|| वसंत कुलकर्णी

जागतिक वाङ्मयात पत्रवाङ्मयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात आंग्लपूर्व काळात जे महत्त्व पेशवे दप्तराला आहे तेच महत्त्व आंग्लोत्तर काळात पत्रवाङ्मयाला आहे. सोमण कुलोत्पन्न पत्रपंडित रघुनाना सोमणांचे चौथे वंशज यांनी लिहिलेले पत्र आमच्या हाती पडले. त्याचा मजकूर खालीलप्रमाणे..

चि. रुख्मिणीस,

अनेक आशीर्वाद.

काल दिल्लीत येऊन पोहोचलो. दिल्लीत थंड हवा असली तरी नॉर्थ ब्लॉकच्या आजूबाजूची हवा आगामी अर्थसंकल्पामुळे हळूहळू गरम होऊ लागली आहे. अर्थमंत्री जेटली हे वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेत आहेत. येत्या शुक्रवारी अर्थसंकल्प कोण मांडणार या विषयीची अनिश्चितता होती. राष्ट्रपती भवनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामुळे ती आता दूर झाली असून आपले मुंबईकर माटुंगा निवासी पीयूष गोयल यांची हंगामी अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. येत्या शुक्रवारी तेच अर्थसंकल्प सादर करतील. स्वातंत्र्योत्तर काळात पीयूष गोयल यांच्यारूपाने पहिला मुंबईकर अर्थमंत्री हंगामी का असेना, अर्थसंकल्प सादर करेल. या आधी सीडी देशमुख आणि मधु दंडवते या मुंबईकर अर्थमंत्र्यांनी (जरी त्यांचे लोकसभा मतदारसंघ अनुक्रमे कुलाबा आणि राजापूर असले तरी!) अर्थसंकल्प सादर केले. आगामी अर्थसंकल्प विद्यमान सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प असल्याने तो मागील चार अर्थसंकल्पांची केवळ सुधारित आवृत्ती असेल. या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी आणि पायाभूत सुविधा विकावासावर भर असेल असे नॉर्थ ब्लॉकचा कानोसा घेता कळले.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान प्रत्यक्ष कराच्या संकलनातील वाढ अंदाजित वाढीपेक्षा अधिक म्हणजे १६ टक्के झाली. या उलट अप्रत्यक्ष कर संकलन १९.२ टक्के अंदाजित वाढीपेक्षा खूप कमी आहे. वर्षभरातील  ‘जीएसटी’मधील बदलांमुळे या काळात अप्रत्यक्ष कर केवळ ५.३ टक्केच वाढले आहे. परिणामी या काळात सरकारच्या एकुण महसुलातील वाढ ९.३ टक्के आहे. तर सरकारने या कालावधीतील मागील वर्षांच्या तुलनेत ५.५ टक्के अधिक कर्ज घेतले आहे. परंतु सरकारने बाजारातून कर्जउचल कमी करून राष्ट्रीय अल्पबचत कोशातून अधिक कर्जाऊ रक्कम घेतली आहे. परिणामी प्रत्यक्ष वित्तीय तूट फार फुगेल असे वाटत नाही.

केंद्र सरकारच्या महसुलातील वाढ मागील वर्षांच्या ८.४ टक्यांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अंदाजित वाढ १०.२५ टक्के असेल. सरकारने जीएसटीच्या २८ टक्के करकक्षेतील काही वस्तू १८ टक्के करकक्षेत आणल्याने, अप्रत्यक्ष करातील अंदाजित वाढ नगण्य असण्याची शक्यता अधिक दिसते. सरकारच्या अंदाजपत्रकाचा भर करोत्तर महसुलातून उत्पन मिळविण्यावर असल्याचे या अर्थसंकल्पात दिसून येण्याची शक्यता आहे. सरकार ‘५जी’च्या लिलावातून मोठा महसूल मिळविण्याचा प्रयत्न  करेल. एकुणात वर्ष २०२०ची अंदाजित वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के म्हणजे मागील वर्षांच्या अंदाजाइतकीच राखण्याचा प्रयत्न असेल. २०२० मध्ये सरकारची अंदाजित कर्ज उचल ५.७ लाख कोटी असण्याची शक्यता आहे.

वर्ष २०१८-१९च्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक तरतूद होती. नंतर सरकारने निवडक कृषी उत्पन्नांच्या आधारभूत किमतीत भरघोस वाढ करून, सरकारने ग्रामीण आणि कृषीस्नेही धोरणांची ग्वाही दिली. मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेस चांगला प्रतिसाद लाभला असल्याने, त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद असेल. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या करातून मिळणाऱ्या महसुलाशी असलेले गुणोत्तर मागील आठ वर्षांत सर्वोच्च असल्याने आगामी अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील रस्ते, शेतीसाठी सिंचन आणि राष्ट्रीय महामार्ग, सुखकारक रेल्वे प्रवास आदी पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद अपेक्षित आहे. मागील अर्थसंकल्पाप्रमाणे एकही नवीन प्रवासी गाडीची घोषणा नसलेला हा अर्थसंकल्प असेल. निवडणूकपश्चात कोणतेही सरकार आले तरीही इन्फ्रास्ट्रक्चर फंडात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.

वैयक्तिक प्राप्तिकराच्या सध्याच्या २.५० लाखांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्न मर्यादेत वाढ या अर्थसंकल्पात संभवत नाही. परंतु करवजावटीसाठी गुंतवणुकीची सध्याची १.५० लाखाची मर्यादा दोन लाखापर्यंत वाढू शकते. परिणामी नोकरदारांना आणि वैयक्तिक करदात्यांना यंदा फारसा दिलासा नसेल.

गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला तरी या अर्थसंकल्पावर जेटलींची छाप असेल. पंगतीत वाढले जाणारे अन्न ज्याप्रमाणे आचारी शिजवतात व वाढपी वाढतात त्याप्रमाणे जेटली यांनी तयार केलेला अर्थसंकल्प गोयल मांडतील. पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा. कारण तुम्ही कुठेही कोपऱ्यात बसला असाल तरी वाढपी ओळखीचा असल्यास तुम्हाला हवे ते व्यवस्थित मिळते, असे पूर्वीचे लोक म्हणत. आता हा ओळखीचा वाढपी पंगतीत कसा वागेल हेच पाहायचे! नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांना वाढपी बघून न वाढताच पुढे जाण्याचा अनुभव येत्या शुक्रवारी येईल.

तुझा,

बाबा (नवी दिल्ली, २८ जानेवारी २०१९)

shreeyachebaba@gmail.com