|| वसंत कुलकर्णी

‘‘जुन्या काय आणि नव्या काय घडय़ाळांच्या तबकडय़ा आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टा कसला का असेना घडय़ाळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणारे चक्र नीट राहिलं की फार पुढेही जायची भीती नाही आणि मागेही पडायची चिंता नाही, भीती नाही..’’ असे पुलंनीच ‘असा मी असामी’मध्ये लिहून ठेवले आहे. पुलंनी घडय़ाळ्याच्या बाबतीत जे म्हटलंय नां ते म्युच्युअल फंडाबाबतीतसुद्धा खरे आहे. वेगळा फंड म्हणजे वेगळी नावे आणि थोडाफार गुंतवणुकीतला फरक. या गुंतवणुकीतील फरकामुळे कमी-अधिक दिसणारा गुंतवणुकीवरील नफा. नफा कमी-अधिक झाल्यामुळे आपण आपली ‘एसआयपी’ बंद करायची नसते हे गौरब पारिजांकडून शिकणे गरजेचे आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सेल्स अँड मार्केटिंग हेड असलेल्या गौरब पारिजा यांची पहिली ५०० रुपयांची एसआयपी टेम्पलटन इंडिया ग्रोथ फंडापासून सुरू झाली. म्युच्युअल फंडाच्या परिभाषेत हा फोलिओ अजून लाइव्ह आहे.

आयआयएम बंगळूरुया संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले गौरब १९९५ मध्ये तत्कालीन युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात यूटीआयमध्ये रिसर्च अँड प्लानिंग विभागात दाखल झाले. बाजाराची कामगिरी समाधानकारक नसल्याने यूटीआय ‘यूएस ६४’चा १९९६ साठीचा लाभांश जाहीर करू शकली नव्हती. त्या बदल्यात १०:१ या गुणोत्तरात बोनस युनिट्स दिली गेली होती. क्रोधित झालेल्या गुंतवणूकदारांना शांत करण्यासाठी यूटीआयने देशभरात गुंतवणूकदारांच्या मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्या वेळी नव्याने दाखल झालेल्या २० विश्लेषकांवर या मेळाव्यात गुंतवणूकदारांना सामोरे जाण्याची जबाबदारी दिली गेली. या टीमचे गौरब पारिजा हे एक सदस्य होते. त्यांनी पूर्व भारतात झालेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ही जबाबदारी यशस्वी पार पाडल्यामुळे यूटीआयने त्यांना गुंतवणूक विभागातून कोलकोत्यात मार्केटिंग विभागात पाठविले. मुंबईपेक्षा कोलकोत्याहून भुवनेश्वरला कमी वेळात जाता येते म्हणून गौरब यांनीसुद्धा ही बदली आनंदाने स्वीकारली. ते मार्केटिंग विभागात गेल्यामुळे म्युच्युअल फंड उद्योग एका चांगल्या निधी व्यवस्थापकाला मुकला. याच दरम्यान मुंबईत असताना त्यांनी १९९६ मध्ये पहिली ५०० रुपयांची एसआयपी टेम्पलटन इंडिया ग्रोथ फंडात सुरू केली. त्या वेळी एसआयपीची सुविधा केवळ टेम्पलटनमध्येच उपलब्ध होती.

‘बारा चेक देने पडते थे. बँक ऑफिसरको मस्का लगाना पडता था, एक चेक बुक लेने के लिये’, गौरब नेहमीच ही गोष्ट सांगतात. यूटीआयच्या कोलकोता येथे क्षेत्रीय कार्यालयात काम करीत असताना त्यांच्याकडे पूर्व भारतातील ८३ जिल्ह्य़ांची जबाबदारी होती. ही जबाबदारी त्यांनी १९९६ ते १९९९ दरम्यान पार पाडली. त्याच दरम्यान यूटीआयने निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांची विक्री सुरू केली. यूटीआय बाँड फंडाच्या पूर्व भारतातील मार्केटिंग कॅम्पेनची जबाबदारी त्यांनी उत्तम पार पाडली. या कामगिरीची नोंद फ्रँकलिन टेम्पलटन या स्पर्धकाला घ्यावी लागली आणि सहा महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेल्या १० मुलाखतींनंतर ते फ्रँकलिन टेम्पलटनच्या पूर्व भारताचे व्यवसायप्रमुख म्हणून दाखल झाले. यूटीआयसारख्या ९० हजार कोटी मालमत्ता असलेल्या कंपनीतून ९०० कोटी मालमत्ता असलेल्या कंपनीत दाखल होण्याचा निर्णय त्यांनी लग्न होऊन एक वर्ष पूर्ण होण्याआधी घेतला हे विशेष.

फ्रँकलिन टेम्पलटनच्या कोलकोता येथील रिजनल ऑफिसमध्ये केवळ दोन कर्मचारी होते. पहिले गौरब आणि दुसऱ्या त्यांच्या सहकारी ज्या अस्थायी कर्मचारी होत्या. चार वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांची बदली नवी दिल्लीत फ्रँकलिन टेम्पलटनच्या उत्तर भारताचे व्यवसायप्रमुख म्हणून झाली. या कार्यकाळात त्यांनी पोस्ट खात्यासोबत म्युच्युअल फंड विकण्यासाठी करार केला. पोस्टाने आपली ताकद ओळखली नाही असे ते नेहमी म्हणतात. त्यांच्या एका फंड विक्रीच्या वेळी दोन लाख अर्ज आले, यापैकी ११ हजार अर्ज फक्त पोस्ट खात्याकडून आलेले होते. पोस्टाने म्युच्युअल फंड विकले तर आज पोस्ट खाते म्युच्युअल फंडाचे सर्वात वितरक असते, असे त्यांचे मत आहे. त्यांनी फ्रँकलिन टेम्पलटनमध्ये १६ वर्षांत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्ताराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

मार्च २०१७ पासून ते आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सेल्स अँड मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. पहिली एसआयपी करून २० वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने त्यांची सर्व वित्तीय ध्येये पूर्ण झाली आहेत. आर्थिक बाजू भक्कम असल्याने त्यांची सेवानिवृत्ती कधीही घेण्याची तयारी आहे. लोकांना सेवानिवृत्तीबद्दल सल्ला देणारे हे स्वत: पन्नाशीत नोकरी सोडण्यास सक्षम आहेत याची विशेष नोंद घ्यायला हवी. यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड होम घेतलेले नाही. ते सर्व बचत इक्विटी फंडात ठेवतात. जेव्हा कधी भेट होते तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

आमच्या मागील भेटीत सहजच त्यांना प्रश्न विचारला, ‘रिटायरमेंट के बाद क्या प्लान है?’

गौरब म्हणतात – ‘भुवनेश्वर जाऊंगा और म्युच्युअल फंड बेचूंगा. अब मेरी कंपनी में जो काम करता हुं वहीं काम खुद के लिये करुंगा. जिंदगी भर एकही काम मैने किया है, लोगों को एसआयपी की सही बात समझायी है मैने.’

समाजातल्या शेवटच्या स्तरात एसआयपी नेणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे. इंस्टंटच्या काळात गुंतवणूकदारांना नफासुद्धा इंस्टंट हवा असतो. गौरब परिजा यांनी २० वर्षांपूर्वी सुरू केलेली एसआयपी अजूनही बंद केलेली नाही म्हणूनच त्यांच्या पोर्टफोलिओत सर्वात कमी परतावा देणाऱ्या वर्षांची टक्केवारी १९ टक्के आहे. हल्ली एखाद्या फंडातील नफ्याची टक्केवारी जरा कमी झाली की लगेचच गुंतवणूक सल्लागाराबाबत साशंक असणारे गुंतवणूकदार मोठय़ा संख्येने सापडतील. फंडाच्या मानदंडापेक्षा फंडाची कामगिरी सरस असली की झाले. सातत्य हा गुंतवणुकीतील यशाचा मूलमंत्र आहे हेच गौरब परिजा यांच्या पोर्टफोलिओकडून शिकण्यासारखे आहे.

shreeyachebaba@gmail.com