वर्ष १९३४ मध्ये स्थापन झालेली एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, आज भारतातील सिमेंट तसेच स्टील निगडित बांधकाम उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. गेल्या ८३ वर्षांत कंपनीने केवळ औद्योगिक नव्हे तर वाणिज्य आणि घरगुती वापरासाठी अनेक बांधकाम उपयुक्त उत्पादने भारतीय बाजारपेठेला अनुसरून सादर केली. यात प्रामुख्याने छप्पर, भिंत, सिमेंटचे पत्रे, फ्लोअरिंग तसेच कारखान्यात लागणाऱ्या शेड्स आदींचा समावेश होतो. भारतातील ६०० हून अधिक शहरांत तसेच एक लाखाहून अधिक गावांतून कंपनीची उत्पादने वापरली जातात. केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावरही सुमारे ३२ देशांत कंपनीची उत्पादने वापरली जातात. गेल्या आठ दशकांतील आपल्या अनुभवावरून कंपनीने भौगोलिक परिस्थितीला अनुसरून अनेक उपयुक्त आणि टिकाऊ  उत्पादनांची शृंखला बाजारपेठेत आणली. कंपनी आपली उत्पादने आठ कारखान्यांतून करीत असून त्यांचे विपणन, वितरण आणि विक्री कंपनीच्या ४० सेल्स डेपो आणि ६,००० हून अधिक विक्रेत्यांकडून होते. भारतीय छप्पर बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांचा हिस्सा १६ टक्के असून सिमेंट बोर्ड आणि स्टील पॅनलमध्ये तो २२ टक्के आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळेच सध्या कंपनीचे रिटर्न ऑन नेटवर्क कमी आहे. मात्र नुकत्याच संपलेल्या मार्च २०१८ या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून मागील आर्थिक वर्षांची नुकसानीची कसर भरून काढली आहे. या वर्षांत कंपनीने १२४४.९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजची बोर्ड आणि पॅनलची निर्यात एकूण उलाढालीच्या २५ टक्के आहे. पर्यावरणसंहिता आचरणात आणण्याचा प्रयत्न इतर मोठय़ा कंपन्यांप्रमाणे एव्हरेस्ट इंडस्ट्रीजदेखील करत आहे. त्यामुळेच कंपनी अस्बेस्टॉसऐवजी फायबरचे पत्रे उत्पादनावर जास्त भर देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने ग्रामीण योजनांवर जास्त भर दिला आहे. यंदाचे पावसाचे आशादायक भाकीत, २०२० पर्यंत सर्वाना घर देण्याचे आश्वासन आणि त्याकरिता राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांसारख्या अनेक योजना कंपनीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायद्याच्या ठरणार आहेत. त्यामुळे सध्या ४१० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा हाय बिटा शेअर तुम्हाला वर्षभरात चांगला परतावा देऊ  शकेल.

सर्व औषध कंपन्या या प्रदीर्घ मंदीतून बाहेर येत आहेत. मार्कसन फार्मामध्ये शाश्वत तेजी रू. ३३ वर सुरू होत असून रू. ३८ हे प्रथम वरचे उद्दिष्ट असेल आणि दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे रू. ६० असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रू. २० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लि.         

(बीएसई कोड – ५०८९०६)

स्मॉल कॅप समभाग

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                     ४८.८७

परदेशी गुंतवणूकदार                 २.१५

बँक/ म्यु. फंड / सरकार             १४.४९

इतर                                          ३४.४९

 

बाजारभाव (रु.)                                 ४१०.५५

उत्पादन/ व्यवसाय                      सीमेंट उत्पादने

भरणा झालेले भागभांडवल            १५.४२ कोटी रु.

पुस्तकी मूल्य (रु.)                                २५४

दर्शनी मूल्य (रु.)                                       १०/-

लाभांश                                               (%)६५%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                   ३३.२

पी/ई गुणोत्तर                                       १३

समग्र पी/ई गुणोत्तर                           २१.८

डेट/इक्विटी गुणोत्तर                          ०.५७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                    ६.२४

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                     ०.७१

बीटा                                     १.६

बाजार भांडवल (कोटी रु.)            ६९९

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)  ६३७/ २४०

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.