19 February 2019

News Flash

करसूट गुंतवणूक पर्याय फक्त दीर्घावधीच्या भांडवली नफ्यासाठीच!

मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो. नुकतेच मी घर खरेदीसाठी माझ्या नातेवाईकाकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीची वजावट मला घेता येईल का? – प्रसाद कुलकर्णी, ईमेलद्वारे

उत्तर : कलम २४ नुसार एकच राहते घर असेल तर त्या घरासाठी घेतलेल्या गृह कर्जावर भरलेल्या व्याजाची २ लाख रुपयांपर्यंतची वजावट करदात्याला घेता येते. ही वजावट घराचा ताबा घेतल्यानंतर घेता येते. ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्यांच्याकडून व्याजाचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. असे प्रमाणपत्र घेतल्यास करदात्याला नातेवाईकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाची वजावट घेता येईल. ‘कलम ८० सी’नुसार मिळणारी मुद्दल परतफेडीची दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट मात्र नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जासाठी मिळत नाही, कारण या कलमानुसार फक्त ठरावीक संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची वजावट घेता येते. यामध्ये बँक, केंद्र किंवा राज्य सरकार, दीर्घ मुदतीच्या कर्ज देणाऱ्या गृहकर्ज कंपन्या, जीवन विमा मंडळ वगैरेंचा समावेश होतो. यामध्ये नातेवाईकांचा समावेश होत नाही. त्यामुळे आपल्याला कर्जाच्या मुद्दल रकमेच्या परतफेडीची वजावट मिळणार नाही.

  • प्रश्न : मी नुकताच माझा व्यवसाय नवीन भागीदार घेऊन भागीदारी फर्ममध्ये परावर्तित केला आहे. मी आणि माझ्या भागीदाराने आमच्या फर्मला काही पैसे कर्जाऊ दिले आहेत. या कर्जावर मला आणि माझ्या भागीदाराला १,२५,००० रुपये प्रत्येकी व्याजापोटी मिळाले आहेत. फर्मला या व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का?  – आकाश पाटील, ईमेलद्वारे

उत्तर : कलम १९४ अ नुसार भागीदारी फर्मला एका आर्थिक वर्षांत ५,००० रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेच्या व्याजावर उद्गम कर कापणे बंधनकारक आहे. परंतु हे व्याज जर फर्मने भागीदाराला दिले असेल तर या कलमाच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे फर्मला या व्याजावर उद्गम कर कापणे बंधनकारक नाही.

  • प्रश्न : मागील लेखात आपण दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त घरभाडय़ावर उद्गम कर कापण्याविषयी माहिती दिली होती. मी एक व्यावसायिक (वास्तुविशारद) आहे. माझ्या कार्यालयासाठी मी जागा भाडय़ाने घेतली आहे. माझ्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ७५ लाख रुपये इतकी आहे. मी दरमहा ३०,००० रुपये भाडे देतो. मला या रकमेवर उद्गम कर कापावा लागेल का? – वासुदेव मोगरे, ईमेलद्वारे

उत्तर : जे वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदाते आहेत आणि जे दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देत आहेत अशांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू होतात, असे मागील लेखात सांगितले होते. ज्यांच्या धंदा-व्यवसायाची वार्षिक उलाढाल ‘कलम ४४ एबी’नुसार नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशांना ‘कलम १९४-आयबी’ लागू होत नाही. अशांना ‘कलम १९४ आय’नुसार उद्गम कर कापावा लागतो, ‘कलम ४४ एबी’नुसार धंद्यासाठी १ कोटी रुपये आणि व्यावसायिकांसाठी ५० लाख रुपये इतकी वार्षिक उलाढाल नमूद केली आहे. वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदात्यांच्या धंदा-व्यवसायाची वार्षिक उलाढाल या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात. आपल्या व्यवसायाची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला ‘कलम १९४ आय’च्या तरतुदी लागू होतात. या कलमानुसार करदाता वार्षिक भाडे १,८०,००० रुपयांपेक्षा जास्त देत असेल, तर त्याला भाडय़ाच्या १० टक्के इतक्या दराने उद्गम कर कापावा लागतो. हा कापलेला उद्गम कर आपल्याला ज्या महिन्यात भाडे दिले आहे तो महिना संपल्यानंतर सात दिवसांच्या आत भरावा लागेल. आपण दरमहा ३०,००० रुपये म्हणजेच वार्षिक ३,६०,००० रुपये भाडे देत असल्यामुळे आपल्याला उद्गम कर कापावा लागेल.

  • प्रश्न : मी ६ ऑगस्ट २०१७ रोजी एक सदनिका खरेदी केली. सदर सदनिकेची खरेदी किंमत ७० लाख होती. आता मला ही सदनिका विकावयाची आहे. प्रचलित बाजारभावाचा विचार करता सदर सदनिकेची किंमत आता एक कोटी पाच लाख एवढी आहे. सदर व्यवहारातून मला साधारणपणे ३५ ते ४० लाख रुपये नफा होणार आहे. मला अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आहे. तरी मला खालील बाबीवर मार्गदर्शन मिळावे ही विनंती – (१) मी भांडवली नफा गुंतवून नवीन घर खरेदी केल्यास मला भांडवली नफ्यावरील कर द्यावा लागेल का? सदरचे व्यवहार किती कालावधीत करावे लागतील? (२) सदर व्यवहारासाठी उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील का? असल्यास त्याचा परतावा कसा मिळेल? – प्रिया चव्हाण, कामोठे

उत्तर : स्थावर मालमत्ता २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता धारण केली तरच ती दीर्घ मुदतीची संपत्ती होते. संपत्ती दीर्घ मुदतीची असल्यास त्या संपत्तीच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी आपल्याला गुंतवणुकीचे पर्याय (नवीन घरात गुंतवणूक, बाँडमध्ये गुंतवणूक वगैरे) उपलब्ध आहेत. सदनिका खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांच्या आत विकली तर ती संपत्ती लघू मुदतीची होते, अशा अल्प मुदतीच्या संपत्तीच्या विक्रीतून होणारा भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नाहीत. त्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल. आपण सदनिकेची विक्री ६ ऑगस्ट २०१९ नंतर केल्यास आपल्याला दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याच्या गुंतवणुकीचा फायदा घेता येईल. आपल्या घराची विक्री किंमत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यावर सदनिका खरेदी करणारा १ टक्का इतका उद्गम कर कापेल. हा उद्गम कर आपल्या एकूण कर दायित्वातून कमी करून आपल्याला बाकी कर भरावा लागेल किंवा उद्गम करापेक्षा करदायित्व कमी असेल, तर आपल्याला विवरणपत्र भरून कर परताव्याचा दावा करता येईल.

  • प्रश्न : मी शासकीय नोकरीत असून मी नोव्हेंबर २०१७ मध्ये जुने घर ९ लाख रुपयांना विकून डिसेंबर २०१७ मध्ये १७ लाख किमतीचे दुसरे घर विकत घेतले आहे. आता विवरणपत्र भरताना याबाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? – हरीश काळेपाटील, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्याला जुन्या घराच्या विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा किती झाला हे काढावे लागेल. यासाठी हे घर कधी खरेदी केले हे विचारात घ्यावे लागेल, हे घर १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केले असेल तर १ एप्रिल २००१ रोजीचे ‘वाजवी बाजारभाव मूल्य’ किती आहे हे विचारात घ्यावे लागेल किंवा घर १ एप्रिल २००१ नंतर खरेदी केले असेल तर त्याची खरेदी किंमत विचारात घेऊन त्यावर महागाई निर्देशांकांप्रमाणे खरेदी किंमत काढून भांडवली नफा किती आहे तो गणावा. हा नफा आपल्या विवरणपत्रात ‘भांडवली नफा’ या सदराखाली विक्री किंमत, महागाई निर्देशकानुसार खरेदी किंमत, मुद्रांक शुल्कानुसार घराची किंमत वगैरे माहिती भरावी आणि ‘वजावट’ या सदराखाली कलम ५४ नुसार नवीन घरातील गुंतवणूक दाखवावी. ही नवीन घराची गुंतवणूक कधी केली, किती केली इत्यादी अतिरिक्त माहितीसुद्धा आपल्याला भरावी लागेल.

  • प्रश्न : आमची लातूर इथे असलेली वास्तू बँकेला भाडेतत्त्वावर पाच वर्षांकरिता दिली आहे. सदर वास्तू माझ्या वडिलांच्या नावे आहे, बँक भाडय़ामधून १० टक्क्यांप्रमाणे उद्गम कर कापते. वडील निवृत्त प्राध्यापक आहे त्यांच्या उत्पन्नाचा स्लॅब २० टक्के असल्यामुळे त्यांना अतिरिक्त कर भरावा लागतो. सदर वास्तू बक्षीसपत्राद्वारे आईच्या नावे केल्यास कर बचत होऊ शकते का?  – अमित पाटील, लातूर

उत्तर : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे पतीने पत्नीच्या किंवा पत्नीने पतीच्या नावाने मोबदल्याशिवाय संपत्ती हस्तांतरित केली असेल तर ती संपत्ती ज्याला मिळाली आहे त्याला ती करपात्र नाही. त्या संपत्तीतून मिळणारे उत्पन्न मात्र संपत्ती हस्तांतर करणाऱ्यालाच करपात्र आहे. त्यामुळे आपल्या वडिलांनी वास्तू बक्षीसपत्राद्वारे आईच्या नावे हस्तांतरित केली तरी त्यातून मिळणारे उत्पन्न (भाडे) हे वडिलांनाच करपात्र होईल, आपल्याला याचा फायदा वडिलांचा कर वाचविण्यासाठी घेता येणार नाही.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

First Published on September 10, 2018 1:59 am

Web Title: loksatta financial advice 2