कुठल्याही कंपनीला प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि जाणकार गुंतवणूकदार हा नेहमी संयमी असतो. प्रत्येक कंपनीचा प्रस्थापित होण्याचा कालावधी व्यवसायानुरूप वेगवेगळा असतो. कंपनीच्या या प्रवासामध्ये अर्थातच प्रवर्तक, संचालक मंडळ, भागधारक, सरकारी धोरणे अशा अनेकांचा समवेश करता येईल. धोरणी गुंतवणूकदार हे नेहमी दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात आणि म्हणून यशस्वी गुंतवणूकदार ठरतात.
आयडीएफसी बँक ही तशी नवीन आणि खासगी बँक असली तरी गुंतवणूकदारांच्या परिचयाची आहे. पूर्वी केवळ पायाभूत उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या आयडीएफसी लिमिटेडचे बँक व वित्तीय कंपनी असे विभाजन झाले. यातून आयडीएफसी बँकेने ऑक्टोबर २०१५ पासून बँकिंग व्यवसायाला सुरुवात केली. पायाभूत उद्योगांखेरीज आयडीएफसी बँक सध्या रिटेल क्षेत्रातही आपले स्थान पक्के करीत आहे. बँकेचे वार्षिक लेखापरीक्षित निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. निकाल अपेक्षेपेक्षा चांगले असून बँकेने ९,५४५.८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,०१९.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या बँकेच्या ७४ शाखा, ४७ एटीएम असून ३५० व्यवसाय केंद्रे आहेत. २०२० पर्यंत २०० शाखा तर २००० व्यवसाय केंद्र सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण ७.०३% वरून २.९९% वर आले आहे. बँकेची कामगिरी येत्या तीन वर्षांत मोठा पल्ला गाठेल असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या तीन वर्षांत बँकेच्या खातेधारकांची संख्या तर वाढेलच, शिवाय कर्ज वितरणातदेखील भरीव वाढ होईल अशी अपेक्षा आहे. मात्र नोटाबंदीनंतर आणि सध्याचे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण पाहता, एकंदर तीव्र स्पर्धात्मक बनलेल्या वातावरणात बँकेची आगामी कामगिरी कशी राहील हे काळच ठरवेल. अर्थात तरीही तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी आयडीएफसी बँक पोर्टफोलीओचा घटक बनायला हरकत नाही.
आयडीएफसी बँक लिमिटेड
(बीएसई कोड – ५३९४३७)
लार्ज कॅप समभाग
बाजारभाव (रु.) ६४.३५
उत्पादन/ व्यवसाय बँकिंग
भरणा झालेले भागभांडवल (रु.) ३३९९ कोटी
पुस्तकी मूल्य (रु.) ४३.२
दर्शनी मूल्य (रु.) १०/-
लाभांश (%) ८ %
प्रति समभाग उत्पन्न (रु.) ३.००
पी/ई गुणोत्तर २१.७
समग्र पी/ई गुणोत्तर २७.५
डेट/इक्विटी गुणोत्तर ४.१२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर १.२३
रिटर्न ऑन नेटवर्थ (%) ६.८५
बीटा ०.९
बाजार भांडवल (कोटी रु.) २२,१४७
५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.) ८३.४५ / ४४.१५
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५२.८८
परदेशी गुंतवणूकदार १९.१६
बँक/ म्यु. फंड / सरकार ११.०६
इतर १६.९०