|| अजय वाळिंबे

गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (बीएसई कोड – ५००१६३)

गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड ही मोदी एंटरप्राइजची एक मोठी कंपनी असून भारतातील एक मोठी सिगारेट उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. फोर स्क्वेअर, रेड अँड व्हाइट, कॅव्हेंडर्स, टिपेर्स आणि नॉर्थ पोल या ब्रॅँडच्या सिगारेट्स कंपनी उत्पादित करते. याखेरीज कंपनीने फिलिप मॉरिस या बहुराष्ट्रीय कंपनीबरोबर करार करून मालब्रो या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिगारेटचे भारतीय बाजारपेठेत उत्पादन तसेच विक्रीचे सर्वाधिकार मिळवले आहेत. सिगारेट उत्पादनाखेरीज कंपनीने गेल्या काही वर्षांपासून पान विलास आणि राग या ब्रँड नावाखाली पान मसाला तसेच फंडा गोळी आणि इतर मुखशुद्धी उत्पादने सुरू केली आहेत. मुंबईत अद्ययावत संशोधन केंद्र असलेल्या गॉडफ्रे फिलिप्सचे नवी मुंबई येथील रबाळे तसेच गाझियाबाद येथे उत्पादन कें द्रे असून आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे तंबाखू खरेदी केंद्र आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतदेखील आपले स्थान पक्के केले असून मागणीनुसार कंपनी कंत्राटी उत्पादन घेते, तसेच आपल्या उत्पादनांची निर्यात युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशात करते.

गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून आपल्या भागधारकांना खूष ठेवणाऱ्या या कंपनीचे सप्टेंबर २०१८ अखेर संपलेल्या सहामाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र आतापर्यंतची कंपनीची कामगिरी पाहता ते उत्साहवर्धकच असतील अशी आशा करायला हरकत नाही. कंपनीवर कुठलेही कर्ज नसल्याने तसेच एक ‘डिफेन्सिव्ह स्टॉक’ म्हणून गॉडफ्रे फिलिप्सचा तुमच्या पोर्टफोलियोसाठी अवश्य विचार करा. मात्र शेअर बाजाराची सध्या ‘ताकही फुंकून प्यावे’ अशी अवस्था असल्याने हा शेअरदेखील अजून किती खाली मिळू शकेल काय हे पाहून खरेदीचे धोरण ठरवावे. आवश्यक असल्यास तांत्रिक विश्लेषण आणि बाजारचा कल पाहून खरेदी केल्यास गॉडफ्रे फिलिप्स मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक आणि सुरक्षित वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.