गुंतवणुकीतून ‘घबाडा’ची अपेक्षा म्हणजे स्वकष्टार्जित पैसा गमावला जाण्याची अधिकाधिक जोखीम.. संपत्ती निर्माणाची साधना, तंत्र मंत्र आणि फसगत अशा पैशाशी संलग्न सर्व पैलूंबद्दल जाणीवजागृतीचे हे मासिक सदर..

नवीन वर्षांत आíथक साक्षरतेचे खालील नियम अंगी बाणूया. जानेवारी ते मार्च काटेकोरपणे पालन करू. नंतर आयुष्यभरासाठी सवय जोडून घेऊ.

नवीन वर्ष सुरू झाले की आपल्याकडून नवीन उपक्रमाबद्दल / संकल्पाबद्दल विचार करण्यास सुरुवात होते. या वर्षांत सकाळी योगासने करणे, चालणे, डायरी लिहिणे, घर खर्च लिहिणे इ. बहुतेक वेळा ठरविले जाते. पण त्यांची नवलाई महिन्या-दोन महिन्यांत संपते व पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ सुरू होते. माझ्या गुरूंनी एकदा सांगितले, ‘‘खूप जण चातुर्मासात नेम करतात व नंतर सोडतात. त्याऐवजी एक दुर्गुण सोडावा (किंवा गुण जोडावा), चार महिने सवय झाली की पुढे ती कायम ठेवावी म्हणजे ती सवय अंगी बाणते.’’आपण नवीन वर्षांत आíथक साक्षरतेचे खालील नियम अंगी बाणूया. जानेवारी ते मार्च काटेकोरपणे पालन करा व नंतर सवय आयुष्यभर जोडून घ्या.

  • संपूर्ण माहितीखेरीज गुंतवणूक नाही

योजनेची संपूर्ण माहिती घेतल्याखेरीज गुंतवणूक करू नका. माहिती मिळणे कायद्यानुसार हा तुमचा हक्क आहे. आपल्या हक्कांबाबत जागरूक राहा. खूपदा एजंट योजनेचे फक्त फायदे सांगतात. त्यातील त्रुटी सांगत नाहीत. तीन वर्षे लॉक-इन काळ आहे. रक्कम काढता येणार नाही. हे खूपदा एजंट सांगत नाहीत, मग ते म्युच्युअल फंडाचे असोत किंवा पोस्टाचे असोत. विम्याच्या बाबतीत संस्था माहितीपत्रक अतिशय त्रोटक देतात. अधिक माहिती वेबसाइटवर आहे सांगतात. वेबसाइटवरची माहिती कधीही बदलता येते. एजंटला वेबसाइटवरच्या माहितीची छापील प्रत काढून दे व त्यावर सही कर म्हणून सांगावे. सही करण्यास नकार दिल्यास योग्य तो बोध घ्यावा. मालाडच्या नंदू जोशी यांना फोन आला आमच्यामार्फत या विमा कंपनीची पॉलिसी घ्या. मुंबईत विमा कंपनीची वीज वितरण कंपनी आहे. त्यांच्या ग्राहकांना विजेच्या बिलात २० टक्के सूट मिळेल. याची संपूर्ण माहिती आमच्या (एजंटच्या) वेबसाइटवर आहे. माणूस तुमच्या घरी कधी पाठवू? माणूस पाठवू नका, मीच तुमच्या ऑफिसमध्ये येतो म्हटल्यावर, आमचे ऑफिस बेलापूरला आहे, इतक्या लांब तुम्ही नका येऊ सांगितले. ठीक आहे, पण तुमचा पत्ता तर सांगा म्हटल्यावर पत्ता चुकीचा सांगितला.

  • गुंतवणूक निर्णयात घाई गडबड नको

योजना बंद होते आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. असे सांगून बहुतेक वेळा आयुर्वमिा पॉलिसी गळ्यात मारल्या जातात. योजना बंद झाली म्हणजे कंपनी बंद होत नाही. त्यांचा धंदा चालू राहण्यासाठी त्यांना नवीन योजना बाजारात आणाव्याच लागतात. एक योजना बंद झाली म्हणून गुंतवणुकीची फार मोठी संधी गेली असे होत नाही. गुंतवणुकीचे निर्णय घाई गडबडीत कधीही घेऊ नयेत. सर जॉन टेंपलटन यांनी गुंतवणुकीचे १६ नियम सांगितले आहेत. त्यात पहिला नियम आहे. देवाची प्रार्थना करा. (म्हणजे डोके शांत ठेवून निर्णय घ्या.) म्हणजे निर्णय चुकण्याची शक्यता कमी असते.

  • जोडीदार फक्त ‘सह्य़ा’जीराव नसावा

पत्नीला (किंवा पतीला) गुंतवणूक योजना समजावून सांगितल्यावर मगच त्यांची सही घ्या. बहुतेक वेळा या विषयात कुटुंबातील एकाची बाजू लंगडी असते. ते फक्त ‘सह्य़ा’जी राव असतात. फुली मारलेल्या जागी फक्त सही करणे एवढेच त्यांचे काम. जास्त करून हे स्त्रियांबाबत घडते. त्यांच्यात चौकसपणा असतो. तो सर्व भाजीवाल्याजवळ किंवा वाणीसामान खरेदी करताना वापरला जातो. महिलांना गुंतवणूक योजनांची व्यवस्थित माहिती करून दिल्यास तो चौकसपणा एजंटबरोबर वापरला जाईल, आणि शेरेगरसारख्या योजनातून सुटका होईल.

एका शेअर ब्रोकरकडील ‘टायवाला’ प्रतिनिधी माझ्या मित्राच्या मागे लागला. आमच्यामार्फत फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये गुंतवणूक करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. भरपूर नफा होतो. त्याच्या पत्नीने ‘टायवाल्या’ला दोन प्रश्न विचारले. आमचा फायदा म्हणजे कोणाचे तरी नुकसान, मग दरवेळेस आम्हालाच फायदा होईल कशावरून! भरपूर नफा होतो तर संपूर्ण वर्षभरात मिळून नुकसान झाल्यास तुम्ही भरून देणार का? माझा मित्र बचावला, पण त्याच्या ऑफिसमधील त्याच्या सहकाऱ्याचे लाखाचे बारा हजार झाले.

  • निरंतर आढावा

आपल्या सर्व गुंतवणुकांसाठी एक नोंदवही करा. दरमहा ती अद्ययावत करा. सर्व गुंतवणुकांचा दरमहा आढावा घ्या. मुदत संपते आहे का? विम्याचे हप्ते भरणे बाकी आहेत का? एखादी गुंतवणूक मोडून दुसऱ्या ठिकाणी गुंतवणे आवश्यक आहे का? याचा आढावा घ्या.

  • गरज अन् गुंतवणूक मेळ असावा

आपल्या गरजांचा गुंतवणूक योजनांबरोबर मेळ घाला. आपल्या गरजा काय आहेत त्यानुसार गुंतवणुकाची मुदत संपते आहे का? गरजेच्या आधी रक्कम सहा महिने हातात येऊन तरल गुंतवणूक स्वरूपात ठेवता येते.

एक उदाहरणच सांगतो. मुंबईतील एका वीज वितरण कंपनीचे एका खासगी बँकेबरोबर ‘टाय-अप’ झाले आहे. कंपनीतून निवृत्त होणाऱ्यांचे आíथक नियोजन बँक प्रतिनिधी करतात. निवृत्तीनंतर मिळालेल्या पुंजीतून प्रत्येकास युनिट िलक्ड विमा घेण्यास भाग पाडले होते. निवृत्तीनंतर आयुर्वम्यिाची गरज नसते, कारण आपण कमावते नसतो. त्या शिवाय रु. ४० हजार वार्षकि हप्त्याची बांधिलकी आली.

  • स्व-अभ्यास करा

एकविसाव्या शतकात ज्ञान हेच सर्वोत्तम साधन आहे. गुंतवणुकांबाबतचे अभ्यासक्रम करा. शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असल्यास फंडामेंटल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन अंगांनी अभ्यास करता येतो. कंपन्यांची माहिती गोळी करीत राहा.

माझा मित्र शिरीष जोगळेकर इंजिनीअर आहे. स्वत:च्या गुंतवणुकांचे नियोजन करताना ‘सर्टफिाइड फिनान्शियल प्लॅनर’ ही परीक्षा पास झाला. आपले ज्ञान ठरावीक काळानंतर अद्ययावत करत राहा. आपण शिका आणि आपल्या मुलांना आíथक शिक्षणाचे धडे द्या. लहानपणापासूनच त्यांना बचतीची सवय लावा. वॉरेन बफे यांनी सर्वप्रथम वयाच्या चौदाव्या वर्षी शेअर्स खरेदी केले. गुंतवणूक जितक्या लवकर चालू कराल तितका फायदा जास्त होतो. योग्य वेळ पाहून गुंतवणूक करायचे ठरवल्यास योग्य वेळ कधीच येत नाही आणि उद्या, उद्या कधी संपत नाही.

  • दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार व्हा

पेपरला जाहिराती येतात, फोनवर अनाहूत  एसएमएस येतात- ‘शेअर बाजारात ट्रेिडग करून रोज ७७७ फायदा कमवा;’ ‘्नआम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ. ऑप्शन ट्रेडिंगची संकल्पना समजावून घ्या. आम्ही तुम्हाला प्रशिक्षणानंतरसुद्धा मार्गदर्शन करू..’ वगैरे. माझ्या शेअर-बाजारातील ३० वर्षांच्या कारकीर्दीत मला एकही माणूस डे-ट्रेिडगमध्ये पस कमावणारा भेटलेला नाही. जर असा फायदा होत असता तर प्रशिक्षण देणारा अब्जाधीश झाला असता. आणि तो प्रशिक्षण देत बसला नसता.

आपण पीपीएफ, आरोग्य विमा, पोस्टाच्या योजना सरकारी कंपन्यांचे रोखे या सर्व दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका आपण करीत असतो. फक्त शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक एक/दोन वर्षांच्या हिशोबाने करतो. वॉरेन बफे म्हणतात, ‘मी एखादा शेअर घेतल्यावर विचार करतो की उद्या शेअर बाजार बंद पडेल आणि पाच वष्रे उघडणारच नाही.’ (म्हणजे विकायची इच्छा झाली तरी विकू शकणार नाही!)

बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजावून घ्या. काळाचे मूल्य (चक्रवाढ व्याज किंवा टाइम व्हॅल्यू ऑफ मनी) जाणून घ्या व जाणते गुंतवणूकदार व्हा.

नवीन दशकातील सोळाव्या वर्षांचे हे आठ संकल्प सिद्धीस जावोत म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन वर्ष आपणा सर्वास सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जाईल. या शुभेच्छासह आज थांबतो.

sebiregisteredadvisor@gmail.com

लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.