21 January 2021

News Flash

बंदा रुपया : भरभरला हरभरा.!

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर

प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

घरात उद्योगाची पार्श्वभूमी असलेल्या कलंत्री कुटुंबातील हुकूमचंद कलंत्री यांच्या घरात त्यांच्या लहानपणापासूनच घरात डाळीचा व्यवसाय होता. १९६० साली त्यांचे वडील बन्सीलाल कलंत्री यांनी लातुरात डाळीचा उद्योग सुरू केला. कळत -नकळत व्यवसायाशी त्यांचा थेट संपर्क आला. ते त्यांच्या उद्यम-भरारीचे बीजरोपण ठरले.

सन १९८१ च्या आसपासचा काळ असेल. त्यांनी १० लाख रुपये गुंतवून लातूरच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जागा घेतली आणि रोज ५० क्विंटल डाळीचे उत्पादन करण्याची क्षमता असलेली मिल स्थापित केली. १० कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन व्यवसायाची अशी मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उद्योगाची भरभराट होत आज ५० हजार क्विंटल दररोज उत्पादन होण्याच्या क्षमतेपर्यंत उद्योग वाढला. या वाढीत सीएपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या नितीन व मनीष या दोघा मुलांचे योगदानही मोठे आहे. मुलांनी उच्च शिक्षणानंतर सी.ए.चा व्यवसाय करण्याऐवजी स्वत:च्या घरचा पारंपारिक व्यवसाय अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्याची इच्छा बाळगली आणि दोघांनीही ही जबाबदारी अतिशय समर्थपणे व यशस्वीरित्या पेललीही. आज कलंत्री डाळीचे नाव देश-विदेशात पोहोचले ते यामुळेच!

१९६० सालाच्या दरम्यान दररोज २५ पोते डाळ रात्री हौदात भिजवून दुसऱ्या दिवशी मजुरांमार्फत घरी जशी डाळ तयार केली जाते त्या पध्दतीने डाळ तयार केली जायची. १९७१ साली यंत्राच्या सहाय्याने डाळ तयार केली जाऊ लागली. पुढे १९८१ साली हुकूमचंद यांनी कलंत्री दालमिल या नावाने इंडस्ट्रीयल इस्टेट येथे या व्यवसायाला आधुनिक रूपात घटित केले. १० लाख रुपयांची गुंतवणूक करून दररोज ५० क्विंटल डाळ तयार करता येईल असा उद्योग सुरू केला. हळूहळू मागणी वाढत गेली आणि त्यांचा व्यवसायात जम बसू लागला. यातून डाळीची उत्पादनक्षमता वाढवली पाहिजे हे लक्षात घेऊन १९९३ साली त्यांनी लातूरच्या एमआयडीसीत ५०० क्विंटल क्षमतेचे कलंत्री फूड प्रॉडक्ट्स नावाने नवीन मिल सुरू केली. तेव्हा डाळ उद्योगात अकोला, जळगाव हे जिल्हे क्षमतावान होते. हळूहळू लातूरमध्ये डाळीचा व्यवसाय वाढायला सुरुवात झाली. १९९९ ते २००३ या चार वर्षांत हुकूमचंद कलंत्री यांनी दरवर्षी प्रत्येकी ३०० ते ५०० क्विंटल क्षमतेची नवीन डाळ मिल सुरू करत २००४ पर्यंत दर दिवशी डाळ उत्पादनाची क्षमता २,००० क्विंटलपर्यंत वाढवली.

मोठा मुलगा नितीन २००५ साली सीए झाला व त्याने व्यवसायात वडिलांना सोबत केली. नितीनने व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्याचे ठरवत त्या पध्दतीची यंत्रसामग्री घेण्यासही सुरुवात झाली. ग्राहकांना घरात डाळ निवडण्याचा त्रास होऊ नये यासाठी सॉर्टेक्स मशीन खरेदी केली व यंत्राच्या सहाय्याने डाळीतील खडे, खराब वस्तू वेगळय़ा करून घरात शिजवण्यासाठी स्वच्छ डाळ पॅकबंद रूपात विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ग्राहकांच्या अडचणी दूर करणारे हे एक मूल्यवर्धनच होते.

दो से भले तीन

व्यवसायात वाढ होऊ लागली. ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केला पाहिजे व ग्राहकांना बारा महिने डाळीचा तुटवडा पडता कामा नये हा कटाक्ष नितीन यांनी पाळला. तूर व हरभरा या दोन डाळी वर्षभर उपलब्ध राहतील या पध्दतीने खरेदीची व विक्रीची यंत्रणा उभी केली. मूग व उडीद याची डाळ हंगामानुसार उपलब्ध केली. आधुनिकीकरणाबरोबरच डाळ उत्पादनाची क्षमता वाढवण्यास सुरुवात करत नितीननेही नवीन डाळ मिल सुरू केल्या. २००९ साली मनीष हा दुसरा भाऊ सी.ए. झाल्यानंतर तोही व्यवसायात सहभागी झाला. ‘एक से भले दो व दो से भले तीन’ झाल्यानंतर तिघांच्या सामूहिक प्रयत्नातून व विचारातून नव्याने व्यवसायाची भरभराट सुरू झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाची अतिशय अत्याधुनिक उपकरणे घेऊन नवीन मिल्स सुरू झाल्या. कलंत्री दालमिलबरोबर कलंत्री फूड प्रॉडक्ट्स, अमृत फूड, नितीन फूड, मनीष फूड, एच. के. इंडस्ट्रीज, कलंत्री प्रोटिन्स, समय अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स अशा विविध कंपन्या आता कार्यरत आहेत.

डाळीबरोबरच लातूर परिसरात हरभऱ्याचे उत्पादन अधिक होत असल्याने व आता नव्या पिढीत डाळीपासून बेसन तयार करण्यासाठी ते दळून आणण्यास वेळ नसल्यामुळे तयार बेसन खरेदी करण्याकडे लोकांचा वाढलेला कल लक्षात घेऊन रोज तीन हजार क्विंटल बेसन तयार करता येईल या क्षमतेच्या मिल्सना सुरुवात झाली. या क्षेत्रात पाऊल ठेवताना बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने यात आपला टिकाव लागेल की नाही अशी शंका होती. मात्र अल्पावधीतच कलंत्री कुटुंबीयांनी आपली नाममुद्रा बाजारात स्थिर केली. एकेकाळी अकोला व जळगाव यांचे नाव डाळ उद्योगात पहिल्या क्रमांकावर होते व देशातील डाळीचे भाव अकोला बाजारपेठेवर अवलंबून होते. गेल्या काही वर्षांत लातूरने हे स्थान मिळवले असून यात कलंत्री उद्योगाचे योगदान मोठे आहे. तूर व हरभरा डाळीचे भाव लातूर बाजारपेठेत काय आहेत? त्यातही कलंत्रीचे भाव काय आहेत? यावर देशातील भाव ठरत असतात.

डाळ भरारी सीमांपल्याड

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत डाळीचे भाव निश्चित करताना लातूरचा विचार पहिल्यांदा करावा लागतो. एकेकाळी लातूर सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यात अग्रेसर होते. मात्र सूर्यफुलाचे भाव योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे मोर्चा वळवला. खरीप हंगामात सोयाबीन व तूर आणि रब्बी हंगामात सोयाबीनची काढणी झाल्यानंतर हरभऱ्याचे उत्पादन घेण्याकडे लोकांचा कल वाढला. लातूर जिल्हय़ात उसाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर घेतले जात होते. मात्र पावसाची अनिश्चितता, सततचा दुष्काळ यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांनीही उसाऐवजी सोयाबीन, तूर व हरभरा हे पीक घेण्यास पसंती दिली. पर्यायाने तूर व हरभऱ्याचे उत्पादन वेगाने वाढू लागले. लातूरच्या बाजारपेठेत तूर व हरभऱ्याची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली. कर्नाटक, आंध्रप्रदेश या लगतच्या प्रांताबरोबरच विदर्भातील तूरही लातूरमध्ये विक्रीसाठी येऊ लागली. लातूरच्या बाजारपेठेत भाव चांगले मिळतात, तातडीने पैसे मिळतात हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला व यात कलंत्री उद्योगाचे योगदान मोठे आहे.

गुणवत्ता, विश्वास हे दोन सूत्र कलंत्रींनी उद्योगासाठी महत्त्वाचे मानले. बाजारातील चढ -उतारामुळे प्रसंगी नुकसान सहन करावे लागले तरी चालेल मात्र खरेदीदारांना दिलेला शब्द पाळायचा. एकदा भाव ठरला की त्या भावात डाळ पोहोचवायची हे सूत्र निश्चित झाले. त्यातून देशातील सर्व व्यापाऱ्यांच्या मनात वेगळा विश्वास निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली डाळ जेव्हा बाजारपेठेत जाते तेव्हा बाजारपेठेत आपले नाव लोकांच्या तोंडात असले पाहिजे. पिस्तुल नाममुद्रेने मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू व संपूर्ण महाराष्ट्रात कलंत्री उद्योगाची डाळ पोहोचते.

डाळी एक किलो, पाच किलो, दहा किलो, पंचवीस किलो, तीस किलो व पन्नास किलोच्या पाकिटामध्ये विकल्या जातात. तर बेसन पीठ हे २०० गॅ्रम, ५०० गॅ्रम, एक किलो, १० किलो, २५ किलो व ५० किलोच्या पॅकमध्ये विकले जाते. २०१५-१६ साली जेव्हा देशभर डाळीची अडचण होती, देशांतर्गत उत्पादन गरजेच्या निम्मेच होते तेव्हा बाजारपेठेचा अंदाज घेऊन कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार येथून तूर, हरभरा, मटार याची पाच हजार टनापेक्षा अधिकची आयात करून ग्राहकांची अडचण होणार नाही याची काळजी कलंत्री उद्योगाने घेतली. आजपर्यंत ग्राहकाने मागणी केली व पुरवठा करू शकलो नाही अशी स्थितीच कधी निर्माण होऊ दिली नाही. पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच डाळ निर्यात करण्यास परवानगी दिल्याने यावर्षी कलंत्री उद्योग समूहाने अमेरिकेला दोनशे टन डाळीची निर्यात केली आहे.

कसलीही सुट्टी न घेता अथकपणे तिघेहीजण व्यवसायात लक्ष देतात. जगभर अत्याधुनिक तंत्रज्ञान काय आहे? ग्राहकांच्या कोणत्या प्रकारच्या सवयी बदलत आहेत? बाजारपेठेत नेमके लोकांना काय हवे आहे? फरसाण, शेव आदी विक्रेते यांना कोणत्या प्रकारचा माल हवा आहे? याचा अभ्यास करून ती गरज पूर्ण करण्याचे काम कलंत्री उद्योगामार्फत केले जाते. नितीन व मनीष हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या भागातील शेतकऱ्यांचा माल याच ठिकाणी विकला जावा, त्यांना अधिकाधिक पैसे मिळावेत यासाठी दोघेही प्रयत्नशील असतात. त्यातूनच या व्यवसायातील देशातील मोठे नाव म्हणून या उद्योग समूहाकडे पाहिले जाते.

हुकूमचंद कलंत्री हे लातूरच्या दालमील असोसिएशनचे गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक संस्थांतही त्यांचे योगदान असते. नितीन कलंत्री यांचे नाव देशातील डाळ उद्योगात तर सर्वश्रुत आहेच मात्र सर्व प्रकारच्या माध्यमांना डाळ उद्योगाची इत्थंभूत व अद्ययावत माहिती देणारा म्हणून त्यांची ओळख आहे. जगभर विविध देश कोणत्या प्रकारची धोरणे आखतात? आपल्याकडे धोरण कशा पध्दतीचे असायला हवे? नेमक्या अडचणी काय येत आहेत? भविष्यातील स्थिती कशी असणार आहे? याचा वेध घेत सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी, अधिकारी ते कोणत्याही अभ्यासकापर्यंत ते ही माहिती सांगत असतात. ५०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योग समूहातील हे तिघे मात्र कसलाही अभिनिवेष न दाखवता सर्वसामान्यांच्या सोबत मिसळून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आपल्या व्यवसायात त्यांच्या सूचनांचा उपयोग करून काय बदल करायला हवेत, याचा विचार सतत करतात. त्यामुळेच कलंत्री उद्योग समूहाच्या व्यवसायाचा आलेख हा कायम चढताच राहिला आहे.

हुकूमचंद कलंत्री

कलंत्री इंडस्ट्रीज

* व्यवसाय – तूर, हरभरा, मूग, उडीद, डाळी व बेसनपीठ

* कार्यान्वयन : सन १९८१

* मूळ गुंतवणूक  :  साधारण १० लाख रुपये

* सध्याची उलाढाल : सुमारे ५०० कोटी रुपये

लेखक ‘लोकसत्ता’च्या लातूरचे प्रतिनिधी

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2020 1:01 am

Web Title: maharashtra industrialists successful marathi industrialists zws 70
Next Stories
1 कल्पतरूला फुल नसे का वसंत सरला तरी?
2 बाजाराचा तंत्र कल : ‘देखा है कभी मुझे उडते हुए’
3 कर बोध : ‘फॉर्म १५ जी’ आणि ‘फॉर्म १५ एच’संबंधी..
Just Now!
X