सुधीर जोशी
अमेरिकी आणि जागतिक बाजारांचे संकेत मागे सारत भारतीय बाजाराने गेल्या सप्ताहात सकारात्मक वाटचाल केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन तेलाच्या किमतीमधील घसरण बाजाराला पोषक ठरली. सेन्सेक्स आणि निफ्टी या बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गेल्या दोन सप्ताहांतील घसरणीला छेद देत दीड टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबर बँका आणि विशेष करून सरकारी बँकांच्या समभागांनी मोठी उसळी घेतली. किमती वाढीचे वृत्त आणि पावसाळा संपल्यावर येणाऱ्या मागणीमुळे सिमेंट क्षेत्रातील समभाग आघाडीवर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारती एअरटेल: देशात दूरसंचार क्षेत्रात पुढील तीन वर्षांत मोठी वाढ होणार आहे. वाढत्या स्पर्धेत रिलायन्स आणि भारती एअरटेल या दोनच कंपन्या टिकून राहतील. भारती एअरटेलने डिजिटल परिसंस्थेत मोठी गुंतवणूक करून उत्पन्नामध्ये आणि ग्राहक संख्येत वाढ साधली आहे. एअरटेल पेमेंट बँकेच्या माध्यमातून कंपनी डिजिटल व्यवहारामध्ये आपले स्थान निर्माण करीत आहे. ‘५ जी’ च्या प्रवेशाने या क्षेत्रातील व्यवसाय संधींमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. भारती एअरटेल सध्याच्या ‘४ जी’ नेटवर्कचा आंशिक वापर करून ‘५ जी’च्या सुविधा देईल. त्यामुळे नवे तंत्रज्ञान विकसित आणि प्रचलित होईपर्यंत खर्चात बचत होईल. कंपनीने वेळोवेळी भाग भांडवल उभारून आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. दोन ते तीन वर्षांसाठी कंपनीचे समभाग गुंतवणुकीस योग्य़ वाटतात. समभागात थोडी घसरण झाली की खरेदी करता येईल.

सध्याचा बाजारभाव : ७६६.७०
बाजार भांडवल : ४.४१ लाख कोटी रुपये
५२ आठवडय़ातील पातळी:
उच्चांक : ७८१.८०
नीचांक : ६२८.७५

भेल: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) ही ऊर्जा-संबंधित/पायाभूत सुविधा क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योग आहे. वीज निर्मिती उपकरणांव्यतिरिक्त, कंपनीची उत्पादने, खते, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरीज, तेल उत्खनन आणि उत्पादन, पोलाद आणि धातू, सिमेंट, साखर आणि पेपर प्लांट्स, वाहतूक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या ग्राहकांच्या विस्तृत गरजांची पूर्तता करतात. जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात ६१ टक्के वाढ होऊन ते ४,६७२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरकारची पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक, देशी कंपन्यांना दिले जाणारे प्राधान्य या कंपनीसाठी जमेच्या बाजू आहेत. लवकरच रेल्वेसाठी लागणाऱ्या चाकांचे मोठे कंत्राट मिळविण्याची कंपनीला संधी आहे. पुढील तिमाही निकालांवर लक्ष ठेवून कंपनीमध्ये गुंतवणूक करता येईल.

सध्याचा बाजारभाव : ६४.१०
बाजार भांडवल : २२,३५४ कोटी रुपये
५२ आठवडय़ातील पातळी:
उच्चांक : ८०.३५
नीचांक : ४१.४०

जीएनएफसी: गुजरात नर्मदा व्हॅलीफर्टिलायझर्स अँड केमिकल्स (जीएनएफसी) ही गुजरात सरकार आणि गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्सद्वारे (जीएसएफसी) प्रवर्तित संयुक्त क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी रसायने, खते, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. लवकरच ती संपृक्त नायट्रिक ॲसिड बनवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरेल. कंपनी सध्याचे उत्पादन स्वत:च्या खतनिर्मितीला वापरले जाते. जगात नायट्रिक ॲसिडच्या किमती वाढल्या आहेत. जीएनएफसीला वाढलेल्या उत्पादनाचे बाजारात वितरण करून फायदा मिळेल. कंपनीची गेल्या आर्थिक वर्षांतील उलाढाल ८,८०० कोटी रुपये आहे.कंपनी कर्जमुक्त आहे. या वर्षांत ती दहा हजार कोटींचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. या वर्षांतील समाधानकारक पाऊस कंपनीच्या खत व्यवसायाला फायदेशीर ठरेल. समभागांची सध्याची ७५० रुपयांची पातळी खरेदीसाठी आकर्षक आहे.

सध्याचा बाजारभाव : ७५१.१०
बाजार भांडवल : ११,६७३ कोटी रुपये
५२ आठवडय़ांतील पातळी:
उच्चांक : ९१२
नीचांक : ३२७.४५

बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात वेगवान तेजी नसली तरी व्यापक बाजारातील समभागांना असलेल्या मागणीमुळे बाजाराचे एकूण मूल्य वाढले आहे. डी-मॅट खात्यांची एकूण संख्या दहा कोटींवर गेली आहे.देशातील गुंतवणूकदारांचा समभागातील गुंतवणुकीवरचा वाढता विश्वास आणि डिजिटल युगामुळे सोपे झालेले व्यवहार, किफायतशीर ब्रोकरेज (दलाली) आकारणाऱ्या दलाली पेढय़ांनी निर्माण केलेली स्पर्धा या सर्वाचा हा परिणाम आहे. मुडीज या आघाडीच्या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन कायम ठेवून जागतिक बाजारात जरी मंदीसदृश स्थिती असली तरी भारतावर त्याचा परिणाम होणार नाही असे केलेले भाष्य गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणारे आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसारदेखील भारतातील भांडवली गुंतवणूक येत्या वर्षांत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

सरकारची उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) आणि त्याची व्याप्ती वाढविण्याचा विचार आहे. गेल्या काही महिन्यांतील वस्तू व सेवा कर संकलन आणि निर्मिती क्षेत्राच्या (पीएमआय) निर्देशांकाची पातळी बाजाराला चांगल्या काळाचे
संकेत देत आहेत. गुंतवणूकदारांनी बाजारात टिकून राहून टप्प्याटप्याने गुंतवणूक वाढवायला हवी.
sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American global markets indian market international indices technology banks amy
First published on: 12-09-2022 at 00:03 IST