शेअर बाजारातील निवडणूक-पूर्व तेजी निर्देशांकांना दररोज नव्या उच्चांकावर नेऊन बसविणारी विक्रमी खरीच. पण ही तेजी निर्देशांकांना कुठवर घेऊन जाईल? बाजारातील सध्याच्या सर्वमान्य अपेक्षेप्रमाणे निवडणुकांचा कौल न आल्यास काय घडेल? असे प्रश्न या बाजारात कष्टाचा पैसा घालणाऱ्या गुंतवणूकदाराला पडायलाच हवेत. परंतु निकाल काहीही येवोत जे घडेल ते आम गुंतवणूकदारांना घाव देणारे असेल, असा सामाईक विचार मांडणारे हे दोन लेख.. निर्देशांक घसरतील/ वधारतील याचा अंदाज बांधण्यापेक्षा, मोहात पाडणाऱ्या नवीन खरेदीपासून दूर राहणे यातच गुंतवणूकदारांचे हित आहे असे सूचित करीत धोक्याचा इशारा देणारेही..
* आज आपला शेअर बाजार संपूर्णपणे परदेशी गुंतवणूकदारांच्या ताब्यात आहे. सप्टेंबर २०१३ पासून विदेशी गुंतवणूक संस्था प्रचंड मोठय़ा प्रमाणात भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहेत. या संस्था धर्मादाय नाहीत, नफा कमावण्यासाठीच त्या गुंतवणूक करीत आहेत. योग्य प्रमाणात व ठरावीक काळात नफा होत असेल तर तो त्यांना पदरात पाडून घ्यायचा आहे. ते खरेदी करीत आहेत व आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार, भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर्स विकत आहेत. कोणत्याही वस्तूप्रमाणेच शेअर्सचे भाव मागणी व पुरवठय़ाच्या संतुलनातून ठरतात. पुरवठय़ापेक्षा मागणी खूप जास्त म्हणून शेअर बाजार वर जात आहे.
शेअर बाजार वर जात असताना देशाची किंवा कंपन्यांची आíथक स्थिती सुधारली आहे का? बिलकूल नाही. औद्योगिक उत्पादन कमी झाले आहे. महागाई कमी होण्याचे काहीही चिन्ह नाही. आणि म्हणून रिझव्र्ह बँक व्याजदर कमी करीत नाही. देशात नुकत्याच झालेल्या अकाली पावसामुळे व गारपिटीमुळे आíथक नुकसान किती झाले आहे याची खात्रीशीर आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही. यामुळे अन्नधान्य, फळे यांच्या किमती खूप वाढण्याची शक्यता आहे. देशाचा खालावलेला आर्थिक विकासदर (जीडीपी) वाढीचा दर चालू वर्षांत ६ टक्क्य़ांपल्याड जाणे शक्य नाही यावर सर्व अर्थतज्ज्ञांचे एकमत आहे. शेअर बाजारात तेजी, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी ही विसंगती दोन मार्गानी दूर होते. एक देशातील मंदी संपून किंवा शेअर बाजाराला आलेली सूज (जास्त पशामुळे, खोटय़ा मागणीमुळे) कमी होऊन! देशाची प्रगती होण्यासाठी किंवा मंदी जाण्यासाठी काही काळ जावा लागतो, पण खोटी सूज पटकन उतरू शकते.
 ही खोटी सूज आणली कशी?
नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून घोषणा झाल्याबरोबर सर्व अर्थविषयक दैनिके, साप्ताहिके यांना एकच विषय मिळाला – मोदी आणि देशाचा विकास! जणू काही मोदींच्या हातात जादूची छडी आहे आणि ते निवडून आल्यावर भारताची आíथक परिस्थिती लगेच दुसऱ्या दिवसापासून सुधारणार आहे. एका इंग्रजी अर्थविषयक दैनिकाची पहिली पाच-सहा पाने, रोज आíथक बातम्या न छापता फक्त मोदींच्या बातम्या छापत आहे. मोदी निवडून आले तरी सुधारासाठी पुढील काही काळ वाट पाहावी लागेल हे पक्के माहीत असूनही! इतकेच काय, मागील पाच वर्षांत झालेली आíथक अधोगती भरून निघायला दोन ते तीन वष्रे जातील याची स्पष्ट कल्पना परदेशी गुंतवणूकदारांनाही आहे.
शेअर बाजारातील ही तेजी सर्वसमावेशक नाही. म्हणजे निर्देशांकातील समाविष्ट काही निवडक समभागच वर जात आहेत. विदेशी संस्था जे शेअर्स घेतात ते वर जातात. म्हणजेच ही सुदृढ वाढ नसून सूज आहे.
 मग ही सूज उतरणार कशी?
ही तेजी आíथक बाबी/निकषांवर आधारित नसून केवळ एका बाह्य़ (राजकीय) अंदाजावर आधारित आहे. फुग्यात भरलेली हवा, फुगा ठरावीक उंचीवर गेल्यावर परदेशी गुंतवणूकदार सोडून देणार म्हणजे ते विकायला सुरुवात करणार म्हणजे-  
पर्याय १-  मोदींचे सरकार न येता इतर पक्षांचे सरकार आले :
मग फुग्यातील हवा काढून घेण्यास चांगले कारण सापडेल, मग बातम्या येतील..  आता भारताचे काही खरे नाही, देश आíथकदृष्टय़ा कमकुवत होणार वैगरे वैगरे, परंतु चंद्रशेखर, देवेगौडा यांच्या काळातसुद्धा शेअर बाजार चालूच होता, बंद पडलेला नव्हता!
पर्याय २ – मोदींचे सरकार इतर पक्षांच्या कुबडय़ांवर सत्तेत आल्यास :
येणाऱ्या बातम्या.. अपेक्षित जादूई आकडा गाठता न आल्याने मोदींना खूप तडजोड करावी लागेल, अपेक्षेप्रमाणे ते आíथक गाडा हाकू शकणार नाहीत. म्हणून मग विक्रीचा मारा सुरू होईल.
पर्याय ३- भाजपने स्वबळावर ३०० जागा मिळविल्या व मित्रपक्षांच्या मदतीची गरज उरणार नाही :
येणाऱ्या बातम्या.. मोदींच्या हातात निरंकुश सत्ता असेल; महागाई निर्देशांक काही लगेचच कमी होणार नाही; आर्थिक विकास दरात वाढ वर्षभर तरी शक्य नाही वैगरे वैगरे. म्हणून शेअर्स विक्रीचा मारा सुरू होईल.
म्हणजे एकुणात काय? तर आम्हाला नफा होतो आहे, आम्ही तो पदरात पाडून घेणार. यातील हा तिसरा सध्या सर्वाधिक अपेक्षिला जाणारा पर्याय खरोखरच अस्तित्वात आला तर सर्वसामन्य गुंतवणूकदार शेअर बाजारात उडी मारतील आणि फसविले जाण्याची शक्यता फार म्हणूनच हा लेख.
  १६ मे २०१४ नंतर बाजार खाली जाण्याची शक्यता का?
१) डिसेंबर २०१३ मध्ये चार राज्यांचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेल्यावर सिंगापूर निफ्टी फ्युचर्स २५० अंकांनी वर होता. तो भारतीय बाजार उघडण्यापूर्वी (सकाळी ९ ते ९.१५) फक्त ७५ अंक वर होता, बाजार उघडल्यावर (९.१५ वाजता) निफ्टी स्पॉट ५० अंक वर होता व बाजार बंद होताना आधीच्या दिवसापेक्षा खाली होता.
२)आयडीएफसीला बँकिंग परवाना मिळणार या शक्यतेवर या समभागाचा भाव वर गेला होता. प्रत्यक्षात परवाना मिळाल्यावर मात्र भाव खाली गेला. म्हणजेच एखादी गोष्ट होणार, होणार म्हणून बातमी असते, पण ती घडल्यावर ती बातमी संपते (उत्कंठा संपते) व नवीन दुसरी बातमी येईपर्यंत शेअर बाजार त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून बाजारात म्हटले जाते की- ‘‘बाय ऑन रूमर्स अॅण्ड सेल ऑन न्यूज!’’
३) सर्वजण तेजी-तेजी असा घोष करू लागतात त्या वेळेस मंदी येते. १६ मेनंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या अपेक्षा खूप वाढतील. ते शेअर बाजारात मुसंडी मारतील, जी परदेशी गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याची संधी ठरेल. २००८ मध्ये अशीच तेजी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या डोक्यात भिनली होती. भारताची आíथक परिस्थिती खूप चांगली होती. जीडीपी वाढीचा दर ९ टक्क्य़ांच्या वर होता, तरीही अमेरिकेत खुट्ट झाले व परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरू केला व भारतीय शेअर बाजाराने लोटांगण घातले.
बाजार खाली गेल्यास सेन्सेक्स १७,००० पर्यंत खाली जाऊ शकतो? नंतरच्या परिस्थितीनुसार पुढील अंदाज- परंतु माझ्या पूर्वीच्या लेखांत (आíथक घडय़ाळ) म्हटल्याप्रमाणे डिसेंबर २०१५ च्या सुमारास निर्देशांकाचा नवीन उच्चांक येऊ शकतो. मंदी कोणालाच नको असते. तेजी टिकावी असे मलासुद्धा वाटते, तरच मला दलाली मिळणार असते. शेअर बाजारातील अशा विसंगतीत माझ्यातला मूळचा शेअर ब्रोकर जागा होतो आणि तो माझ्यातल्या आíथक नियोजनकारावर कुरघोडी करतो.