अतुल कोतकर atul@sampannanivesh.com

निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड

* फंड गट लार्ज कॅप

* फंडाची सुरुवात ८ ऑगस्ट २००७

* फंड मालमत्ता ९,८२८ कोटी (३० एप्रिल २०२१ रोजी)

* मानदंड   एस अ‍ॅण्ड पी बीएसई १०० टीआरआय

फंडाच्या कामगिरीचा मागोवा घेण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींमध्ये दहा वर्षांतील कामगिरी हा एक महत्त्वाचा निकष आहे. निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंडाच्या रेग्युलर ग्रोथमध्ये १ जून २०११ रोजी गुंतविलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १ जून २०२१ रोजीच्या एनएव्हीनुसार ३,३९,५१८ रुपये झाले आहेत. याच फंडात १ जून २०२० रोजी ज्यांनी १ लाख रुपये गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीचे १ जून २०२१ रोजीच्या एनएव्हीनुसार १,६८,०४० रुपये झाले आहेत. मागील दहा वर्षांत गुंतवणूकदारांना या फंडाने दिलेल्या वार्षिक लाभाचा दर वार्षिक सरासरी ११.१५ टक्के आहे, तर मागील वर्षभरात मिळालेल्या वार्षिक लाभाचा दर ६८ टक्के आहे. प्रदीर्घ काळापासून ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ या शिफारसप्राप्त फंडांच्या यादीत समावेश असलेल्या या फंडाची पद्धतशीर गुंतवणूक कामगिरी (एसआयपी) देखील तितकीच प्रभावी राहिली आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडातील ‘एसआयपी’वरील तीन वर्षांचा वार्षिक लाभाचा दर १८.९६ टक्के, पाच वर्षांसाठी लाभ दर १३.५४ टक्के वार्षिक असा, सात वर्षांसाठी १२.५४ टक्के आणि १० वर्षांसाठी वार्षिक लाभ दर १४.०० टक्के आहे. विविध कालावधीतील ‘एसआयपी’ कामगिरीचा दोन आकडय़ांत परतावा राखणारे जे मोजके लार्जकॅप फंड आहेत त्या फंडांपैकी निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड असल्याने आजच्या शिफारशीसाठी या फंडाची निवड केली आहे.

अलीकडेच डेप्युटी सीआयओ, समभाग गुंतवणूक म्हणून बढती मिळालेले शैलेश राज भान हे या फंडाचे मागील दहा वर्षांपासून निधी व्यवस्थापक आहेत, तर किंजल देसाई सह-निधी व्यवस्थापिका आहेत. शैलेश राज भान यांचे ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ हे समभाग निवडीचे सूत्र राहिले आहे. साहजिकच सुदृढ ताळेबंद हा समभाग निवडीचा मुख्य निकष राहिला आहे. शैलेश राज भान हे सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर असलेल्या कंपन्यांना गुंतवणुकीत प्राधान्य देत आले आहेत. शाश्वत वृद्धीदर असलेल्या आणि उत्सर्जनात (अर्निग) दृश्यमानता असलेल्या समभाग/ कंपन्यांना नेहमीच अधिमूल्याचा फायदा मिळतो. आणि अशा कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करायचा असल्यास त्यांना अधिमूल्य द्यावे लागते हा त्यांचा विचार असल्याने अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर भरघोस नफा करून देणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस अशा दिग्गज कंपन्यांना गुंतवणुकीत त्यांनी अनेक वर्षांपासून मोठा वाटा दिला आहे. एखाद्या कंपनीचे मूल्यांकन करताना निधी व्यवस्थापक त्या कंपनीच्या गुणात्मक पैलूंकडे प्रकर्षांने लक्ष देतात. एखाद्या कंपनीच्या व्यवसायाचे शाश्वत प्रारूप, व्यवस्थापन, टिकाऊ  व स्पर्धात्मक फायदे असलेल्या कंपन्या हुडकून काढण्याचे कौशल्य शैलेश राज भान यांच्याकडे आहे. मूलभूत संशोधनाचा वापर करताना समष्टी अर्थशास्त्राकडून (मॅक्रो इकोनॉमिक्स) मिळणाऱ्या संकेतांचा ते योग्य वापर करतात. व्याजदर, महागाई यांसारख्या घटकांचा विचार केला जातो. तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि आर्थिक सेवा यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करताना ‘टॉप-डाऊन’ पद्धतीचा ते अवलंब करतात. निप्पॉन इंडिया फंड घराण्याकडे विश्लेषकांचा मोठा ताफा असून हा ताफा त्यांना मिडकॅप / स्मॉलकॅप समभागांच्या निवडीसाठी आवश्यक ते संशोधन उपलब्ध करून देतो.

हा फंड लार्जकॅप फंड गटात असल्याने फंडाच्या एकूण मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता लार्जकॅप प्रकारात गुंतविली जाते. शैलेश राज भान हे फंडाच्या मानदंडांप्रति (बेंचमार्क) जागरूक असलेले निधी व्यवस्थापक असल्याने त्या निर्देशांकात असलेल्या सर्वच उद्योगांना गुंतवणुकीत कमी-अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व देत आले आहेत. राज भान यांनी मागील दहा वर्षांत पोर्टफोलिओमध्ये गैरवाजवी जोखीम घेणे कायम टाळलेले दिसते. ‘मॉर्निगस्टार टेन इयर्स रिस्क रिवॉर्ड स्कॅटर प्लॉट’नुसार फंडाचा जोखीम परतावा समतोल साधलेला दिसला तरी तीन वर्षे आणि पाच वर्षे या काळात फंडाची मानदंड-सापेक्ष कामगिरी अधिक जोखीम अधिक परतावा चतुष्कोनात स्थापित झालेली दिसते. ऑक्टोबर २०१८ मधील फंड सुसूत्रीकरणानंतर ‘सेबी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार फंडाच्या व्यापक गुंतवणूक रणनीतीत बदल झाले आहेत. फंडाचा गुंतवणूक परीघ अव्वल २०० कंपन्यांकडून अव्वल १०० कंपन्यांपुरता आक्रसला आहे. फंड सुसूत्रीकरणापूर्वी मिडकॅप व स्मॉलकॅप समभागांमधील गुंतवणुकीचा हिस्सा ३० टक्क्यांवरून २० टक्के इतका कमी झाला आहे. फंड सुसूत्रीकरणानंतर म्हणजेच फंडाची मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील गुंतवणूक कमी झाल्याने त्यातील अस्थिरतासुद्धा कमी झाल्याचे दिसते.

विद्यमान पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा देशांतर्गत पुनप्र्राप्तीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांतून गुंतविला आहे. साहजिकच आतिथ्य सेवा, ऊर्जा बचावात्मक समजले जाणाऱ्या उपभोग्य वस्तू, आरोग्य निगा, तंत्रज्ञान यांचा भार कमी करून बँका, अभियांत्रिकी उद्योग आणि भांडवली वस्तू या क्षेत्राबद्दल त्यांचा आशावाद उद्योग स्थानांतरण (सेक्टर रोटेशन) मधून व्यक्त होताना दिसतो. फंडाच्या ‘निर्देशांक सापेक्ष’ (‘रिलेटिव्ह परफॉर्मन्स’चा) विचार केल्यास निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंडची कामगिरी ‘एस अँड पी बीएसई १०० टीआरआय’च्या तुलनेत अन्य स्पर्धक फंडांपेक्षा मागील वर्षभरात कमालीची उजवी ठरली आहे. एक वर्ष कामगिरीच्या बळावर हा फंड लार्जकॅप गटात दुसऱ्या स्थानी आहे. तीन महिने, सहा महिने आणि नऊ महिने कालावधीच्या कामगिरीवर फंडाने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. या कामगिरीची दखल ‘क्रिसिल’ने जानेवारी-मार्च २०२१ या तिमाही आढाव्यात घेतली असून ‘सीएमएफआर’ (क्रिसिल म्युच्युअल फंड रॅकिंग)मध्ये एका पायरीची सुधारणा केली आहे. श्रीधर फडके यांनी गायलेल्या ओळींचा आधार सांगायचे तर ‘एक वेस ओलांडता, गांव नवे दिसू लागले’ तद्वत फंडाने सुधारणेची एक पायरी ओलांडल्याने भविष्यात नवीन सुधार दिसू लागले आहेत. एका कुशल व्यवस्थापकाची कामगिरी आत्मविश्वास वाढविणारी असल्याने बाजारी आवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेवर मात करीत हा फंड जोखीम परतावा गुणोत्तरात अव्वल ठरेल अशी आशा वाटते.

शैलेश राज भानडेप्युटी सीआयओ (समभाग गुंतवणूक), निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड

फंड गुंतवणुकीची रणनीती ठरविताना कंपन्यांची निवड ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ या तत्त्वानुसार केली जाते. भारताला आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विकसित नाममुद्रा असलेल्या तसेच उच्चतम उत्पादन गुणवत्ता, स्पर्धात्मक वितरण व्यवस्था व जागतिक स्पर्धेत तग धरू शकणाऱ्या प्रणाली (सिस्टिम्स) असलेल्या मोठय़ा (लार्जकॅप) कंपन्या नेहमीच असल्या पाहिजेत. कारण अशा कंपन्यांची नफाक्षमता निरंतर वाढ दर्शवीत असते.