अजय वाळिंबे

यंदाचं वर्ष मोठं गमतीदार होतं. एका वर्षांत निफ्टीमध्ये १२ टक्के आणि सेन्सेक्समध्येही चांगली वाढ झालेली दिसली खरी. पण तरीही अनेक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांची कामगिरी मात्र निराशाजनकच राहिली. याचं मुख्य कारण म्हणजे निर्देशांकाच्या वाढीपैकी सुमारे ८५ टक्के वाढ ही केवळ काही ठरावीक शेअर्समुळे झालेली आहे. यामध्ये एचडीएफसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक यांचा समावेश होतो. या शेअर्सना बाजारात ‘हृतिक’ शेअर्स असेही म्हणतात.

महत्त्वाचे म्हणजे आपल्या शेअर बाजार निर्देशांकांचा हा परतावा जागतिक बाजारांच्या निर्देशांकाच्या तुलनेत कमीच आहे. तसेच लागोपाठ दुसऱ्या वर्षी मिडकॅपमध्ये- निफ्टी मिडकॅप निर्देशांकात अवघी ४.५ टक्के तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात तर १० टक्क्यांची घट झाली आहे. गंमत म्हणजे यंदा शेअर बाजाराकडे पाठ फिरवून ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली होती त्यांना मात्र वार्षिक १८ टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळेच तुमच्या पोर्टफोलियोमधील किमान १० टक्के गुंतवणूक ही सोन्यांत असावी या विचाराला आता बळकटी येईल. गेल्या वर्षांत ‘आयपीओ’द्वारे १२,३६२ कोटी रुपये उभारण्यात आले. केवळ नवीन इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही ‘आयपीओ’नी दणक्यात फायदा करून दिला आहे. यात प्रामुख्याने आयआरसीटीसी आणि उज्जीवनचा समावेश करावा लागेल.

सरलेल्या २०१९च्या मंदीच्या वातावरणात ‘माझा पोर्टफोलियो’ने फारशी चांगली कामगिरी करून दाखविली नसली तरी ती वाईट आहे असेही म्हणता येणार नाही. टाटा स्पाँज, नोसिल, सन टीव्ही, एक्सेल, कॅप्लिन पॉइंट आणि इन्सेक्टिसाइड इंडिया या कंपन्यांतील गुंतवणुकीमुळे पोर्टफोलियोच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झालेला दिसतो. परंतु आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयसीआयसीआय लोम्बार्ड, मेट्रोपोलीस, नेस्को, बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि अ‍ॅपेक्स फ्रोजन फूड्ससारख्या कंपन्यांनी पोर्टफोलियोला तारले असे म्हणता येईल. ज्या गुंतवणुकीने उद्दिष्ट पूर्ण केले आहे त्यात थोडी निर्गुतवणूक करायला हरकत नाही. तसेच इतरही शेअर्समध्ये आगामी त्रमासिक आर्थिक निकालानंतर तसेच अर्थसंकल्पानंतर आढावा घेऊन गुंतवणूक अथवा ‘स्टॉप लॉस’चा विचार करावा. या सदरात सुचविलेली गुंतवणूक मध्यम ते दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी संयम दाखविणे गरजेचे आहे.

जाता जाता अजून एक. सरलेले २०१९ ‘हृतिक’चे होते, तर २०२० ‘सलमान’चे आहे असे म्हणतात. हा ‘सलमान’ म्हणजे एसबीआय, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, मारुती, अ‍ॅक्सिस बँक आणि एनटीपीसी. आपण मात्र आपला हिरो स्वतच शोधायचा आहे.. अभ्यास सुरू ठेवून मगच गुंतवणूक करायची आहे.