मालमत्ता व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. हे फंड घराणे नव्या बदलामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यास सिद्ध झाले आहे. नवीन व्यवस्थापनाने अजित मेनन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अजित मेनन हे या आधी डीएसपी, टाटा, डीएचएफएल प्रामेरिका आणि आता पीजीआयएम म्युच्युअल फंडात जबाबदारीच्या पदांवर कार्यरत होते.

या फंड घराण्याचा पीजीआयएम इंडिया लार्ज-कॅप फंड हा परताव्यात सातत्य राखलेला फंड आहे. फंडाच्या गुंतवणुकीत जून अखेरीस ३३ तर सप्टेंबर अखेरीस २७ समभाग होते. फंडाची रचना समभागांच्या संख्येमुळे फोकस्ड फंडासारखी वाटली तरी निधी व्यवस्थापक अलोक अग्रवाल हे समभाग केंद्रित गुंतवणुकीचा अनावश्यक धोका टाळणारे निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा १६ वर्षांचा अनुभव असून जुलै २०१७ पासून ते या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्या व्यवस्थापनाखाली पीजीआयएम इंडिया लार्ज-कॅप फंड सातत्याने मानदंडापेक्षा सरस कामगिरी करण्यात यशस्वी झाला आहे. बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचली असताना निधी व्यवस्थापक परताव्यापेक्षा मुद्दल सुरक्षित राखण्यात प्राधान्य देत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विशेष म्हणजे या फंड गटातील मोठी मालमत्ता असलेले फंड मुद्दल सुरक्षित राखण्यात अपयशी होत असताना या फंडाने सातत्याने मुद्दल सुरक्षित राखल्याने या फंडाची दखल घेणे भाग आहे. नकारात्मक परिस्थितीत मुद्दल यशस्वी राखण्याची क्षमता तपासण्याची चाचणी घेतली असता एका वर्षांच्या चलत सरासरी निकषांवर फंड ८८ टक्के वेळा यशस्वी झाल्याचे दिसते. या चाचणीत फंड लार्ज कॅप फंड गटातील मिरॅ अ‍ॅसेट लार्ज कॅप आणि एसबीआय ब्लूचीप हे फंड पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप फंडापेक्षा अधिक यशस्वी झाल्याचे आढळून आले. तर फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप आणि पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप फंड यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे आढळले. या चाचणीत तीन वर्षांच्या चलत सरासरी निकषांवर फंड ९६ टक्के तर पाच वर्षांच्या चलत सरासरी निकषांवर फंड ९७ टक्के यशस्वी झाल्याचे दिसते.

या मागची कारणे तपासली असता आटोक्यात असलेली फंडाची मर्यादित मालमत्ता आणि मालमत्तेचे निधी व्यवस्थापक आलोक अग्रवाल करीत असलेले सक्रिय व्यवस्थापन अशी सागंता येतील. उदाहरणादाखल सांगायचे तर फंडाची गुंतवणूक असलेले गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे समभाग एचडीएफसी आणि बजाज फायनान्स राखून ठेवून उर्वरित अवास्तव मूल्यांकनामुळे विकून टाकले. सप्टेंबर महिन्यापासून गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या बाजारभावात मोठी घसरण झालेली पाहावयास मिळाली. वाहन आणि पूरक उत्पादनांच्या कंपन्यांचे प्रमाण मानदंडातील प्रमाणापेक्षा जुलै २०१८ पासून कमी केले. कंपन्यांनी आपापल्या विस्तार योजना लांबणीवर टाकल्याची चाहूल लागल्याने भांडवली वस्तूंशी संबंधित समभागांना वगळले आहे. या फंडाची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये १०.३८ टक्के गुंतवणूक आहे. तशी ती अनेक लार्ज कॅप फंडात आहे. परंतु निधी व्यवस्थापकांनी साधारण सप्टेंबर २०१७ पासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली. या पद्धतीने पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केल्याची मधुर फळे या फंडाच्या गुंतवणूकदारांना मिळाली. व्यापारचक्राचा प्रवास शिखराकडून तळाच्या दिशेने सुरू झाल्याला वर्ष सव्वा वर्ष होत आले आहे. व्यापारचक्र नेमके कधी स्थिरावेल आणि कधीपासून दिशा बदलेल याबाबत मत-मतांतरे असली तरी दिशा बदलास किमान दोन तिमाही वाट पाहावी लागेल. सरकारकडून झालेल्या ताज्या सुधारणांमुळे दिशाबद्दल कदाचित थोडा आधी होईल. रोख्यावरील दीर्घकालीन गुंतवणुकीवरील परतावा कमी होणे हे अर्थव्यवस्थेत पशाची मागणी कमी झाल्याचे द्योतक असल्याचे निधी व्यवस्थापकांचे मानणे आहे. अर्थव्यवस्था मंदावण्यास औपचारिक आणि अनौपचारिक वित्त पुरवठादारांच्या मनात असलेली भीती आणि मुख्यत्वे मंदावलेले व्यापारउदीम कारणीभूत असल्याची निधी व्यवस्थापकांची धारणा आहे.

सध्या कंपन्यांतून कर्मचाऱ्यांच्या ‘प्री अ‍ॅप्रायझल मीटिंग्ज’ सुरू आहेत. ‘प्री अ‍ॅप्रायझल मीटिंग’चा उद्देश कर्मचारी आणि मागील वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यापूर्वी विषयसूची इत्यादी बाबी ठरविणे हा असतो. फंड निवडीच्या ‘प्री अ‍ॅप्रायझल’ टप्प्यात नेमके कोणते फंड निवडीच्या दुसऱ्या टप्प्यात सखोल विश्लेषणासाठी घ्यायचे हे ठरते. हा टप्पा निवडीपेक्षा पहिली चाळण लावून अनावश्यक फंड वगळण्याचा टप्पा असतो. हा फंड मागील दोन वर्षे या टप्प्यात लक्षवेधक ठरला आहे. फंड निवडीची प्रक्रिया साधारण डिसेंबरअखेरीस संपते. या वर्षीची फंड निवड अनेक अर्थाने धक्कादायक ठरण्याची अपेक्षा आहे. मोठय़ा संख्येने अनोळखी फंडांचा यादीत समावेश होताना अनेक प्रस्थापितांना आपले स्थान त्यांच्या भाकड कामगिरीमुळे गमवावे लागेल असे वाटते. याची झलक लार्ज कॅप फंड निवडीच्या निमित्ताने दिसली.

लार्ज कॅप फंड गटात नव्या निकषावर आधारित किमान पाच वर्षांचा इतिहास असणारे २९ फंड आढळले. या फंडाच्या १५ ऑक्टोबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार निप्पॉन इंडिया लार्ज कॅप, एचडीएफसी टॉप १००, आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी या सारख्या दिग्गजांची गणना तळाच्या पाच फंडात तर इंडियाबुल्स लार्ज कॅप, एचएसबीसी लार्ज कॅप, एडेल्वाईज लार्ज कॅप, पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप या नवख्या फंडाचा समावेश सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडात समावेश आहे. गमतीचा भाग असा की गचाळ कामगिरी असणाऱ्या फंडाची मालमत्ता लार्ज कॅप गटातील मालमत्तेच्या ८७ टक्के आहे. ज्यांची कामगिरी लक्षवेधक आहे त्यांच्याकडे गुंतवणूकदार ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत तर सुमार परतावा असलेल्यांकडे मोठी मालमत्ता आहे. म्हणून ‘हीच ती वेळ’, थकलेल्या फंडांबाबत नव्या वर्षांत पुनर्वचिार करण्याची आणि ताज्या दमाच्या नव्या फंडाची निवड करण्याची.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 2:03 am

Web Title: dhfl promerica mutual fund invest in shares abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : परिपूर्ण पॅकेजिंग उपाययोजना!
2 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..
3 नावात काय? : बॅसल नियम
Just Now!
X