चारुशीला कुलकर्णी

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय सुखी, शांत आयुष्याला प्राधान्य देतात. सुरक्षित चाकरी मिळाली की, वेगळा विचारही होत नाही. यात प्राध्यापकासारखी नोकरीची संधी असेल तर काही विचारायला नको! अस्सल मध्यमवर्गीयाला साजेसं आयुष्य असताना शरयूताई देशमुख यांनी वयाच्या ४० व्या वर्षी उद्योग उभारणीचा विचार केला. अडचणी कौशल्यपूर्वक सोडवत तो प्रत्यक्षात आणला. कोणताही अनुभव गाठीशी नसताना तो वेगळ्या उंचीवर नेला. रासायनिक क्षेत्रात नाशिक येथील डेल्टा फायनोक्लेम प्रा. लि. नावारूपास आली. शरयूताईंच्या धडपडीला कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची साथ मिळाली. करोनाकाळात उद्योग-व्यवसायावर मंदीचे मळभ दाटलेले आहे. मात्र या संकटातही त्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचा अभ्यास करत आहेत.

‘डेल्टा फायनोक्लेम’ आज भारतासह नऊ देशांमध्ये विविध १५० हून अधिक उत्पादने निर्यात करते. बाजारपेठच्या गरजा ओळखत नवं काही करण्याचा ध्यास डेल्टाला २०० कोटींच्या उलाढालीपर्यंत घेऊन गेला आहे. रासायनिक उद्योगात ‘डेल्टा’ने आपला स्वतंत्र ठसा उमटविला. इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. गुणवत्ता, सातत्य आणि ग्राहकांस अभिप्रेत उत्पादन देण्यासाठी निरंतर संशोधन, ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरली. सोबतचे कर्मचारी आणि सहकाऱ्यांना सन्मानाचे स्थान देण्याचा आणि एक विचार एक ध्यास बाळगण्याचा मूलमंत्र जपला. यामुळेच ३५ वर्षांच्या डेल्टाच्या प्रवासात यशाचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे शरयूताई अभिमानाने सांगतात.

माहेरी आई शिक्षिका. जे करायचे ते गुणवत्तापूर्णच हवे हे संस्कार आईने बिंबवले. वडिलांपश्चात आईने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, तिच्यातील लवचीकता, चिकाटी पाहून आपणही काही वेगळे करावे हे शरयूताईंच्या मनात पक्के झाले. विज्ञानात पदवीधर झाल्यानंतर लग्न करावे, असा कुटुंबीयांचा आग्रह असताना त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही वर्षे प्राध्यापिका म्हणून कामही केले. लग्नानंतर पूर्वाश्रमीची शरयू भदे या शरयू दत्तात्रय देशमुख झाल्या. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी करण्याऐवजी त्यांनी मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिले. तीन मुलांमध्ये सर्वात लहान मुलगा शाळेत जाऊ लागल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून निवांत झाल्याचे जाणवल्यानंतर शरयुताईंचे विचारचक्र सुरू झाले. या वेळेचा उपयोग व्हावा म्हणून एक तर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू व्हायचे किंवा स्वत:चा काही व्यवसाय करायचा हे पर्याय होते. त्यांनी उद्योग-व्यवसायाचा पर्याय निवडला.

या निर्णयाला पती दत्तात्रय यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. व्यवसाय, उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना उद्योग तरी काय करायचा, या प्रश्नाचे उत्तर मित्रमैत्रिणींच्या गप्पांच्या मैफलीत मिळाले. दत्तात्रय देशमुख यांच्या पुणेस्थित मित्रास एक रासायनिक उत्पादन हवे होते. त्याबद्दल चर्चा होत असताना शरयूताईंनी ते काम करण्याची तयारी दर्शविली. रसायनशास्त्रातील शिक्षण, अध्यापन आणि अभ्यासाच्या आधारे त्यांनी ते उत्पादन तयारही केले. त्याचा नमुना पतीच्या मित्राकडे दिला. तो प्रयोग यशस्वी झाला. यातून ‘डेल्टा’ची बीजे रोवली गेली. या कामामुळे आत्मविश्वास आला. रासायनिक उद्योगाकडे वळण्याचा निर्धार पक्का झाला. उद्योग सुरू करायचा तर भांडवल लागणार होते. कच्चा माल, मनुष्यबळ, सोबत कोण आदी प्रश्नांची मालिका असताना दत्तात्रय देशमुख यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीतील ३६ हजार रुपये शरयूताईंच्या हाती सोपविले. तसेच कामात मदत करण्याची तयारी दर्शविल्याने सातपूर औद्योगिक वसाहतीत भाडेतत्त्वावरील जागेत डेल्टा युनिटची स्थापना झाली. मनुष्यबळाचा प्रश्नदेखील सुटला. काम करताना आपण सर्वाशी नम्रतेने राहिलो तर फारसे काही बिघडत नाही. आईची ही शिकवण उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर कामी आल्याचे शरयूताई आवर्जून सांगतात. आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले.

सुरुवातीची पाच वर्षे रासायनिक उद्योगातील संधी, त्या अनुषंगाने साहित्याची जुळवाजुळव करण्यात गेली. यात अभियंता असणाऱ्या दत्तात्रय देशमुख यांनी यांत्रिकी कौशल्य पणाला लावले. शरयूताई यांच्या भावाने आर्थिक व्यवहार सांभाळले. १९८५ पासून डेल्टाच्या कामास गती मिळाली. ग्लॅक्सो, सिप्ला कंपनीची कामे मिळण्यास सुरुवात झाली. भाडेतत्त्वावरील जागेतून डेल्टाने वाडिवऱ्हे येथे स्वत:च्या जागेत पहिला प्रकल्प उभारला. कामाचा व्याप वाढत होता. शरयूताई न थकता काम करत होत्या. एकंदर स्थिती लक्षात घेऊन दत्तात्रय देशमुख यांनी आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ उद्योगात लक्ष घालत त्यांना पाठबळ दिले. देशमुख कुटुंबीय कामात गुंतल्यानंतर डेल्टाच्या उत्पादनात भर पडत गेली.

दरम्यानच्या काळात शरयूताईंचा मुलगा संदीप यानेही शिक्षण पूर्ण केले. डेल्टाच्या उत्पादनाच्या विक्री विभागाची जबाबदारी स्वीकारली. संदीप कामात सहभागी झाल्यानंतर उद्योगाचा अधिकच विस्तार झाला. भारतासह चीन, कोरिया, युरोप, जर्मनी, व्हिएतनाम, अमेरिका, ब्राझील, तैवान, जपान वेगवेगळ्या देशांमध्ये डेल्टाची उत्पादने पोहोचली. सातपूर, वाडिवऱ्हेनंतर सिन्नर आणि गोंदे या ठिकाणी उद्योगाचा परीघ विस्तारला. बोटावर मोजण्याइतपत लोकांपासून सुरू झालेल्या डेल्टाने आज ३५० कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येकाशी शरयूताईंची वैयक्तिक ओळख आहे. काहीही अडचण आल्यास कामगार बिनदिक्कत ताईंकडे येतात. कामात कधी लालफितीचा अनुभव आला तर कधी स्पर्धक मित्रांकडून स्पर्धा जाणवली. मात्र काम गुणवत्तापूर्ण असेल तर स्पर्धेत आपण हमखास पुढे जाणार ही खात्री बाळगत डेल्टाची वाटचाल सुरू राहिली. प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरयूताईंनी उद्योगातील प्रत्यक्ष सहभाग कमी करत सध्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. करोनाकाळातील टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रांवर मंदीचे सावट दाटलेले आहे. शरयूताईंनी त्याकडे संधी म्हणून पाहिले. चीनमधून भारतात आयात होणारे रासायनिक उत्पादन कोणते, त्यापैकी आपण काय करू शकतो, यावर त्या अभ्यास करत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात नोकरीचे पाहा, उद्योगधंद्याचा विचार करू नको, असा सल्ला दिला जातो. पण व्यवसायही महत्त्वाचा आहे. तो करण्यासाठी योजना तयार हवी, भविष्याचे नियोजन हवे, कामात गुणवत्ता कशी वाढवणार आहोत याची माहिती स्वतला असणे गरजेचे असल्याचे ते आवर्जून सांगतात. आजही आपल्या कामात, उत्पन्नात काय गोळाबेरीज होत आहे, याकडे त्या कटाक्षाने लक्ष देतात. उद्योग-व्यवसायात चढउतार येतात, जातात. मात्र कामात सातत्य गरजेचे आहे. आजच्या पिढीने हे ओळखल्यास सामान्य कुटुंबातील व्यक्ती उद्योग-व्यवसायात भरारी घेऊ शकतो हे शरयूताईंनी सिद्ध केले आहे.

शरयू दत्तात्रय देशमुख

डेल्टा फायनोक्लेम प्रा. लि. (नाशिक)

’ व्यवसाय -रासायनिक पदार्थाचे संशोधन/ उत्पादन

’ कार्यान्वयन : सन १९७८

’ मूळ गुंतवणूक  :  साधारण ३६ हजार रुपये

’ सध्याची उलाढाल : वार्षिक २०० कोटींच्या पुढे

’ कामगार  :  ३५० हून अधिक

’ वित्तपुरवठा : जनलक्ष्मी बँक, स्टेट बँक

प्रयोग आणि यशापयश!

रासायनिक उत्पादनात सर्वच प्रयोग यशस्वी होतात असे नाही. आज ‘डेल्टा फायनोक्लेम’ औषधनिर्माण, ‘पॉलिमर’, ‘डाइज्’ उद्योगांना लागणाऱ्या रासायनिक पदार्थाची निर्मिती करते. ‘कॅटालिस्ट’, ‘ब्रोमाइड्स’ आणि प्रगत ‘इंटरमिजिएट’ (औषधांसाठी लागणारे साधन) विकसित करण्यात आले. सर्व प्रकारच्या रासायनिक उद्योगांना लागणाऱ्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो. मात्र एकदा कंपनीला एक उत्पादन तयार करायचे होते. शरयूताई, दत्तात्रय देशमुख आणि त्यांचे सहकारी रात्री दोनपर्यंत ते रसायन तयार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. अखेर घरी परतल्यानंतर काय करता येईल, या विचाराने शरयूताई अस्वस्थ झाल्या. रसायनशास्त्रातील अभ्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. ती प्रक्रिया या पद्धतीने केली तर असा विचार करत त्यांनी दुसऱ्या दिवशी लवकरच कारखाना गाठला. दुपारी दोन वाजता तो प्रयोग यशस्वी झाला. असे अनेक चढ-उतार आले.

लेखिका ‘लोकसत्ता’च्या नाशिकच्या प्रतिनिधी

charushila.kulkarni@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.