अर्थव्यवस्थेत कितीही मंदी असली तरी दिवाळी म्हटली की नवीन खरेदीची आस लागलेली असते. त्यातही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना तर ही आस इतरांपेक्षा कांकणभर अधिकच असते. त्यांच्यासाठी ‘मुहूर्ताचे सौदे’ म्हणजे मर्मबंधातली ठेवच!
या वर्षीची दिवाळी खासच आहे. तीन वर्षांनंतर बाजार निर्देशांक नवीन सार्वकालिक उच्चांक गाठण्याच्या प्रयत्नांत असताना, त्यात ‘लोकसत्ता- अर्थवृत्तान्त’चे योगदान म्हणून या वर्षी हा खास बेत आखला आहे. एक विश्लेषक साधारणपणे सहा ते आठ कंपन्यांचा माग घेत असतो. मागील वर्षभरात त्यांनी विश्लेषण केलेल्या समभागांपैकी एकाची निवड करून तो समभाग सुचविण्यास त्यांना सांगण्यात आले. यंदाच्या दिवाळीत अशाच उमद्या १० समभागांचा नजराणा प्रत्यक्ष नामांकित विश्लेषकांकडून वाचकांच्या भेटीला आणला आहे. आज त्याचा पूर्वार्ध तर उत्तरार्ध प्रत्यक्ष दिवाळीला..
नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी)
१२४.७०- सद्य भाव
१८३- दिवाळी २०१४ लक्ष्य
या क्षेत्रातील इतर कंपन्यांची कंत्राटे कमी होत असताना कामांचा तुटवडा नसलेली कर्जमुक्त कंपनी
भारत सरकारच्या मालकीची एनबीसीसी मिनीरत्न कंपनी असून प्रकल्प व्यवस्थापन व स्थावर मालमत्ता विकास या बरोबरच परदेशातील प्रकल्प कंत्राटदार क्षेत्रात कार्यरत आहे. निवासी व वाणिज्य इमारती, कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प, देशाच्या सीमेवरील कुंपण, हिमालयातील रस्तेबांधणी, जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थानअंतर्गत प्रकल्प, पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन व ईशान्य भारतातील विविध विकास प्रकल्प या सरकारी अनुदानावर आधारीत प्रकल्पांचे काम करीत असल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीचा ‘एनबीसीसी’वर परिणाम झालेला नाही. शिवाय बांधकाम क्षेत्रात असूनही कंपनीवर कर्ज नाही. त्यामुळे या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या नफ्यावर वाढत्या  व्याजदराचा विपरीत परिणाम झाला तसा या कंपनीवर झालेला नाही. सध्या ११० रुपयांच्या जवळपास असलेला हा शेअर २०१४ उत्सर्जन (ईपीएस)च्या ५.१४ पट पी/ईवर आहे.
आदित्य बापट,जीईपीएल कॅपिटल
adityab@geplcapital.com

इंडोको रेमिडिज्
७७.४०- सद्य भाव
८८- दिवाळी २०१४ लक्ष्य
ही मिडकॅप फार्मा कंपन्यातील एक प्रमुख कंपनी. कंपनीच्या १२० उत्पादनांना वैद्यक व्यावसायिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकूण विक्रीच्या ६५% देशांतर्गत तर ३५% निर्यात असलेल्या कंपनीने २०१५ मध्ये १००० कोटींच्या विक्रीचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन आखले आहे. मागील तिमाहीत कंपनीच्या गोवा-१ प्रकल्पात उत्पादित औषधांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अमेरिकेत विकण्याकरीता मान्यता दिली. कंपनीची खासियत दंत वैद्यकीय, वेदनाशमन, श्वसनविकास या क्षेत्रातील औषधांच्या निर्मितीत आहे. २००९ मध्ये कंपनीने केलेल्या व्यवसाय पुनर्रचनेमुळे नफाक्षमतेत २०%ने वाढ झाली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री पुढील पाच वर्षांत २३% आवर्ती दराने वाढेल.  कंपनीने मागील तीन वर्षांपासून परदेशातील बाजारपेठेत किफायतशीर उत्पादने नेऊन पद्धतशीर प्रवेश केला आहे. जर्मनी, इंग्लंड, स्लोव्हेनिया, तसेच पूर्व युरोप, पूर्व आशिया देशातील कंपन्यांच्याबरोबर दीर्घमुदतीची औषध पुरवठ्याची कंत्राटे कंपनीने केली आहेत. कंपनीने पाताळगंगा येथील प्रकल्पावर ५५ कोटी खर्च केले आहेत. या प्रकल्पालाही अमेरिकेच्या औषध व अन्न प्रशासनांची मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आíथक वर्ष २१०४च्या विक्रीत २०% वाढ होऊन ९०८ कोटी तर प्रती समभाग मिळकत ७.६० असेल.
सरबजीत कौर नागरा,संशोधन प्रमुख (फार्मा) एंजल ब्रोकिंग

कमिन्स इंडिया
४०४.३०- सद्य भाव
५४५ – दिवाळी २०१४ लक्ष्य
अमेरिकेतील सुगीची लाभार्थी व स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सगळ्याच बाबतीत आकर्षक.
अमेरिकेत मंदी संपत आल्याची जी सुचिन्हे दिसत आहेत त्याची जी औद्योगिक क्षेत्रे प्रत्यक्ष लाभार्थी ठरणार आहेत त्यापकी एक म्हणजे भांडवली वस्तू व त्यात सुद्धा ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी. कंपनीच्या मते (पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर झालेल्या कॉन्फरन्स कॉलप्रमाणे) देशांतर्गत विक्री चालू आíथक वर्षांत १०-१२% दराने वाढणे अपेक्षित आहे. या आधीचा अंदाज ५-८% वाढीचा होता. निर्यातीतही उणे ५% हा आधीचा अंदाज ४ ते ६% वाढ असा सुधारण्यात आला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत विक्री १०% तर मागील चार तिमाहींच्या तुलनेत २६% घटूनही नफ्याची टक्केवारी १७% राखण्यात कंपनीला यश आले आहे. कंपनीच्या उत्पादनांना अमेरिका, चीन, आफ्रिकेतून मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त करतानाच युरोपच्या बाजारपेठेतून मागणी घटणे अंदाजण्यात आले आहे. मागील वर्षी जनरेटर सेटचा भारतातील व्यवसाय अपुऱ्या पावसामुळे बाधित झाला होता. या वर्षी हा व्यवसाय ८% वाढ दर्शवेल. डिझेलच्या किंमती वाढल्याचा नकारात्मक परिणामही संभवत नाही. मागील वर्षी रेल्वे व बांधकाम व्यवसायाकडून मागणीअभावी बाधित झालेला उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचा व्यवसाय या वर्षी ८-९% वाढ दर्शवेल. फलटणच्या ‘मेगा साइट’ प्रकल्पस्थळी २०१६पर्यंत सातही कारखान्यातून उत्पादनास सुरुवात होणे अपेक्षित आहे. चालू आíथक वर्षांत कंपनी आपल्या उत्पादनाच्या किमतीत २-५% वाढ करणे अपेक्षित आहे. १ जानेवारी २०१४ पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेले उत्सर्जनविषयक नियम (सीपीसीबी-२) लागू होणाऱ्या कठोर नियमांचा कमिन्सवर सकारात्मक परिणाम संभवतो. कमी अश्वशक्तींच्या इंजिनच्या गटात कमिन्सला ३०% वाढीची अपेक्षा आहे.
नेहा मजिठिया,मायक्रोसेक कॅपिटल
nmajithia@microsec.in

सीएमसी लिमिटेड
३०६.३० – सद्य भाव
३५० – दिवाळी २०१४ लक्ष्य
आश्वासक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र त्यातही टीसीएसची उपकंपनी असणे फायद्याचे!
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टीसीएसची उपकंपनी असल्याचा फायदा या त्याच क्षेत्रातील ‘सीएमसी’ या मिडकॅप कंपनीला नेहमीच मिळाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री वाढली असली तरी नफाक्षमता घटली आहे. घसारा व करपूर्व नफा १५.८% आहे. देशात व परदेशातील व्यस्त व्यवसाय समतोलामुळे नफाक्षमता कमी झाली, तर रुपयाच्या घसरणीमुळे परदेशातील खर्च वाढला. दुसऱ्या तिमाहीतील विक्री मागील तिमाहीपेक्षा २३% तर गेल्या आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३१% ने वाढली. या तिमाहीत परदेशातील विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. व्यवस्थापनाने परदेशातील विक्री भविष्यात वाढण्याचे दिलेले संकेत पाहता, २०१४च्या ईपीएसनुसार १४ पट पी/ई म्हणजे गुंतवणुकीची आकर्षक संधीच ठरते. गुंतवणूकदारांचा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन लक्षात घेता यापेक्षा अधिक उत्तम दिवाळी खरेदी असू शकणार नाही.
शशी भूषण,प्रभूदास लीलाधर
shashibhusan@plindia.com

कॅस्ट्रॉल इंडिया
३०६.३० – सद्य भाव
३५० – दिवाळी २०१४ लक्ष्य
परिचित नाममुद्रा, नाविन्याचा ध्यास, मातृकंपनीकडून नवीन उत्पादने, संशोधन गुणवत्ता व समíपत कर्मचारी यांच्या जोरावर बाजारातील हिस्सा वाढवत नेण्याची खात्री असलेली कंपनी
ल्ल ब्रिटिश पेट्रोलियमचा एक भाग असलेल्या कस्ट्रॉल लिमिटेड (युके)ची ७०.९२% मालकी असलेली ही भारतातील उपकंपनी आहे. औद्योगिक वापर, दुचाकी- चार चाकी वाहने, व्यापारी वाहने, रेल्वे, विमान वाहतूक या सर्व वापरासाठी वंगणासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या बाजारपेठेत २५% हिस्सा या कंपनीचा आहे. ‘कॅस्ट्रॉल’ व ‘बीपी’ या नाममुद्रांनी कंपनी आपली उत्पादने विकत असते. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे घटलेले मूल्य यामुळे उत्पादन खर्च वाढला व औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे कंपनी आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढवू शकली नाही. त्यामुळे तिमाहीत नफा कमी झाला. आगामी काळाबाबत मार्गदर्शन करताना व्यवस्थापनाने कमजोर व कच्च्या तेलाच्या भडक्याबाबत चिंता व्यक्त करतानाच, दूरवरचे चित्र आशादायक असल्याचे म्हटले आहे. जेव्हा केव्हा व्याज कपातीमुळे वाहन विक्री वाढेल तेव्हा याचा प्रत्यक्ष लाभार्थी कॅस्ट्रॉल असेल याची व्यवस्थापनाने शाश्वती दिली आहे.
दिवाळी २०१४ लक्ष्य, मिलींद अन्धृटकर
पुरोहित कन्सल्टन्सी
milind1126@gmail.com