भक्ती रसाळ

विमा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात महिला वर्ग कार्यरत आहे. व्यवस्थापन, सेवा तसेच विपणनातही महिलावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. विमा प्रतिनिधी/ एजंटची भरती करताना विमा कंपन्या महिलांना जास्त प्राधान्य देतात. घर, कुटुंबातील व्यवधाने सांभाळून विमा विपणन किंवा विमा एजंट व्यवसायात गेल्या दशकात मोठय़ा प्रमाणात महिला वर्ग सहभागी होऊन, यशही मिळविताना दिसून येत आहे. तरीही स्वत:च्या व्यक्तिगत विमा संरक्षणासाठी ‘एक ग्राहक’ म्हणून महिलावर्ग विशेष उत्साही नाही. सामान्य गृहिणीवर्ग, सुशिक्षित महिला, चाकरमानी महिला कोणताही वर्ग याला अपवाद नाही. स्वत:च्या विमा संरक्षणाविषयक उदासीनता ही दीर्घ मुदतीत क्लेशदायक ठरू शकते.

० जीवनविमा आणि महिला- टर्म अर्थात शुद्ध मुदत विम्याद्वारे कुटुंबप्रमुखाचे म्हणजेच घरातील कर्त्यां पुरुषाचे विमाछत्र प्राधान्याने विकत घेतले जाते. परंतु स्त्री, मग ती गृहिणी असो वा कमावती असो जीवन विमा संरक्षणाचा निर्णय घेताना अथवा कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना तिचे स्थान दुय्यम मानले जाते. घर खरेदी करताना गृहकर्जासाठी ‘सह-अर्जदार’ म्हणून जर पत्नीचे नाव नमूद असेल तर ‘पत विम्याद्वारे’ महिला वर्ग जीवन विमा घेताना अपवादाने आढळतो इतकेच! आजही मोठय़ा प्रमाणात गृहिणीवर्ग ‘विना आर्थिक मोबदला’ कुटुंबातील दैनंदिन कर्तव्ये पार पाडत आहे. अकाली मृत्युमुळे जर कुटुंबातील ‘कर्त्यां’ पुरुषाच्या जीवन विमाचे महत्त्व आपण जाणतो तर महिलांच्या जीवनाचे मोल आणि महत्त्वही लक्षात घेणे गरजेचे आहे. सध्याच्या या वस्तुस्थिस्तीचे सुज्ञपणे विश्लेषण केले तर लक्षात येते की, ‘विना आर्थिक मोबदला’ काम करणाऱ्या गृहिणींच्या अकाली मृत्युमुळेही कुटुंबाची आर्थिक गणिते बदलू शकतात! भारतात पुढच्या पिढीला वारसा म्हणून मालमत्ता आधीच्या पिढीने मृत्युपश्चात सुपूर्द करण्याची परंपरा आहे. जीवन विमा संरक्षणाद्वारे ‘वारसा’ म्हणून मृत्यू-दाव्याची रक्कम पुढच्या पिढीस मिळावी अशा हेतूने जीवन विमा खरेदी करताना ग्राहकवर्ग आढळतो. परंतु घरातील स्त्री मात्र या प्रक्रियेत स्वत:चा विचार प्राधान्याने करताना आढळत नाही. जीवन विमा प्रीमिअमचा तौलनिक अभ्यास केला तर पुरुषांपेक्षा महिलांचा विमा हप्ता स्वस्त आहे. महिलांची आयुर्मर्यादा जास्त आहे, हे त्यामागचे कारण आणि विशेष लक्षात घेण्याजोगी बाबही आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्रतेचा विचार करून महिलावर्गाने विमा संरक्षणाची गरज डोळसपणे ओळखणे गरजेचे आहे.

० आरोग्य विमा आणि महिला-  स्त्रियांचा जीवन विमा खरेदी करतानाची उदासीनता आरोग्य विमा खरेदी करताना मात्र आढळत नाही! कुंटुबप्रमुख आरोग्य विम्याची खरेदी करताना नेहमीच जोडीदाराचा विचार करताना दिसतो. कुटुंबाच्या संयुक्त आरोग्य विमा पॉलिसीद्वारे आरोग्यविषयक खर्च संरक्षित केला जातो. ‘फॅमिली फ्लोटर’ आरोग्य विमा पॉलिसी स्वस्त आहे म्हणून असे घडते. यातून स्त्रीच्या ‘स्वतंत्र’ आरोग्य विमा संरक्षणाची परवडच होते. बहुतांशी महिला वर्गाचा आरोग्य विमा ‘संयुक्त विमा कवचाद्वारे’ जोडीदारसोबत विभाजित केलेला असतो. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरचे आजार बळावत आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयातील गाठी, स्नायूंच्या नाना व्याधी या प्रकारचे आजार लक्षणीय वेगाने वाढत आहेत. सुज्ञपणे विचार केला तर वय वष्रे ४५ नंतर कुटुंबप्रमुखाने, केवळ प्रीमिअमची बचत होते म्हणून कुटुंबाचे संयुक्त आरोग्य विम्याद्वारे संरक्षण करणे वस्तुस्थितीला धरून नाही. आरोग्य सेवांचा खर्च पुरुष आणि स्त्रियांच्या उपचारांसाठी सारखाच आहे. आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर्स किंवा रुग्णालये स्त्रियांना सवलती देत नाहीत. त्यामुळेच घरातील स्त्रियांसाठी आरोग्यविषयक तरतूद करताना केवळ प्रीमिअम कमी भराव लागेल म्हणून पती-पत्नीच्या संयुक्त विम्याचा विचार अयोग्य आहे. महिलांनी आपल्या आरोग्यविषयक खर्चाची योग्य वेळीच दखल घेणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या दीर्घ आयुर्मानाचा विचार केला तर वय वष्रे ४० नंतर ‘स्वतंत्र आरोग्य विमा’ हा आरोग्यनिगा खर्चातील चलनवाढीचा दर लक्षात घेऊन विकत घेणे अपरिहार्य आहे.

विमा कंपन्यांनी ‘विशेष विमा कवचा’द्वारे महिलाविषयक आजारांसाठी स्वतंत्र विकल्प बाजारात आणले आहेत. मोठय़ा प्रमाणात महिलावर्ग विमा एजंट म्हणून यशस्वीपणे काम करत असूनही महिलांचे हे विमा विकल्प ग्राहकांअभावी विमा कंपन्यांना बंद करावे लागत आहेत! यांचा महिलांनी वेळीच विचार करावा.

० विमादावे आणि महिला- जीवन विम्याद्वारे कुटुंबप्रमुख घरातील गृहिणी किंवा जोडीदारास आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित करत असतो. आपल्या पश्चात ‘पत्नीला’ आर्थिक विवंचनांना एकटय़ाने सामोरे जावे लागू नये हा या मागील प्रामाणिक विचार असतो. परंतु जीवन विमा पॉलिसीचा लाभार्थी महिलावर्ग मृत्यू-दावे सादर कसे करावेत याविषयी अजिबात प्रशिक्षित नाही! कागदपत्रांची जुळवाजुळव, दस्तऐवजविषयक माहिती, कधी कधी तर आपल्या पतीची जीवन विमा पॉलिसी आहे हेही माहीत नसलेल्या महिला आहेत. विमा विक्रीनंतरचा १५ दिवसांचा काळ हा ग्राहकास विमा कंपनीने विमा करार समजून घेण्यास दिलेला वेळ आहे. विमा एजंट या काळात ‘सेवा भेट’ म्हणून महिलावर्गास मृत्यू-दाव्याविषयी योग्य माहिती सहज देऊ शकतो. ‘फ्री-लूक पीरियड’ म्हणजेच १५ दिवसांचा चाचपणी काळ महिलावर्गास स्वत:चे विमाविषयक संरक्षण समजून घेण्यास मुबलक आहे.

आज २०२१ साली महिला ‘अर्थार्जन’ करण्यासाठी पुरुषांसोबत मानाने उभ्या आहेत. परंतु ‘आर्थिकदृष्टय़ा’ सजगतेने त्या ‘अर्थसाक्षर बनल्या आहेत काय?’ याचा विचार आवश्यक आहे. महिलांनी ‘अर्थभान’ ठेवणे काळाची गरज आहे.

* लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

bhakteerasal@gmail.com