वाहन विक्रीचा अर्थवृद्धीच्या दराशी थेट संबंध असतो. सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर दोन वर्षांनंतर ७ ते ७.५ टक्के अपेक्षित असल्याचा फायदा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सला होणार आहे.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी वाहनांना वित्तपुरवठा करणारी गैरबँकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीची मालकी श्रीराम समूहाकडे असून हा उद्योगसमूह वित्तीय सेवा क्षेत्रातील एक नामांकित उद्योगसमूह आहे. श्रीराम समूहाने या कंपनीची रिझव्र्ह बँकेकडे नोंदणी ठेवी स्वीकारणारी गैरबँकिंग वित्तीय कंपनी अशी केली आहे. कंपनीने १९७९ मध्ये व्यवसायास सुरुवात केल्यापासून अवजड आणि हलक्या व्यापारी वाहनांसाठी वित्तपुरवठय़ावर लक्ष केंद्रित केले. कंपनीच्या एकूण कर्जवाटपाच्या ८० टक्के कर्ज ही वैयक्तिक कर्जदारांना दिली आहेत. यापैकी बहुतेक कर्जदार हे स्वत:चा ट्रक स्वत: चालवितात. या ट्रक चालकापैकी बहुतांश ट्रकचालक हे भारताच्या ग्रामीण भागातून येतात. कंपनीने सद्य आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत १८ टक्के वृद्धीदर राखला आहे. हा दर राखण्यास प्रामुख्याने निश्चलनीकरणानंतर वेगाने सुधारत असलेली ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती कारणीभूत असल्याची माहिती कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना दिली. सततच्या दोन वर्षांच्या अवर्षणानंतर लागोपाठ दोन वर्षे झालेल्या पुरेशा पावसामुळे ग्रामीण भारतातून वित्तपुरवठय़ाची मागणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सद्य वर्षी कंपनी मागील वर्षांपेक्षा २० टक्क्यांनी अधिक नफा कमावेल.
वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणीचा सर्वात जास्त लाभार्थी माल वाहतूक क्षेत्र आहे. करप्रणाली सुटसुटीत झाल्यामुळे, वेगवेगळ्या जकात नाक्यांवर होणारा खोळंबा कमी झाल्याचा परिणाम व्यापारी वाहनांच्या परिचालनांत सुधारणा झाली आहे. परिणामी मागील तिमाहीत नवीन व्यापारी वाहनांच्या कर्ज वितरणात वार्षिक ३३ टक्के तर सद्य वर्षांच्या पहिल्या तिमाहीपेक्षा १२ टक्के आणि वापरलेल्या वाहनांच्या कर्ज वितरणात वार्षिक २० टक्के आणि पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली. वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणीपश्चात व्यापारी वाहनांच्या किमती कमी होण्याच्या अपेक्षेने पहिल्या तिमाहीत नवीन वाहन खरेदी पुढे ढकलली गेली असल्याची शक्यता गृहीत धरूनही, कंपनीकडे कर्जाची मागणी वाढतच आहे. या वाढीव मागणीला पुरे पडण्यासाठी कंपनीने भांडवल उभारणीसाठी ‘सिक्युरिटायझेशन’चा (विविध कर्जाची एकत्र मोट बांधून कर्जे विकणे) मार्ग अवलंबिला आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने मागील तिमाहीत ३७० कोटी मूल्याच्या कर्जाचे ‘सिक्युरिटायझेशन’ करून बँका आणि म्युच्युअल फंडांना ही कर्जे विकली. पुढील तिमाहीत आणि आवश्यकता भासेल तेव्हा कंपनी या प्रकारे कर्जाचे ‘सिक्युरिटायझेशन’ करून निधी उभारेल. चालू वर्षांत कंपनीने ७३ नवीन शाखा कार्यालये उघडली तर १,७०० नवीन कर्मचारी सेवेत घेतले. कंपनीने आपला व्यवसाय एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांवर केंद्रित केला आहे.
रिझव्र्ह बँकेच्या मागील आठवडय़ात झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत व्याजदरात काहीही बदल केलेला नाही. परंतु महागाईच्या आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरांत थोडी वाढ केली आहे. महागाईचा वार्षिक दर ४.३ ते ४.७ टक्क्यांदरम्यान राहणार असल्याने महागाई वाढूनही व्याजदरात वाढ संभवत नाही. परिणामी कंपनीच्या परिचालन खर्चात वाढ अपेक्षित नसल्याने आणि कर्जाची मागणी वाढल्याने आपला नफा टिकवू शकेल. कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्यांना अनुत्पादित कर्जे नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सची अनुत्पादित कर्जे एकूण कर्जवाटपाच्या ६.७ टक्के आहेत. वाहन विक्रीचा अर्थवृद्धीच्या दराशी थेट संबंध असतो. सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर दोन वर्षांनंतर ७ ते ७.५ टक्के अपेक्षित असल्याचा फायदा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सला होणार आहे आणि याचे प्रतिबिंब आर्थिक वर्ष २०१९ च्या कंपनीच्या उत्सर्जनात दिसेल. सध्याच्या दरात खरेदी केल्यास किमान १२ ते १५ टक्के नफा होईल अशी अपेक्षा आहे.
arthmanas@expressindia.com
(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)