सेवानिवृत्त झाला आहात का किंवा लवकरच होणार आहात..

नुकतीच दिवाळी झाली दिवाळीनिमित्ताने नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, बऱ्याच लोकांना भेटण्याचा योग आला. मी अर्थ नियोजन करते हे माहीत असल्याने मला बऱ्याच लोकांकडून एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे- ‘आता लवकरच मी सेवानिवृत्त होणार आहे किंवा मी सेवानिवृत्त झालो आहे त्यामुळे मला मिळालेला फंड, जागा विकल्याने किंवा इतर काही कारणाने मला मिळालेले एकरकमी पैसे मी कुठे गुंतवू ज्यायोगे मला नियमित उत्पन्न मिळेल?’

तर आता त्या प्रश्नाचे उत्तर बघूया.

जेव्हा आपण निवृत्ती नियोजनाचा विचार करतो तेव्हा निवृत्त झाल्यावर दर महिन्याला मला किती पैशांची गरज आहे हे ठरविणे सर्वात महत्त्वाचे आहे. अर्थातच ही रक्कम ठरवताना आपण ६-७ टक्क्याने वाढत जाणारा महागाई निर्देशांक लक्षात घेणे आवश्यक आहे. बरोबरीने आपण असे गुंतवणूक पर्याय निवडले पाहिजेत की, ज्यामध्ये नियमित उत्पन्न देणारे (डेट) आणि जास्त उत्पन्न देणारे (इक्विटी) अशा दोन्ही पर्यायांचा समावेश असेल.

असे पर्याय म्हणजे :

१. बँक ठेवी

२.वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस)

३. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते (एमआयएस)

४. प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय)

५. इमिडिएट अन्युइटी

६. म्युच्युअल फंडचा – मंथली इन्कम प्लान

७. म्युच्युअल फंड – मासिक/त्रमासिक लाभांश प्लान

८. म्युच्युअल फंड – सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी)

यापैकी पहिले पाच या नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना आहेत अर्थातच त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न कमी असते. सहा आणि सात या दोन्ही म्युच्युअल फंडाच्या मासिक उत्पन्न देणाऱ्या योजना आहेत फक्त फरक इतकाच की या योजनांकडे मार्केटनुसार उत्पन्न देण्याची क्षमता आहे आणि त्या दर महिन्याला उत्पन्न देतीलच असे आपण समजतो. पण ही एक गैरसमजूत आहे कारण मुच्युअल फंडातून मिळणारे लाभ हे दरमहा किती देतील याची खात्री नसते; पण तरी बरेच म्युच्युअल फंड नियमित उत्पन्न देताना दिसतात. मग जर आपल्याला निश्चित उत्पन्न दरमहा हवे असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे मुच्युअल फंडातील ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन – एसडब्ल्यूपी’ पर्याय होय.

‘एसडब्ल्यूपी’ ही म्युच्युअल फंडाची अशी  सुविधा आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित भांडवल वाढ काढून घेण्यास अनुमती दिली गेली आहे. पैसे काढण्याची वारंवारिता तिमाही किंवा मासिक असू शकते. कॅश इनफ्लोदेखील गुंतवणूकदार त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ठरवू शकतात. ते फक्त कॅपिटल गेन्स किंवा निश्चित रकमेतून पैसे काढू शकतात.

उदाहरणार्थ : जर आपण म्युच्युअल फंड योजनेमध्ये १० लाख गुंतविले आहेत आणि ती योजना दरवर्षी ९ टक्के परतावा देत असेल आणि सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅनद्वारे दरमहा १० हजार रुपये निश्चित रक्कम काढून घ्यायची असेल, तर हा निधी १५ वर्षांपेक्षा जास्त (म्हणजे १८२ महिने) कालावधीसाठी चालेल.

पण जर अपेक्षित वार्षिक दर वार्षिक रोख रक्कम काढण्याच्या रकमेपेक्षा अधिक असेल तर निधी (कॉर्पस) कायम राहील. म्हणजेच जर फक्त ७ ते ८ टक्के निधी काढला गेला आणि परताव्याचा दर ९ टक्के असेल तर या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा वापर शाश्वततेसाठी केला जाऊ  शकतो.

लाभांश पर्यायाच्या तुलनेत एसडब्ल्यूपी अधिक विश्वसार्ह आहे. कारण गुंतवणूकदार ठरावीक कालावधीसाठी प्रत्येक महिन्याच्या एका ठरावीक तारखेला किंवा प्रत्येक तिमाहीसाठी एक निश्चित रक्कम काढू शकतो. अशा प्रकारे म्युच्युअल फंडांच्या लाभांशापेक्षा नियमित उत्पन्नाचा हा एक चांगला पर्याय आहे. डिव्हिडंड देणाऱ्या इक्विटी संबंधित म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना ते मिळू शकतील अशा डिव्हिडंडची हमी दिली जाणार नाही. कारण ती बाजारातील हालचालींवर अवलंबून आहे. पण इथे निश्चित उत्पन्न मिळण्याची हमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरी असे असले तरी प्रत्येक गुंतवणूकदाराने फक्त एकाच गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक न करता त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता लक्षात घेऊन दोन्ही म्हणजे नियमित उत्पन्न देणारे (डेट) आणि जास्त उत्पन्न देणारे (इक्विटी) अशा दोन्ही पर्यायांचा समावेश केला पाहिजे. तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन कसे करायचे किती टक्के डेट, किती इक्विटी – त्यातही लाभांश देणारे का सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन हे स्वत: ठरविणे आणि जर तसे ठरविता येत नसेल तर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन ठरविणे आवश्यक आहे.

लेखिका मुंबईस्थित सनदी लेखाकार व  गुंतवणूक सल्लागार आहेत.

त्यांचा संपर्क ई-मेल cashevade.swati@gmail.com