निश्चलनीकरणाला पंधरा-वीस दिवसांत वर्ष पुरे होईल. निश्चलनीकरणाने नेमके काय कमावले याचा विचार करताना काही आकडेवारीवर नजर टाकणे योग्य होईल. ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ५६ लाख नवीन करदात्यांची नोंद झाली. आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत २४.७ टक्के वाढ दिसली. दर वर्षी नव्याने करकक्षेत आल्यामुळे आणि नव्याने कमवायला लागल्यामुळे आयकर विवरण पत्रे सादर करण्याच्या संख्येत निरंतर वाढ होत असली तरी मागील वर्षी ही वाढ ९.२ टक्के होती. या वर्षी ही वाढ २४.७ टक्के आहे. वैयक्तिक करदात्यांकडून होणाऱ्या कर संकलनात ४९ टक्के वाढ झाली आहे. स्व-निर्धारित आयकर भरणाऱ्यांकडून या वर्षी ३४.६७ टक्के अधिक कर संकलन झाले आहे. हे झाले वैयक्तिक करदात्यांच्या बाबतीत. असे किंवा यापेक्षा उत्साहवर्धक आकडे गैर वैयक्तिक करदात्यांच्या करसंकलनाबाबतचे आहेत. अतिरिक्त रोकड सुलभता वाढल्यामुळे मागील वर्षभरात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात एक टक्कय़ाची कपात केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील व्याजदरात घट झाली आहे. निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेची वाढ तात्पुरती खुंटली असली तरी सरकारचे कर संकलन वाढल्याचे निश्चितच दिसते आहे. निश्चलनीकरण व वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे सरकारच्या कर संकलनात मोठी वाढ अपेक्षित आहे. ही वाढ पूर्णपणे दिसण्यास किमान एक वर्ष ते १८ महिन्यांचा कालावधी जावा लागेल. विकासाचे पूजक असलेले मोदी हे अतिरिक्त करसंकलन नवीन सुविधा स्थापण्यासाठी वापरतील हे निश्चित. या सुविधा वीज पारेषण यंत्रणा, रस्ते महामार्ग बंदरे, जलवाहतूक, ग्रामीण रस्ते, पावसाळ्यात मुख्य रस्त्यांशी संपर्क होण्यासाठी आवश्यक असणारे ग्रामीण भागातील लहान पूल इत्यादींसाठी वापरले जातील. अशाच पायाभूत विकास प्रकल्पांच्या विकासाच्या व्यवसायात असलेली आजची कंपनी आहे.

दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही भोपाळस्थित रस्ते बांधणी कंत्राटदार आहे. या कंपनीची ऑगस्ट २०१६ मध्ये प्रारंभिक भागविक्रीपश्चात (आयपीओ) शेअर बाजारात नोंदणी झाली. कंपनीने २१९ रुपयांनी समभागाची विक्री केल्यानंतर नोंदणीसमयी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे. या कंपनीचे गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यांत रस्ते बांधणी प्रकल्प सुरूआहेत. दिलीप सूर्यवंशी आणि देवेंद्र जैन हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. मागील पाच वर्षांत कंपनीने ५६११.९४ लेन किमीचे (३१ मार्च २०१७) प्रकल्प पूर्ण केले असून मागील पाच वर्षांत कंपनीने ३८.७८ टक्के वार्षिक वाढ नोंदली आहे. कंपनीचे सुरू असलेल्या प्रकल्पांव्यतिरिक्त तेलंगणा, झारखंड, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध प्रकल्प विकसित करण्यासाठी स्वारस्य असल्याने निविदा दाखल केल्या असून या निविदांचे तांत्रिक आणि आर्थिक बाबीवर मूल्यमापन सुरू आहे. कंपनीच्या मालकीची जगातील उत्तम बांधकाम यंत्रसामग्री असून कंपनीच्या ताफ्यात एकूण लहान-मोठय़ा मिळून ८००० हून अधिक वाहनांचा समावेश आहे. कंपनीचा व्यवसाय दोन गटांत विभागला असून ज्यात प्रामुख्याने ठेकेदारी तत्त्वावर पाटबंधारे धरणे, द्रुतगती मार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, महामार्गावरील पूल यांचा समावेश होतो तर दुसऱ्या गटात ‘बांधा वापरा हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर विकसित केलेल्या नागरी पायाभूत प्रकल्पांचा समावेश होतो.

निविदेतून निवड झाल्यामुळे नवीन प्रकल्पासाठी निधी उभारणी आवश्यक होती. कंपनीने एकूण २४ प्रकल्पांतील (१४ परिचालन सुरू असलेले, ४ बांधकामे सुरू असलेले आणि ६ हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेल) भांडवली हिस्सा विक्रीचा करार केला असून उभ्या राहणाऱ्या भांडवलातून हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेल प्रकारच्या प्रकल्पात समभाग गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल प्रकारचे प्रकल्प हे ‘बीओटी’ तत्त्वावरील प्रकल्पांच्या तुलनेत कमी भांडवल लागणारे असल्याने कंपनी आगामी ४-५ वर्षे २० ते २५ टक्के वृद्धीदर राखू शकेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुढील वर्षांत कंपनीला ७५०० कोटींचे हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेल प्रकारचे प्रकल्प बहाल होण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल प्रकारचे असल्याने आगामी तीन वर्षांत कंपनीच्या भांडवलावरील परतावा (रिटर्न ऑन कॅपिटल) अन्य बांधकाम आणि बीओटी कंपन्यांच्या तुलनेत अव्वल राहील. मुहूर्ताच्या सत्रात ७८७ दरम्यान बंद झालेला हा समभाग आगामी वर्षांत गुंतवणूकदाराला विकासाची फळे नक्कीच चाखायला देईल.

राजेश तांबे arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)