एमाझा पोर्टफोलिओच्या नियमित वाचकांना अलेम्बिक फार्मास्युटिकल्स नवीन नसावी. कारण साधारण तीन वर्षांपूर्वी हा शेअर याच स्तंभातून ३३५ रुपयांना सुचविला गेला होता. त्या पातळीवरून या शेअरची किंमत सध्या जवळपास दुप्पट झाली असली तरीही हा शेअर पुन्हा सुचवीत आहे. खरे तर आता इतका वाढल्यावर हा शेअर का सुचविला, असाही विचार काही वाचक गुंतवणूकदारांच्या मनात येऊ शकेल. परंतु काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये कायम किंवा प्रदीर्घ काळासाठी ठेवण्यातच फायदा असतो. याच स्तंभातून पाच वर्षांपूर्वी सुचविलेले शेअर्स ज्या वाचक गुंतवणूकदारांनी राखून ठेवले असतील त्यांना याचे महत्त्व पूर्णपणे पटले असेल. अलेम्बिकदेखील त्याच पठडीतला शेअर आहे. मार्च २०१७ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता जाहीर झालेले लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष तितकेसे आकर्षक नाहीत. त्यामुळेच सध्या हा शेअर ६०० रुपयांच्या आसपास उपलब्ध झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने २,९८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४३०.६३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ३८ टक्क्यांनी कमी आहे. तसेच यंदाच्या तिमाहीचा म्हणजे मार्च २०१७ साठी संपणाऱ्या तिमाहीचा निकालही गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तितकासा चांगला नाही. कंपनीने ६४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५९.२४ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळविला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ३३ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीच्या विपणन विभागात ५,००० हून अधिक कर्मचारी वर्ग असलेल्या अलेम्बिकने गेल्या पाच वर्षांत तेल्झी, रेकूल, गेस्तोफिट, ओविजीन डी, रिचार आणि रोसावे हे ब्रॅण्ड बाजारात आणले. सध्या या ब्रॅण्ड्सचा बाजार हिस्सा २ टक्के असला तरीही आगामी काळात त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. सर्वोत्तम ३०० प्रचलित ब्रॅण्ड्समध्ये अलेम्बिकचे विकोरील, अझीथ्रोल, अल्थ्रोसीन, रोक्झीड आणि गेत्सोफीट हे पाच ब्रॅण्ड आहेत. कंपनीची सध्या १७० उत्पादने असून कंपनी अधिकाधिक भर संशोधनावर देत आहे. सध्या औषधी कंपन्यांचे दिवस चांगले नाहीत. परंतु कोणत्याही स्थितीत तग धरणाऱ्या डिफेन्सिव्ह शेअर म्हणून औषधी कंपन्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात. अशा कंपन्यांचा विचार करताना त्यात आलेम्बिकला प्राधान्य द्यायला हवे. केवळ ०.३ बीटा असलेली ही कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटते.
अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड
(बीएसई कोड – ५३३५७३)
लार्ज कॅप समभाग
प्रवर्तक: चिरायू अमीन
बाजारभाव (रु.) ६००.००
उत्पादन/ व्यवसाय औषध निर्माण
भरणा झालेले भागभांडवल (रु.) ३७.७ कोटी
पुस्तकी मूल्य (रु.) ९९.१
दर्शनी मूल्य (रु.) २/-
लाभांश (%) २००%
प्रति समभाग उत्पन्न (रु.) २२.८
पी/ई गुणोत्तर २६.६
समग्र पी/ई गुणोत्तर २०.९
डेट/इक्विटी गुणोत्तर ०.००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर —–
रिटर्न ऑन नेटवर्थ (%) ५९.०७
बीटा ०.३
बाजार भांडवल (कोटी रु.) ११,४४२
५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.) ७०९/ ५१८
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७२.६८
परदेशी गुंतवणूकदार १०.६१
बँक/ म्यु. फंड / सरकार ३.१३
इतर १३.५८
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.