|| अजय वाळिंबे

टाटा समूहाची टाटा स्पॉन्ज आयर्न लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठय़ा स्पॉन्ज आयर्न उत्पादकांपकी एक आहे. लोह धातूच्या थेट कपात प्रक्रियेत व कचऱ्याच्या उष्णतेतून वीजनिर्मितीद्वारे कंपनी स्पॉन्ज आयर्नचे उत्पादन करते.

वर्ष १९८२ मध्ये ईपीटाटा स्पॉन्ज आयर्न लिमिटेड म्हणून सुरू झालेली ही कंपनी आता टाटा स्टीलची उपकंपनी असून, टाटा स्टीलची भांडवलात ५४.५ टक्के हिस्सेदारी आहे. कंपनी प्रामुख्याने लोह तयार करते, जे एक सिंगल एंड अर्थात स्टील बनविणे यासाठी आणि सिंगल ग्रेड उत्पादन यासाठी वापरात येते. याव्यतिरिक्त, कंपनी वीजनिर्मिती देखील करते. कंपनीचा उत्पादन प्रकल्प ओरिसाच्या केंऊंझार जिल्ह्य़ातील जोदाजवळील बिलीपाडा येथे आहे. कंपनीच्या तीन फिरत्या भट्टय़ा (रोटरी किल्न) असून कंपनीची वार्षकि उत्पादन क्षमता ३,९०,००० मेट्रिक टन आहे. लवकरच ही क्षमता वार्षकि ४,२५,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवली जाईल. कंपनी ऊर्जा निर्मिती देखील करत असून तिची वार्षकि क्षमता २६ मेगावॅट आहे.

डिसेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २६०.८३ कोटी (मागील वर्षी २१४.४७ कोटी रुपये) रुपयांच्या उलाढालीवर २६.८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो २६ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र नऊमाहीचा नफा ९४.१९ कोटींवरून १०० कोटींवर गेला आहे. सध्या स्टील उद्योगाला बरे दिवस आले आहेत.

त्यामुळे आगामी कालावधीत कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे. उत्तम प्रवर्तक, कुठेलही कर्ज नसलेली आणि सध्या पुस्तकी मूल्याच्या जवळपास उपलब्ध असलेला टाटा स्पॉन्जचा हा शेअर म्हणूनच गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो. मध्यम कालावधीसाठी हा शेअर तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल.

सूचना प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.