News Flash

फंडाचा ‘फंडा’.. :  अद्ययावत तंत्रजगताच्या संधींचा वेध

हा फंड अशाच गुंतवणूक संधीच्या शोधात असतो ज्या कंपन्यांत जग बदलण्याची क्षमता असेल

अतुल कोतकर

जगात घडणाऱ्या काही घटना अशा असतात ज्या काळाची विभागणी त्या घटनेच्या पूर्व आणि पश्चात अशी करतात. जसे की पहिले किंवा दुसरे महायुद्ध, भारताला मिळालेले स्वातंत्र्य, वगैरे.. करोना विषाणूजन्य साथ अशी एक घटना आहे ज्या घटनेमुळे करोनापूर्व आणि करोनापश्चात अशी काळाची विभागणी झालेली दिसते. करोनामुळे अनेक उद्योगांच्या कार्यपद्धती बदलल्या. काही उद्योग लयाला गेले तर काही नव्याने उदयाला आले. ग्राहकांच्या सवयी बदलल्या. करोनापश्चात समाज अधिक तंत्रस्नेही झाला. आभासी जगाला वास्तव समजावे लागते. करोनाकाळात ऑटोमेशन,  रोबोटिक्स, ई-व्हेइकल,  कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रांना उभारी मिळाली. जगातील सर्वाधिक तंत्रज्ञानाधारित टेक कंपन्या अमेरिकेत आहेत. आपण कोणत्याही उभरत्या तंत्रज्ञांना काम करण्यासाठी त्यांच्या स्वप्नातील ठिकाण विचारले असता उत्तर ‘सिलिकॉन व्हॅली’ असेच असेल. हे स्वप्न वास्तवात आणणे प्रत्येकासाठी सहज साध्य नसते. हे तंत्रज्ञांचे जग अल्गोरिदम, डेटा आणि कोड इत्यादी आज्ञावलीभोवती फिरत असले तरी अमेरिकेतल्या सर्वोत्कृष्ट टेक हबमध्ये जाण्याचा पासवर्ड सर्वानाचा प्राप्त होतो असे नाही. सिलिकॉन व्हॅली व्यतिरिक्त अमेरिकेतील अनेक सर्वोत्कृष्ट टेक हब आहेत ज्यात तंत्रज्ञानाची भरभराट संस्था, स्टार्टअप टेक कंपन्या, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, बिगडेटा आधारित तंत्रज्ञान आधारित कंपन्या आहेत.

भारतीय गुंतवणूकदारांना या टेक कंपन्यांत गुंतवणुकीची संधी एडेलवाइज म्युच्युअल फंडाने एडेलवाइज यूएस टेक फंडाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. हा फंड जेपी मॉर्गन यूएस टेक फंडाच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करतो. उर्वरित जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत अमेरिकेतील टेक कंपन्यांची कामगिरी नफ्याच्या पातळीवर लक्षणीय ठरली आहे. गुंतवणूकदारांनी ‘यूएस टेक’ कंपन्यांच्या उत्सर्जन वाढीच्या संभाव्यतेमुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दमदार खरेदी केली. मागील वर्षभरात विस्तृत निर्देशांकाच्या उत्सर्जनातील ७.३ टक्के वाढीच्या तुलनेत रसेल १००० इक्वल वेट टेक्नोलॉजी निर्देशांकाच्या उत्सर्जनात ३४ टक्के वाढ झाली. रसेल १००० इक्वल वेट टेक्नोलॉजी निर्देशांक हा या फंडाचा मानदंड आहे. या निर्देशांकात मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, फेसबुकसारख्या बलाढय़ मेगा कॅप टेक तसेच टार्गेट, लिटिल फ्युज, सॅमटेक कॉर्पोरेशनसारख्या मिडकॅप आणि काही स्मॉल व मायक्रो कॅप कंपन्यांचा समावेश आहे. फंडाचा पोर्टफोलिओ मल्टी-कॅप फंडाप्रमाणे बांधला असून अमेरिकेतील टेक कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

गत वर्षीच्या दमदार परताव्यानंतर, अमेरिकेतील समभागांचे मूल्यांकन वरवर महागडे दिसले तरी ‘फेड’च्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परताव्याचा दर लक्षात घेता सध्याचे मूल्यांकन मागील वर्षांच्या तुलनेत स्वस्तच दिसेल. मार्च २०२१ मध्ये अमेरिकेच्या महागाई दरात अपेक्षेपेक्षा वेगाने वाढ झाली. हाच कल एप्रिल महिन्यात दिसला. अमेरिकेच्या कामगार विभागाने गेल्या मंगळवारी एक टिपण सादर केले. गैरकृषी रोजगारात वाढ झाली असल्याचे सांगताना महागाई दरात ०.२५ टक्के मासिक तर २.५ टक्के वार्षिक वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले. ‘मागणी वाढल्याने उत्पादकांनी उत्पादनाच्या किमतीत वाढ केल्याचे दिसत आहे’ असा स्पष्ट संकेत देत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत त्याने सकारात्मकता व्यक्त केली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांत इंधनाच्या खपात मागील वर्षभरातील सर्वाधिक वाढ दिसून आली. याचे प्रतिबिंब फेडरल रिझव्‍‌र्हच्या ओपन मार्केट्स कमिटीने (एफओएमसी) दोन दिवसांची बैठक संपल्यानंतर २८ एप्रिल रोजी व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयातून दिसून आले. याचा अर्थ असा की शून्याच्या जवळ व्याजदर आणि मासिक १२० अब्ज डॉलरची रोखे खरेदीमुळे अर्थव्यवस्थेत विपुल रोकड सुलभता राहिल. रोजगारात सतत सुधारणा होत असून मार्चमध्ये ९.१५ हजार रोजगार वाढल्याने बेरोजगारीचा दर अंशत: कमी झाला आहे.

फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी ‘फेडचे कोणतेही पाऊल अर्थव्यवस्थेसाठी नवीन अडचणीत भर घालणारे नसेल’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेत ८.५ दशलक्ष रोजगार उपलब्ध होते. त्या संख्येपासून आम्ही अद्याप दूर असल्याने महागाईचा दर वाढला तरी प्राथमिकता रोजगार निर्मितीला असून वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करता येऊ  शकेल. जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढत असते आणि महागाईत लक्षणीय वाढ होत असते तेव्हा मध्यवर्ती बँक अल्प-मुदतीच्या व्याजदरात वाढ करून अर्थव्यवस्थेच्या वाढीला लगाम लावते. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची अपेक्षा असताना व्याजदर स्थिर ठेवून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे फेडचे अनुकूल धोरण भांडवली बाजाराला बळ देईल.

‘कॅश इज किंग’ हे वचन ‘सोयीस्कर’ पतधोरण काळात खोटे ठरते. कारण कमी व्याजदर ठेवीदारांना बचत करण्यापासून परावृत्त करते. साहजिकच गुंतवणूकदार कमीतकमी परतावा देणाऱ्या ठेवींमध्ये आपले पैसे ठेवण्याऐवजी धाडसी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. अमेरिकेत व्याजदर कमी असल्यास स्थावर मालमत्तांचे भाव वधारतात. संभाव्य घर खरेदीदार आणि गुंतवणूकदार कमी व्याजदराचा फायदा घेण्यासाठी मालमत्ता खरेदी करतात. टेक कंपन्यांत जग बदलण्याची क्षमता असते. याचे चपखल उदाहरण म्हणजे ‘मायक्रोसॉफ्ट’. आयबीएमचा बोजड संगणक लयाला जाऊन प्रत्येक मेजावर एक वैयक्तिक संगणक असणे ही मायक्रोसॉफ्टची देणगी आहे. हा फंड अशाच गुंतवणूक संधीच्या शोधात असतो ज्या कंपन्यांत जग बदलण्याची क्षमता असेल. अशा जग बदलाचा लाभार्थी होण्यासाठी ही आजची शिफारस.

एडेलवाइज यूएस टेक फंड

* फंड गट फंड ऑफ फंड्स

* फंडाची सुरुवात ५ मार्च २०२०

* फंड मालमत्ता १,३३५ कोटी (३० एप्रिल २०२१ रोजी)

* मानदंड रसेल १००० इक्वल वेटेड टेक्नोलॉजी

एडेलवाइज यूएस टेक फंड हा जगाच्या बदलत्या कार्यसंस्कृती आणि कार्पयद्धती बदलाच्या लाभार्थी ठरणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. गुंतवणूकदारांना सर्वोत्तम तंत्रज्ञान कंपन्यांत गुंतवणूक करून संपत्ती निर्मितीची संधी या फंडाने उपलब्ध करून दिली आहे. या फंडाची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांत आपले आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदलण्याची क्षमता आहे.

’ राधिका गुप्ता,

 मुख्य कार्यकारी अधिकारी, एडेलवाइज म्युच्युअल फंड

atul@sampannanivesh.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2021 1:02 am

Web Title: edelweiss us tech fund information zws 70
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : नामांकन महत्त्वाचेच!
2 बाजाराचा तंत्र-कल : ओळखून आहे सारे तुझे बहाणे!
3 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : शैक्षणिक बँकिंगचा इतिहास मनोरंजक आणि उद्बोधकही!
Just Now!
X