|| अजय वाळिंबे

हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लि. (बीएसई कोड – ५००१८३)

हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड (एचएफसीएल) ही भारतातील दूरसंचार क्षेत्रातील एक जुनी कंपनी. तीन दशकाहून अधिक काळ ही कंपनी कार्यरत असून सध्या ती टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी मानली जाते. शेअर बाजारातील अनुभवी आणि जाणकार गुंतवणूकदारांना एचएफसीएल ही नक्कीच माहिती असेल. एके काळी सट्टाबाजांची आवडीची असलेली ही कंपनी काही गुंतवणूकदारांना भरपूर फायदा देऊन गेली असली तरी अनेकांचे त्यावेळी नुकसानही झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत ‘सेबी’ तसेच शेअर बाजारच्या नियमनामुळे ज्या काही थोडय़ा कंपन्या ताळ्यावर आल्या आहेत त्यातील एचएफसीएल एक असावी. सध्या ऑप्टिकल फायबर केबल मधील ही एक मोठी कंपनी मानली जाते. सुमारे १ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरवणाऱ्या या कंपनीने आतापर्यंत अनेक यशस्वी प्रकल्प राबविले असून त्यात सीडीएमए/ जीएसएम नेटवर्क, सॅटेलाईट कम्युनिकेशन हे महत्वाचे प्रकल्प आहेत. या शिवाय कंपनीने २५,००० हून अधिक २जी तसेच ३जी सेल साइट विकसित केल्या आहेत. कंपनीचे सप्टेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे उत्तम आहेत. कंपनीने या कालावधीत गत वर्षीच्या तुलनेत उलाढालीत ९७.६४ टक्के वाढ नोंदवून ती ५७६ कोटीवरुन ११३७.४१ कोटीवर गेली आहे तर नक्त नफ्यात ५८ टक्के वाढ होऊन तो २५ कोटींवरून ३९.७६ कोटींवर गेला आहे. सध्या देशभरात दूरसंचार क्षेत्राचा विस्तार पाहता ऑप्टिकल फायबर तसेच या उद्योगाला इतर पूरक आयएसपी सेवा, रेडियो टर्मिनल, एसडीएच ट्रान्समिशन इ. अनेक सेवांचा विस्तार होत आहे. त्यामुळे येती दोन वर्ष कंपनीकडून अशीच भरीव कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या वर्षांत एक मोठी तेजीची झुळूक दाखवल्यावर या कंपनीचा शेअर सध्या तांत्रिकदृष्टय़ा मंदीत दिसत असून तो नवीन नीचांकांवर आला आहे. सध्याची शेअर बाजाराची परिस्थिती पाहता हा शेअर १५ रुपयांवर येऊ शकतो. मोठय़ा फायद्यासाठी ज्या गुंतवणूकदारांची धोका पत्करायची तसेच ‘स्टॉप लॉस’बाबत तत्परता असेल त्यांनीच हा शेअर १५ रुपयांच्या आसपास खरेदी करावा. गुंतवणूक कालावधी १२ ते १८ महिने राखला गेला पाहिजे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.