18 February 2019

News Flash

मुरली ‘मोहन’ मोही मना!

प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाची पहिली एनएव्ही १४ जानेवारी २००० रोजी जाहीर झाली.

सामान्यांना अनभिज्ञ असलेल्या या फंडाची ओळख ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना या अगोदर ७ ऑगस्ट २०१७ रोजी करून दिली होती. या दिवशी या फंडात केलेल्या एका लाखाच्या गुंतवणुकीचे २ फेब्रुवारी २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.११ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर २७.३५ टक्के आहे. मोदी सरकारमुळे प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाला नक्कीच सोन्याचे दिवस गुंतवणूकदारांना दाखवता आले आहेत. फंडाच्या सुरुवातीपासून म्हणजे १९ मे २०१४ पासून सुरू केलेल्या ‘एसआयपी’वर २०.१५ टक्के वार्षिक परतावा देणारा हा फंड ‘हायब्रीड फंड’ गटात दुसऱ्या क्रमांकावर (२ फेब्रुवारी २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार) आहे.

प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाची पहिली एनएव्ही १४ जानेवारी २००० रोजी जाहीर झाली. पीव्हीके मोहन हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. मोहन यांना एकूण २४ वर्षांचा समभाग विश्लेषण आणि निधी व्यवस्थापनाचा अनुभव आहे. प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाच्या समभाग गुंतवणुकीची सूत्रे त्यांच्याकडे  मे २०१० रोजी सुपूर्द केली गेली. फंडाच्या रोखे व्यवस्थापनाची सूत्रे बेक्सी कुरियाकोस यांच्याकडे मार्च २०१६ पासून आहेत. फंडाने आपल्या गुंतवणुकीत बँकिंग, धातू, तंत्रज्ञान, उत्पादन, सिमेंट यांना प्राथमिकता दिली आहे. मागील महिन्याभरात फंडाने गुंतवणुकीत पॉवरग्रीड, गेल, पीएनबी, रामकृष्ण फोर्जिंग (वाहन पूरक उत्पादने), किलरेस्कर फेरस या सारख्या आर्थिक आवर्तनाशी संबंधित कंपन्यांचा समावेश केला आहे. हायब्रीड फंड गटात, गुंतवणुकीत केंद्र सरकारचे रोखे सर्वाधिक असलेला हा एकमेव फंड आहे. त्यामुळे बाजारातील वेगाने होणारे चढ-उतार पाहता भविष्यात निर्देशांकापेक्षा कमी नुकसान झालेला हा फंड असेल.

अकराव्या आयपीएलसाठी खेळाडूंना मिळालेली किंमत आणि म्युच्युअल फंडाचा परतावा यांच्यात बरेच साम्य दिसत आहे. अनेक संघ मालकांनी नवीन खेळाडू घेण्याकडे कल दाखवत, त्यासाठी भरभक्कम किंमत मोजली आहे. रविचंद्रन अश्विनला जुन्या संघ मालकांची संघात राखण्याची इच्छा असूनही दुसऱ्या पंजाबच्या संघ मालकिणीने अश्विनसाठी ७ कोटी ६० लाखांची बोली लावत त्याला आपल्याकडे घेतले. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला असून राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख रुपये तर सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरलेल्या जयदेव उनाडकटसाठी ११.५० कोटी बोली लावत त्याला खरेदी केले. तुलनेने नवख्या असलेल्या या फंडाची ३१ डिसेंबर २०१६ रोजी ४९.०२ कोटींची मालमत्ता होती. या फंडाने ३१ जानेवारी २०१८ रोजी १ हजार कोटींचा टप्पा पार केला. आहे. फंड निवडीसाठी फंडाची कामगिरी हाच निकष ठरला. मालमत्तेच्या लहान आकारामुळे या फंडाला नाकारणाऱ्या मूठभर पोथीनिष्ठांना विचार करायला लावणारी हो गोष्ट आहे. वर्षभरात ३६ टक्के परतावा देणारा हा फंड १ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे मुदतीच्या चलत सरसरीच्या क्रमवारीत पहिल्या तीन फंडात आपले स्थान मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राखून आहे. मागील पाच वर्षांत २० पैकी १८ तिमाहीत या फंडाने संलग्न निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. ‘नमों’चे अर्थकारण समजून गुंतवणूक केल्यामुळे लाभार्थी ठरलेला हा फंड दरमहा १ टक्का लाभांश जाहीर करणारा फंड आहे. भांडवली वृद्धी आणि नियमित करमुक्त उत्पन्नाचा स्रोत (ताज्या अर्थसंकल्पातील नवीन कर तरतूद मंजूर होऊन लागू होईपर्यंत तरी) असल्याने या फंडाचा समावेश ‘भक्तां’सोबत अभक्तांनीही आपल्या गुंतवणुकीत सल्लागाराच्या मदतीने करावा.

वसंत माधव कुळकर्णी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on February 5, 2018 12:30 am

Web Title: principal balanced fund and hybrid fund