काही कंपन्या लहान असतानाच हेरून ठेवाव्या लागतात. सोळा वर्षांपूर्वी स्थापन झालेली टायगर लॉजिस्टिक्स ही अशीच एक कंपनी आहे. कस्टम हाऊस एजंट म्हणून सुरुवात केल्यानंतर आज फ्रेट, कस्टम हाऊस एजंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स, प्रोजेक्ट लॉजिस्टिक्स आणि वाहतूक अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेली ही कंपनी गेली पाच वर्षे सातत्याने प्रगतिपथावर आहे. आपल्या नफ्यात गेली पाच वर्षे सरासरी २५ टक्के वाढ दाखवणाऱ्या या कंपनीने आपले कर्जदेखील कमी केले आहे. कंपनी आंतरराष्ट्रीय दळणवळण, हवाई तसेच सागरी वाहतूक यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट तसेच त्याच्याशी निगडित इतर सेवांमध्ये निरंतर विस्तार आणि आधुनिकीकरण करीत आहे. देशांतर्गत धान्य तसेच इतर खाद्यपदार्थ यांच्या दळणवळण सेवाही कंपनी पुरवते. सप्टेंबर २०१६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षेप्रमाणे उलाढालीत २४ टक्के वाढ दाखवून ती ८४ कोटींवर, तर नक्त नफ्यात गतवर्षांच्या तुलनेत २६ टक्के वाढ नोंदवून तो ३.३५ कोटींवर गेला आहे. भारतातील नववी आणि तुलनेत छोटी आणि तरुण असणारी ही कंपनी केवळ बीएसईवर एसएमई मंचावर सूचिबद्ध आहे. कंपनीने यंदा कस्टम हाऊस एजंट तसेच मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट या दोन्ही क्षेत्रांत उत्तम वाढ दाखविली आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत होंडा, हिरो मोटोकोर्प, टीव्हीएस, बजाज, यामाहा, बीकेटी, एलजी, जिंदाल, अपार, आलोक इंडस्ट्रीज, आयनॉक्स विंड, मक्केन फूड्स इ. अनेक मोठय़ा कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील धान्य तसेच खाद्यपदार्थाच्या दळणवळण क्षेत्रातील वाढ पाहता कंपनी आता देशांतर्गत व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. नोटाबंदीचा असंघटित लॉजिस्टिक्स कंपन्यांवर विपरीत परिणाम झाल्याचा फायदा संघटित क्षेत्रातील कंपन्यांना होईल अशी आशा आहे. कंपनीची आतापर्यंतची कामगिरी पाहता आणि भारतातील वाढते दळणवळण पाहता आगामी कालावधीत टायगर लॉजिस्टिक्सकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. तीन-पाच वर्षे थांबायची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांनी टायगर लॉजिस्टिक्सचा जरूर विचार करावा.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.

arth02

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com